आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांना मतदान करतानाचा व्हीडिओ FBवर व्हायरल, गुन्हा दाखल

Share This News

महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा मतदान करतानाचा व्हीडिओ काढून तो फेसबूकवर टाकल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबाद : राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आज मतदान पार पडलं. या मतदानादरम्यान, उस्मानाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना मतदान करतानाचा व्हीडिओ काढून तो फेसबूकवर टाकल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना मतदान करतानाचा व्हीडिओ काढून विजय कुरुंद नावाच्या एका व्यक्तिने तो फेसबुकवर पोस्ट केला. थेट फेसबूकला व्हीडिओ शेअर केल्यामुळे तो प्रचंड व्हायरल झाला. यामुळे पदवीधर मतदानात गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी कळंब इथल्या विजय कुरुंद याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम 188 , 128 , 130 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करून तातडीने व्हीडिओ फेसबूकवरून काढून टाकण्याचे आदेश दिले असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान आज झालं. 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. कोरोनाच्या सावटाखाली या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया झाली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली होती.

पुणे पदवीधर मतदारसंघ

पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण 4 लाख 26 हजार 257 मतदारांनी नोंदणी केली होती. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले. त्याखालोखाल पुण्यात मतदान झाले. पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आणि भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यात प्रमुख लढत झाली. सायंकाळी चार वाजेपर्यंत 2 लाख 11 हजार 96 मतदारांनी मतदान केले होते. चार वाजेपर्यंत पुणे पदवीधरमध्ये 49.52 टक्के मतदान झाले.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात दुपारपर्यंत 8 जिल्ह्यांमध्ये दुपारी 3 पर्यंत 43 टक्के मतदानाची नोंद झाली. औरंगाबादमधून सतीश चव्हाण राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्यासमोर भाजपचे शिरीष बोराळकरांचं आव्हान आहे. भाजपचे बंडखोर उमदेवार रमेश पोकळे यांचा फटका कुणाला बसणार हे पाहावं लागणार आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघ

नागपूर पदवीधर मतदारसंघात एकूण 2 लाख 6 हजार 454 मतदारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सायंकाळी 4 वाजेपर्यंत 53.64 टक्के मतदान झालं आहे. नागपूरमधून भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत झाली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.