वर्ल्डक्लास एनसीआय world class NCI

श्रीयुत खान. भेलच्या कोलकाता कार्यालयात इलेक्ट्रकल इंजिनीअर म्हणून रुजू झाले. वयाच्या तीशीत लग्न झाले. यशाची कमान चढत्या भाजणीची होती. आयुष्यात बघितलेली जीवनाची सारी स्वप्न जणू प्रत्यक्षात साकारत होती. एकेक पाऊल पुढे सरकत होतं. ‘आयुष्य असावं तर असं’, असं म्हणावं, अशा तर्‍हेने दिवस मागे पडत होते. एव्हाना वय पस्तीशीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं. आता  संसारवेलीवर फुलं उमलायला हवीत, असा विचार मनात आला. पण, सुखाची उधळण करणार्‍या नियतीनं इथे मात्र दगा दिला. वैद्यकीय दृष्टिनं काही कॉम्पिलकेशन्स होती. त्याचं निदान झाल्यावर त्यांना एक गोंडस मूल झालं. पण, नियतीनं उगवलेला सूड इथवरचाच नव्हता. पुढे त्या बाळालाही अनेक संकटांना तोंड द्यायचं होतं बहुधा. अवघा एक वर्षाचा असताना त्याला टेस्टीक्युलर ट्युमर झाला असल्याचे, अख्ख्या कुटुंबाला हादरवून सोडणारे वास्तव डॉक्टरांनी जाहीर केले तेव्हा हतबल होण्यापलीकडे जणू दुसरे काहीच उरले नव्हते. उपचार सुरू झाले. जवळपास आठ ते दहा महिन्यांचा काळ निघून गेला. त्यासाठी येणारा खर्च हळूहळू आवाक्यापलीकडे जाऊ लागला. मुलाच्या उपचारासाठी नोकरी सोडण्याची वेळ आली. छोटासा व्यवसाय सुरू करून अधिकाधिक वेळ त्याच्यासाठी देण्याचा प्रयत्न सुरू झाला. नोकरी गेल्याने जीवनपद्धती बदलली. पैश्याची चणचण भासू लागली. कौटुंबिक तणावाचा प्रश्नही होताच. दरम्यान, मुलाच्या त्रासाने पुन्हा उचल खाल्ली. कुणाच्यातरी सल्ल्यानंतर स्वारी नागपुरात दाखल झाली. इथल्या नॅशनल कॅन्सर इस्टिट्यूटमध्ये भेट, उपचार सुरू झाले. कोलकात्यापासून इथवरच्या प्रवासादरम्यान रुग्णालयांचे बरेचसे अनुभव गाठीशी होते. त्या तुलनेत  एनसीआयचा अनुभव जरासा ‘वेगळाच’ होता. दारात हजर होताच कर्कसेवकांकडून होणारं स्वागत. नाव कुठे नोंदवायचं, फॉर्म कुठला भरायचा, माहिती कुठली नोंदवायची, तपासायला कुठल्या डॉक्टरकडे न्यायचं… हे सारे बेजार करणारे प्रश्न असतात एरवी. पण इथे तर कर्कसेवकच घडवून आणतो सगळं. रुग्णाची, त्याच्या नातेवाईकांची चिंता वाहण्यासाठीच नेमणूक झाली आहे, असं वाटावं इतकी पटापट कामं आटोपली जातात त्याच्याकडून. इतक्या मोठ्या रुग्णालयात आल्यावर हमखास उडणारी दांडी शाबूत राखत धडपड चाललेली असते इथल्या कर्कसेवकांची. अन्य सेवकांचंही तेच. डॉक्टरांच्या चेहर्‍यावरचे हसू, समोरच्या व्यक्तीला आजार झालाय्‌ अन्‌ तोही कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झालाय्‌, याची जाणिवही होऊ देत नाही. बरं, इतक्या सार्‍या सुविधा, मोठमोठी, अत्याधुनिक उपकरणं, असली तरी उपचाराचे दर मात्र आश्चर्य वाटण्याइतके कमी. कोलकात्याच्या खान यांनी कथन केलेल्या अनुभवाचे मर्म, इतक्या दूर आल्यानंतर दूर पळालेले मनातले भय अन्‌ मुलाच्या आजारपणाच्या गंभीर परिस्थितीतही कुटुंबियांच्या चेहर्‍यावर फुललेले हसू, याचेही वर्णन आयआयएम या संस्थेनं केलेल्या एका अभ्यासाच्या निष्कर्षपुस्तिकेत नमूद झाले आहे. या संस्थेच्या उभारणीसाठी केलेल्या काबाडकष्टाबद्दल कुणीतरी पाठीवर ठेवलेली कौतुकाची थाप वाटावी अशा भावना या संस्थेसाठी या अहवाल पुस्तिकेतून व्यक्त झाल्या आहेत.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या स्थापनेमागील कल्पनेला जरासा भावनिक ओलावा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे वडील आणि संस्थेचे सचिव शैलेश जोगळेकर यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते. त्यांच्या उपचारासाठी थेट गाठावी लागणारी मुंबई, त्यासाठी येणारा खर्च, राहण्या-खाण्यापिण्याच्या व्यवस्था, रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांची होणारी आबाळ, टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट मधील रुग्णांची गर्दी… हा सारा अनुभव सोबतीला होता. आपण आपले स्नेही तर हरवून बसलोय्‌. पण भविष्यात इतरांसाठी काही करता आलं तर नक्की करायला हवं, या विचारांत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या स्थापनेची कल्पना दडली होती. सुमारे पाव शतकापूर्वी मनाच्या कुठल्याशा कप्प्यात डोकावलेल्या त्या कल्पनेला हळूहळू मूर्त स्वरूप येऊ लागले. पाच वर्षांपूर्वी संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. आणि अमरावती-जबलपूर हायवेवर एका भव्य वास्तूच्या निर्माणप्रक्रियेला सुरुवात झाली. तत्पूर्वी नागपूरच्या धरमपेठ परिसरात एका छोट्याशा हॉस्पीटलपासून रुग्णसेवेला सुरूवात झालेली होतीच. तीन वर्षांपूर्वी हायवेवरील इमारतीत रुग्णसेवेला सुरुवात झाली. येत्या वर्ष-दीड वर्षाच्या कालावधीत, संपूर्ण रुग्णालय जेव्हा तयार होईल, तेव्हा कर्करोग या एकाच विषयाला वाहिलेले, ते भारतातले ‘वर्ल्ड क्लास’  कॅन्सर हॉस्पीटल असेल, अशी ग्वाही सचिव शैलेश जोगळेकर यांनी दिली आहे.
‘कॅन्सरसे आझादी का पहला कदम’ असा घोष करीत सुरू झालेल्या या उपक्रमाचे वैशिष्ट्यच हे आहे की, सेवा हे त्याचे ब्रीद आहे. पैसा कमावण्याचा उद्देश इथे कुणाचाच नाही. अध्यक्ष . सुनील मनोहर, सचिव शैलेश जोगळेकर, अजय संचेती, आनंद औरंगाबादकर, ललित श्याम, डॉ. आनंद पाठक हे सारेच पदाधिकारी समर्पित भावनेने संस्थेसाठी काम करतात. डॉक्टरांपासून तर सेवकापर्यंतच्या स्टाफचेही तेच. वेतन मिळत असले तरी फक्त त्यासाठी कुणीच काम करीत नाही. मालिनी जोशी यांच्या नेतृत्त्वात साकारलेली कर्कसेवकाची कल्पना तर खरोखरीच अनोखी ठरली आहे. रुग्णालयाच्या दारात पोहोचताच कुणीतरी स्वत:हून मदतीला धावून येतो, हे दृश्य पहिल्या क्षणालाच धीर देऊन जाते. कुठेही लूट नाही. फसवणूक नाही. उपचारासाठीचे दर म्हणाल तर बाहेरच्या जगाला लाजविणारे. खाजगी वैद्यकीय क्षेत्रात चालणारी लूट उघडी पाडणारे. मायेची पखरण करीत चालणारे उपचार, सेवेचे ब्रीद सार्थ ठरविणारे असतात. स्वत:ला झालेला आजार विसरून रुग्णाच्या चेहर्‍यावर फुलणार्‍या हासवांचे गमक सेवेच्या त्या भावनेत  दडलेले असते. ‘‘कॅन्सर कुणाशीच भेदभाव करीत नाही. आम्ही पण नाहीच करत.’’ हे केवळ पाट्यांवर कोरलेले छानसे वाक्य नाही. इथली माणसं प्रत्यक्ष जगतात त्यातील शब्दन्‌ शब्द. या रुग्णालयात सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार झालेले आहेत, इथे मुस्लिम रुग्णही तेवढ्याच विश्वासाने येतात, इथे लगतच्या छत्तीसगड, मध्यप्रदेशशिवाय उत्तर प्रदेश, राजस्थान, बंगाल, झारखंड, इतकेच काय अंदमानमधून देखील लोक उपचारासाठी येतात, ही बाब संस्थेसाठी अभिमानास्पद ठरली आहे. व्यवस्थापनापासून तर स्टाफमधील शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाने दरेक क्षणाला जपलेले सेवेचे भान त्याला निष्ठेने काम करण्याची प्रेरणा देत असावे कदाचित! पण त्याचे परिणाम मात्र बोलके ठरताहेत.

एरवी कॅन्सर म्हटला की थरकाप उडतो माणसाचा. त्याच्या उपचारासाठी घरदार- शेत विकावे लागल्याचे सांगणारी उदाहरणंं कमी नाहीत. पण इथे तर पैसे नसतील त्याच्या मदतीला धावणारी व्यवस्था आहे. शक्यतो शासकीय योजनांशी त्या रुग्णाला जोडण्याचा प्रयत्न होतो. नाहीच जमलं काही तर रुग्णालयाची स्वत:ची ‘कॅन्सर केअर फण्ड’ची योजना आहे. दानशूरांनी केलेल्या दानाची रक्कम त्यात जमा होते. कित्येकदा इथे उपचार करवून घेतलेले रुग्णही परत जाताना त्या निधीत आनंदाने पैसे टाकून जातात. अलीकडच्या काळात महिला आणि बालकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्डस्‌ हेही इथले वैशिष्ट्य. पैसे नाहीत म्हणून एखादी व्यक्ती उपचाराविना राहिली असे घडू नये, हा निर्धार तर खुद्द व्यवस्थापनाचा आहे. बहुधा म्हणूनच की काय, पण कुठेही जाहिरात नाही, मोठाले फलक नाही. टीव्हीवर मुलाखतींच्या आडून चालणार्‍या छुप्या जाहिराती नाहीत. तरीही इथे आवरता येऊ नये इतकी रुग्णांची गर्दी होते. येत्या काळात बांधकाम पूर्ण होऊन हे रुग्णालय पूर्ण तयार होईल तेव्हा निदान पाचशे खाटांची व्यवस्था इथे असेल. दीड हजारावर रुग्णांची ओपीडीत तपासणी होईल. न्युक्लिअर मेडिसीन, गॅमा कॅमेरा, आयोडिन थेरेपी यासारखे या क्षेत्रातले आवश्यक असे सर्व प्रकारचे उपचार, सर्व प्रकारच्या मशिनरी येत्या काळात कार्यरत झालेल्या असतील. भरती झालेल्या रुग्णांसोबत येणार्‍या नातेवाईकांची निवास, भोजन व्यवस्था, इतरांसाठी अल्पदरातील भोजन, या बाबी त्या जोडीला असल्यावर रुग्णाच्या चिंता न मिटल्या तरच नवल.
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या इमारतीबाहेरचा परिसरही तितकाच भव्य आणि देखणा आहे. तिथली हिरवळ म्हणजे इथे रुग्णांसोबत आलेल्यांसाठीच्या विसाव्याचे ठिकाण. त्यामुळे आतल्याप्रमाणेच बाहेरची गर्दीही दखलपात्र ठरावी अशीच असते. या आवारात रोज सकाळी राष्ट्रध्वज फडकावला जातो. आणि सायंकाळी ध्वजावतरणही होते. हे दोन्ही सोहळे देखणे असतात. सर्वांना सूचना देणारी शिट्टी मग ध्वज वर चढेपर्यंत वा खाली येईपर्यंत वाजणारा बिगुल. सारा परिसर तिरंग्याकडे नजर लावून असलेला… एका रुग्णालयाच्या आवारातला हा अनुभवही तितकाच बोलका असतो! सहसा कुठेही न आढळणारा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.