
नागपूर(Nagpur) : खासदार महोत्सवाच्या सातव्या दिवशी गुरुवारी देशभरातील विविध राज्यांच्या लोककलांचा (संगीत आणि नृत्य) “मिट्टीके रंग” हा कार्यक्रम अप्रतिम आणि भव्यदिव्य असाच झाला. नृत्य, संगीत नियोजन, वेशभूषा, निवेदन हे सारंच अप्रतिम होतं. “मिट्टीके रंग”चं वर्णन करण्यास दोनच शब्द पुरे- भव्यदिव्य अन् अप्रतिम !
यात सादर झालेली सर्व समूहनृत्ये एकसे बढकर एक अशीच होती. यामुळे त्या त्या राज्याच्या मातीचा अस्सल सुगंध सतत येत होता. आसामपासून झारखंडपर्यंत प्रत्येकाची भाषा वेगळी, गाण्याची आणि नृत्याची शैली वेगळी, वेशभूषा वेगळी, सादरीकरणाची ढब वेगळी. तरीही, हा कार्यक्रम पाहताना व्यासपीठावर प्रत्येकवेळी काहीतरी आगळंवेगळं घडत आहे, असा संशय सुद्धा येत नव्हता, इतकं ते सलग वाटत होतं. याचं कारण, सारे विविधभाषी मुळातच एका सूत्रात बांधलेले आहेत अन् या अनोख्या सूत्राचं नाव आहे भारतीयत्व ! त्या एकाच रंगात सर्व राज्यांचे रंग विरघळून गेले होते. हा या कार्यक्रमाच्या यशस्वितेचा आधारस्तंभच म्हटला पाहिजे.
प्रसिद्ध वक्ता, लेखक आशुतोष अडोणी यांनी हिंदीत केलेलं संहिता लेखन अतिशय चपखल आणि प्रत्येक राज्याचं नेमकं वैशिष्ट्य उलगडणारं. सर्वभाषी लोककलांचा त्यांनी गुंफलेला मणिहार सर्वच कलावंतांनी सहजतेनं उचलून धरला. मुख्य म्हणजे, ही सर्व मुलंमुली आपली मराठी, स्थानिक असूनही त्यांनी असमियापासून कानडीपर्यंत विविध भाषांचा बाज असलेल्या कला, अस्सल वाटाव्या इतक्या ताकदीनं सादर केल्या आणि या देशाची ‘माटी’ आसेतु हिमाचल एकच असल्याचा पुन:प्रत्यय आणून दिला. याबद्दल हे सर्व एक हजारावर कलाकार आणि त्यांना प्रोत्साहित करणारे इतर सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत.
उत्तराखंडच्या पहाडी संगीतानं सुरू झालेला हा संगीत-नृत्याचा प्रवास “मिले सूर मेरा तुम्हारा”ने थांबला, तेव्हा रसिक प्रेक्षक तृप्त झाले होते. आसामचं बिहू नृत्य, तेलंगणाचं कुचिपुडी, गुजरातचा दांडिया, कर्नाटकचं कदुलू, राजस्थानचं घुमर, उत्तर प्रदेशातील ब्रजभूमीची होरी, पंजाबचं गिद्ध, बंगालचं छऊ, महाराष्ट्राची लावणी, गौळण, गोंधळ, कोळीगीत वगैरे 13-14 राज्यांचे 20-25 लोकनृत्य प्रकार अडीच तासात सादर करून संयोजकांनी उपस्थितांना “भारत दर्शन”च घडविलं आहे.
हजार-बाराशे कलावंतांना घेऊन एवढा मोठा पसारा मांडणं आणि तो यशस्वी करून दाखवणं, ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी सर्व संबंधितांनी गेला महिनाभर खूप मेहनत घेतली असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. कार्यक्रमाचे संयोजक गजानन रानडे, अमर कुळकर्णी, आनंद मास्टे, निवेदक श्रद्धा भारद्वाज, सनी प्रसाद, नेपथ्यकार सुनील हमदापुरे यांच्या नेतृत्वाखाली हे लोककलांचं शिवथनुष्य सर्वांनी मिळून समर्थपणे पेललं. त्यांना सहसंयोजक अवंती काटे, श्रीकांत धबडगावकर, कुणाल आनंदम (नृत्य), मोरेश्वर दशसहस्र, अथर्व शेष (संगीत) यांनी चांगली साथ दिली.ध्वनी-प्रकाश योजना संदीप बारस्कर यांनी सांभाळली. हा महाप्रकल्प उभा करण्यात डॉ. मृणालिनी दस्तुरे, मुकुल मुळे, प्रसाद पोफळी, नीरज अडबे, प्रदीप मारोटकर, शंतनु हरिदास, आसावरी गोसावी, अक्षय वाघ, संजय खनगई, स्मिता खनगई, रवी सातफळे, विनायक नंदेश्वर, मनोज श्रोती यांनीही मोलाचं योगदान दिलं. प्रत्येक नृत्याआधी केलं जाणारं बहुभाषी पारंपरिक वेशातील निवेदकांचं मनोगत अभिषेक बेल्लारवार, भाग्यश्री चिटणीस, मेघना गोरे यांनी प्रभावी रेखाटलं होतं.

एकूण, भारतीय लोकसंस्कृतीची ही गाथा एकत्रितपणे पुढे नेण्याच्या या कार्यात दोन हजार ते चोवीसशे हात लागले. त्यामुळे “जगन्नाथाचा हा रथ” वेगानं पुढे सरकत राहणं शक्य झालं. नागपूरच्या गजवक्र ढोलताशा पथकातील मुलामुलींनी प्रारंभी, मध्यंतरी आणि शेवटी असं तीनदा आपलं अचाट कौशल्य दाखविताना भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज आदींचा वारंवार जयघोष करून पटांगण दणाणून सोडलं.
या संपूर्ण उपक्रमाच्या मागदर्शक, संस्कार भारतीच्या विदर्भ प्रदेशाध्यक्ष कांचनताई गडकरी यांचा नितीनजींनी सत्कार केला तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावर प्रसन्न समाधान झळकत होतं. एक मोठी बातमी : महोत्सव समितीनं यंदाच्या शारदोत्सवात एक लाखाच्या वर महिलांच्या हातावर मेहंदी काढण्याचा उपक्रम राबविला होता. त्यातून 6 हजार महिलांना रोजगार प्राप्त झाला. याची दखल घेत संयुक्त राष्ट्रसंघानं (युनो) भारतातील मेहंदी परंपरेला नुकतीच जागतिक स्तरावर मान्यता दिल्याचं नितीनजींनी टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केलं, तेव्हा खासदार महोत्सवाचं महत्त्व आणि योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झालं. याचं कारण पुन्हा तेच- “अफलातून करी, ते गडकरी”
✍️विनोद देशमुख















