
नागपूर(Nagpur) : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त संपूर्ण महिनाभर ग्राहक जागृतीच्या विविध कार्यक्रमांनी साजरा करावा, स्वतंत्र ग्राहक संरक्षण मंत्रालयाची स्थापना, राज्य ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन आणि ग्राहक कल्याण निधीचे पारदर्शक व योग्य नियोजन करण्याच्या मागण्यांचे निवेदन लोकप्रतिनिधींना देण्याचे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर यांनी केले आहे.
सीताबर्डीच्या टेकडीरोडवरील आनंद मेस येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजेंद्रजी पाटील यांच्यातर्फे आयोजित दीपावली मीलन कार्यक्रमात श्यामकांत पात्रीकर यांनी हे आवाहन केले.
प्रांत सचिव लीलाधर लोहरे यांनी संघटनेच्या कार्यक्रमांची माहिती दिली. नागपूर जिल्हा अध्यक्ष रेखा भोंगाडे आणि जिल्हा सचिव मुकुंद अडेवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाय पे चर्चा कार्यक्रम प्रत्येक सदस्यांनी आपापल्या भागात राबवावा, अशी सूचना केली.
यावेळी ग्राहकविषयक मुद्द्यांवर चर्चा, विचारमंथन आणि पुढील उपक्रमांची दिशा निश्चित करण्यात आली.
उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रशांत लांजेवार, जिल्हा सचिव मुकुंद अडेवार, विधी सल्लागार ॲड. पल्लवी खापरीकर, सहसचिव भावना क्षीरसागर, संपर्क प्रमुख सुविधी जयस्वाल, प्रवासी महासंघाचे सचिव निकेश कावळे, उर्मिला बोरीकर, दीपलक्ष्मी देवरे, वर्षा तिवसकर, स्वाती अडेवार, दीपक परांजपे, शिल्पा मेश्राम, दीपा काशिवार (गोंदिया) यावेळी उपस्थित होते.
















