निकालावर तर्क लावणे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान-बावनकुळे

0

लातूर (Latur) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकालावर इतर पक्षातील नेते भाष्य करीत आहेत. असे भाष्य करणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केले. विरोधक कपोलकल्पित बातम्यातून वेगळा नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लातूर जिल्हा संघटनात्मक दौऱ्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. श्री बावनकुळे म्हणाले, न्यायालयाचा निकाल आल्यावर प्रत्येक गोष्टीचा निर्णय कळेलच. सरकारकडे बहुमत आहे, हे शरद पवार व अजित पवार यांनी मान्य केले आहे. विरोधकांकडे काहीच नसल्याने नॅरेटिव्ह सेट केला जात आहे. याची दखल सुप्रिम कोर्टाने घेतल्यास त्यांच्यावरही कार्यवाही होण्याची शक्यता आहे. याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
२०२४ च्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समन्वयाने होतील. भाजपा सेना युती आहे व पुढील काळातही कायम असेल. लातूरच्या सर्व विधानसभा सहित राज्यातील २०० विधानसभा व सर्व ४८ लोकसभा जागांवर (BJP) भाजपा सेना युती विजय मिळविणार असा दावा करताना मंत्री मंडळ विस्तारात लातूरला अग्रक्रम मिळेल असाही आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

म्हणून रंगले राजीनामा नाट्य!

विरोधकांची वज्रमूठ सैल होत आहे. अद्याप मोदींचे वादळ यायचे आहे. देवेंद्रजींची गारपीट व्हायची आहे, मर्द मराठा एकनाथ शिंदे यांनी करून दाखविले आहे. येत्या काळात अनेक मोठे प्रसंग व घटना महाराष्ट्रात दिसतील. ज्या नेत्याकडे आपलाच पक्ष सांभाळण्याची शक्ति नाही, ते महाविकास आघाडीचे नेतृत्त्व करू शकत नाहीत. यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP)झालेली चूक तपासून पाहण्यासाठी राजीनामा नाट्य रंगले होते, असाही दावा त्यांनी यावेळी केला.

योजना संघटनेच्या माध्यमातून पोहचविणार

आम्ही आमची संघटना मजबूत करीत आहोत तर शिंदे त्यांची संघटनेला बळकटी देत आहेत. संघटनेच्या बळावर सरकार आणने व सरकारच्या योजना संघटनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहोत. महाराष्ट्रात ६५ वर्षांत जे काम झाले नाही ते काम भाजपाचे डबल इंजिन सरकार आहेत. मूळ भाजपा कायम ठेऊन संघटनेत काम सुरू असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.