नागपुरात व्होडाफोन-आयडिया अर्थात व्हीआयची सेवा विस्कळीत.

पुण्याच्या पावसामुळे नागपुरातील भ्रमणध्वनी ठप्प ,सव्‍‌र्हर पुण्यात असल्याने व्होडाफोनची सेवा विस्कळीत

नागपूर : पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या  मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळपासून नागपुरात व्होडाफोन-आयडिया अर्थात व्हीआयची सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागला. व्होडाफोनचे मुख्य सव्‍‌र्हर पुण्यात असल्याने ही समस्या उद्भवली.

सध्या हजारो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. अनेकांचे कार्यालयीन कामेही घरूनच सुरू आहेत. अशात आज गुरुवारी सकाळपासून व्होडाफोनची सेवा विस्कळीत झाली. पुण्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सातत्याने सुरू आहे आणि व्होडाफोनचे मुख्य सव्‍‌र्हर पुण्यातच आहे. तेथे वादळी अतिवृष्टी होत असल्याने  वीज खंडित करावी लागली. व्होडाफोनचे सव्‍‌र्हर सुरू ठेवण्यासाठी बॅटरी बॅकअपचा उपयोग केला गेला. मात्र पुण्यात ज्या भागात व्होडाफोनचे सव्‍‌र्हर व इतर यंत्रणा आहे त्या भागात अनेक तास वीज खंडित असल्याने बॅटरी बॅकअपही निकामी  झाले आणि व्होडाफोनची अख्खी यंत्रणा बंद पडली. परिणामी नागपुरातील व्हाडोफोनची सेवा विस्कळीत झाली. दुपारी अकराच्या सुमारास सेवा परत सुरळीत  झाली. परंतु या दरम्यान अनेकांची महत्त्वाची कामे रखडली. अगदी सकाळच्या वेळी मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकही संभ्रमात पडले होते. मोबाईल बिल न भरल्यामुळे सेवा थांबवली असावी, असेही काहींना वाटले. मोबाईल सेवा बुधवारच्या मध्यरात्रीपासूनच प्रभावित झाल्याचे एका ग्राहकाने लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.