रेशीमबाग, सिरसपेठसह ‘या’ भागात राहणार नाही वीज ; वेळेचे नियोजन करण्याचे आवाहन

0

नागपूर, दि. 19 नोव्हेंबर, 2025: शहरातील वीज यंत्रणेच्या अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी महावितरण आणि महापारेषणने कंबर कसली आहे. तांत्रिक कामांमुळे शहरातील रेशीमबाग, सिरसपेठ, शेगाव नगर आणि सरस्वती नगर या भागांतील वीजपुरवठा काही तासांसाठी बंद राहणार आहे. नागरिकांनी आपल्या कामांचे नियोजन करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

महावितरणच्या जुनी शुक्रवारी शाखा कार्यालयांतर्गत येणाऱ्या 11 केव्ही आयुर्वेदिक वीज वाहिनीवर देखभाल व दुरुस्तीचे (एबी स्विच, रिजम्परिंग, क्रिम्पिंग) काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रेशीमबाग आणि सिरसपेठ परिसरातील वीजपुरवठा गुरुवार, 20 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत बंद राहील.
दुसरीकडे, ‘महापारेषण’ कंपनीतर्फे वीज वाहिन्या बदलण्याचे मोठे काम सुरू होत आहे. याचा परिणाम हुडकेश्वर उपविभागावर होणार आहे. त्यामुळे शेगाव नगर आणि सरस्वती नगर या परिसरातील वीज गुरुवार (20 नोव्हेंबर) आणि शुक्रवार (21 नोव्हेंबर) अशा दोन्ही दिवशी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत बंद ठेवण्यात येईल.

ग्राहकांना सहकार्याचे आवाहन
वीज यंत्रणा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी ही देखभाल दुरुस्ती अत्यंत गरजेची आहे. यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल महावितरण दिलगीर आहे.वीज खंडित होण्यापुर्वी नागरिकांनी पिण्याचे पाणी भरून ठेवणे व इतर विजेची कामे उरकून घ्यावीत आणि सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.