‘नागपूर पुस्तक परिक्रमा’ला शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

नागपूर (Nagpur) 17 नोव्हेंबर :- 

भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय, महाराष्ट्र शासन, नॅशनल बुक ट्रस्ट आणि झिरो माईल युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “नागपूर पुस्तक महोत्सव 2025” चे भव्य आयोजन 22 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान रेशीमबाग मैदानावर करण्यात येत आहे.

मुलांमध्ये लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने तसेच, महोत्सवाच्या प्रचारासाठी ‘नागपूर पुस्तक परिक्रमा’ ही विशेष बस शहरातील शाळा व महाविद्यालयांना भेट देत आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकांचा प्रत्यक्ष अनुभव, नव्या साहित्याची ओळख आणि वाचनाचा आनंद देण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे.

या परिक्रमा बसने आतापर्यंत 100 पेक्षा अधिक शैक्षणिक संस्थांना भेट दिली असून प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पुस्तकांभोवती निर्माण झालेला हा उत्साह पाहता वाचनसंस्कृती अधिक बळकट होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

महोत्सवाच्या यशस्वितेसाठी झिरो माईल युथ फाउंडेशनचे संचालक प्रशांत कुकडे, समय बनसोडे आणि कल्याण देशपांडे यांचे सहकार्य विशेष उल्लेखनीय आहे.