राज्यातील जलसाठे ४१ टक्के भरले, विदर्भातही चांगला पाऊस

नागपूरः राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून सरासरी जलसाठा ४१ टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. जलासाठ्यांमध्ये कोकण विभाग सर्वात आघाडीवर आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस नसल्याचे राज्यात चिंतेचे वातावरण होते. मात्र, मागील आठवड्यापासून राज्यात जवळपास सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. कोकण व प. महाराष्ट्रात अतिवृष्टीचे संकट आहे. मात्र, या परिस्थिती जलसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली असून राज्यातील ३ हजार २६७ प्रकल्पांमध्ये ४१ टक्के जलसाठा तयार झाला आहे. गेल्यावर्षी या कालावधीत ३७.३२ टक्के जलसाठा होता. विदर्भात नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांची एकूण ४ हजार ६०७ दशलक्ष घनमीटर जलसाठा क्षमता आहे. त्यात भर पडून जलसाठा १ हजार ६४२ दशलक्ष घनमीटरवर जलसाठा पोहोचला आहे. अमरावती विभागातील ४४६ प्रकल्पांची एकूण ४ हजार ७४ दशलक्ष घनमीटर क्षमता असून १ हजार ६५० दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. नाशिक विभागातील जलसाठा राज्यात सर्वांत कमी आहे. सर्वाधिक ५९ टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे. कोकण व गोव्यात ५२ टक्के, मध्य महाराष्ट्रात २५ टक्के तर विदर्भात ११ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात सरासरी ३९५.३ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४४०.५ मिमी पाऊस बरसला आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.