
सालोड(हि.) वासियांनी साकारला लोकसभाग व श्रमदानातून वनराई बंधारा
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन
सालोड(हि.)- दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत सालोड हिरापूर व कृषी विभाग यांचे संयुक्त विद्यमानाने साप्ताहिक श्रमदान या उपक्रमाखाली लोकसहभागातून नागठाणा रोडवरील अविनाश कुबडे यांच्या शेता जवळील नाल्यावर वनराई बंधारा साकारण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत सालोड हिरापूर तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत सालोड ही. ग्रामपंचायत मध्ये प्लास्टिक मुक्त अभियान, घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थींच्या घरावर रूफटॉप सौर ऊर्जा प्रकल्प बसविणे, दर शनिवारी साप्ताहिक श्रमदान अभियान, गृहकचरा विलगीकरण बाबत जनजागृती, साप्ताहिक आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिर, शिल्लक राहिलेल्या दिव्यांगाना ओळखपत्र वाटप करणे, साप्ताहिक आरोग्य शिबिर, लोकसभागातून वृक्षारोपण इत्यादी अभियान राबविण्यात आले आहे. सदर उपक्रमामुळे ग्राम विकासाची नवी दिशा दाखविण्यात आली. उन्हाळ्यामध्ये जमिनीवरील पाण्याची पातळी स्थिर राहावी , जनावरांना मुबलक पाणी मिळावे तसेच सदर पाणी शेतीसाठी उपयोगात यावे याकरिता वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात येते. यावेळी प्रामुख्याने सरपंच अमोल कन्नाके, उपसरपंच आशिष कुचेवार, ग्रामपंचायत अधिकारी देवर्षी बोबडे, कृषी सहाय्यक शुभांगी ढोले ग्रामपंचायत सदस्य मनिराम देवघरे, अतुल जुडे, सुरेश ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते सलीम पठाण, संजीव वाघ, कुणाल टिपले, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, बचत गट प्रतिनिधी, परिसरातील शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मध्ये पुढील अभियानामध्ये गावकऱ्यांनी सहभागी होऊन आपले गाव स्वच्छ, समृद्ध, हरित व सशक्त बनविण्याचे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी देवर्षी बोबडे यांनी केले आहे.















