रामटेक, भिवापूरसह इतर तालुक्यात ८१ गावातील पाणी दूषित

नागपूर : जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून जुलै महिन्यात तपासण्यात आलेल्या जिल्ह्यातील १0६६ गावांतील पाण्याच्या नमुन्यांपैकी रामटेक, भिवापूर तालुक्यांसह इतर तालुक्यांतील ८१ गावचे पाणी नमुने प्रदूषित आढळून आले आहेत. मागील तपासणीच्या तुलनेत यंदा प्रदूषित प्रमाण वाढले आहे.
पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, आजही देशातील अनेक नागरिक त्यापासून वंचित आहेत. विशेषत: ग्रामीण भागात अजूनही प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वास्तव सातत्याने समोर येते. विशेष म्हणजे, आता शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. अशातच दूषित पाण्यामुळे इतरही आजार बळाविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून येणार्‍या पाण्याच्या नमुन्याची तपासणी केली जाते. दर महिन्याला होणार्‍या या तपासणीच्या माध्यमातून पाण्याच्या गुणवत्तेचा अंदाज घेतला जातो. त्यातून दूषित पाणी आढळलेल्या गावांत जनजागृती केली जाते. तसेच संबंधित ग्रामपंचायतीला ब्लिचिंग पावडर टाकणे, पाण्याच्या स्रोताजवळ स्वच्छता राखणे, गावकर्‍यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे अशा उपाययोजना केल्या जातात. मात्र, ग्राम पातळीवरील ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने आजही नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे मत व्यक्त होत आहे. जुलै महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत १0६६ जलनमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले. त्यापैकी ८१ नमुने दूषित आढळून आले. रामटेक येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत घेतल्या गेलेल्या ७४ नमुन्यांपैकी १२ अर्थात १६ तसेच भिवापुरातील १२९ नमुन्यांपैकी २0 अर्थात १६ टक्के नमुने दूषित आढळून आलेत. त्याखालोखाल देवलापार येथील १३ तर कळमेश्‍वमधील ११ टक्के नमुने दूषित आढळून आले. विशेष म्हणजे, यंदा जानेवारी महिन्यात संकलित केलेल्या नमुन्यांमध्येही रामटेक परिसरातील पाणी सर्वाधिक दूषित असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या तालुक्यातील पाणी पुरवठा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय ग्राम पंचायत स्तरावरही कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना, असे दूषित पाणी पिण्याची वेळ येऊन ठेपल्याचे चित्र आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.