गुडधेंचे हुकले तसाच पटलेंनाही फटका

0

काँग्रेस आणि भाजपचे दोन्ही तगड्या उमेदवारांना घ्यावा लागणार शेजारी प्रभागाचा आसरा

नागपूर(Nagpur) : नागपूर महानगरपालिकेसाठी नुकत्याच निघालेल्या प्रभागनिहाय आरक्षणात काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे यांना जसा फटका बसला तसाच फटका त्यांना तगडी लढत देण्याच्या तयारी असलेले भाजपचे युवा उमेदवार पारेंद्र पटले यांनाही बसला. त्यामुळे हे दोन्ही उमेदवारांची शेजारच्या प्रभागातून चाचपणी सुरू झाली आहे. गुडधेंचा निर्णय त्यांच्याच हाती आहे मात्र भाजपचे पारेंद्र पटले यांच्यासाठी पक्ष कोणता विचार करते, याकडे आता लक्ष लागले आहे.

प्रभाग क्रमांक 38 हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल गुडधे यांचे प्रभाव क्षेत्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गुडधे यांनी हा गड कायम राखला आहे. विशेष म्हणजे नागपूर मनपातील हा अखेरचा प्रभाग असल्याने केवळ याच प्रभागात तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. महिलांसाठी 50 टक्के आरक्षणानुसार येथे एक की दोन महिला उमेदवारांना आरक्षण मिळणार, हा संभ्रम होता. दोन जागा महिलांसाठी आरक्षित केल्याने हा संभ्रम मिटला. मात्र तिसरी जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने सर्वसाधारण किंवा ओबीसी गटातून इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांचा भ्रमनिरास झाला. या प्रभागात 38अ अनुसूचित जातीसाठी राखीव, 38ब ओबीसी महिलातर 38क सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाले. या आरक्षणामुळे प्रफुल्ल गुडधे यांना हा प्रभाग सोडावा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत ते दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते. त्यामुळे त्यांना या मतदारसंघातील कोणत्याही प्रभागात सोयीनुसार जाता येईल. मात्र, भाजपकडून कंबर कसून असलेले युवा उमेदवार, भाजयुमोचे राज्य उपाध्यक्ष पारेंद्र पटले यांची मात्र निराशा झाली आहे. प्रभाग क्रमांक 38 मध्ये गेल्या 10 वर्षांत भाजपची पाळेमुळे रुजविण्यात पारेंद्र पटले यांची भूमिका मोठी आहे. कोरोनाचा काळ असो किंवा परिसरातील सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम असो, प्रत्येक कार्यक्रमात पटले यांचा सहभाग महत्त्वाचा होता. प्रभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबीरे राबवून त्यांनी या प्रभागात भाजपला प्रत्येक घरात पोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मागील मनपा निवडणुकीत त्यांच्या आईचा निसटता पराभव झाला होता. ही उणीव त्यांनी मागील काही वर्षांतील कार्याने भरून काढली होती. त्यामुळे प्रभाग 38 मधून काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांना तगडी लढत देणारा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जात होते. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षातील सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना विशेष बळ दिल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, आरक्षणाने त्यांच्या प्रभाग 38 मधील त्यांच्या उमेदवारीचा विषयच संपुष्टात आणला.

पटले हे उत्तम कार्यकर्ता असल्याने त्यांनी प्रभाग 37 मधून लढण्याची तयारी ठेवली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रभाग 37 मध्ये ब ओबीसी आणि ड हा सर्वसाधारण साठी राखीव आहे. त्यामुळे या प्रभागात त्यांना संधी आहे. विशेष म्हणजे प्रफुल्ल गुडधे जेथून उमेदवारी दाखल करतील, तेथून ते लढू शकतात, असेही बोलले जात आहे. तरीही पक्षातील ज्येष्ठ नेते काय निर्णय घेतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.