रुग्णवाहिकेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

वाडी
स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती महामार्गावर रविवारी (२0 डिसेंबर) सकाळी आठवा मैल चौकात झालेल्या अपघातात दुचाकी स्वार व रुग्णवाहिकेची जोरदार धडक झाल्याने दुचाकीस्वार जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. पवन अर्जुन नागोसे (वय ३२) रा. सिद्धार्थ सोसायटी, आठवा मैल असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक पवन नेहमीप्रमाणे सकाळी आपली दुचाकी क्र. एम. एच. २७ / ए. एस. ४0३३ घेऊन फिरायला गेला. सकाळी डिफेन्स परिसरात फिरून आल्यावर दुचाकीने डिफेन्स गेट ते आठवा मैलकडे अमरावती महामार्ग पार करीत असताना आठवा मैल चौकात अमरावतीकडून नागपूरकडे भरधाव वेगाने जाणार्‍या रुग्णवाहिका क्र. एम. एच. ३0 / बी. डी. २२७0 चा चालक राजू श्रीनिवास गिरी (वय २९, रा. धानोरा खुर्द, मंगरूळपीर, वाशीम) याने या दुचाकीला जबरदस्त धडक दिली. या दुर्घटनेत मृतक आपल्या दुचाकी वाहनासोबत दूर अंतरापर्यंत फरफटत गेल्याने गंभीर जखमी झाला. अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले. दुर्घटना मुख्य चौकात झाल्याने त्वरित जवळपासचे नागरिक, ऑटोचालक, व्यावसायीकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतक पवन हा स्थानिक रहिवासी असल्याने ओळख पटली. वाडी पोलिसांना सूचना मिळताच पोलिस लागलीच घटनास्थळी पोहोचले. मृतकाचा पंचनामा करून मृतदेह मेयो रुग्णालयाला रवाना केले. रुग्णवाहिका व चालकाला ताब्यात घेऊन कलम ३0४ अ, २७९, ४२७ भादंवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दुर्घटनेची माहिती मृत पवनच्या घरी समजताच एकच हाहाकार उडाला. सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. गतवर्षीच पवनचा विवाह झाला होता व दोन महिन्यांपूर्वी पुत्ररत्न झाल्याने नुकतेच नामकरण सोहळा देखील आनंदात पार पडला होता. पवनच्या मागे आई, वडील, पत्नी व छोटा मुलगा असा परीवार आहे. तो डिफेन्स परिसरातील अरुण पुस्तकालय या पुस्तक विक्रे त्याकडे नोकरीवर होता. या घटनेने नागोसे परिवारावर दु:खाचे सावट कोसळले असून, रविवारी संध्याकाळी शोकाकुल वातावरणात आठवामैल स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.