विज्ञाननिष्ठ समाज निर्माण व्‍हावा – डॉ. अतुल वैद्य

0

विदर्भ गौरव प्रतिष्‍ठानच्‍यावतीने 24 संशोधकांचा सत्‍कार

नागपूर, 25 ऑक्‍टोबर
विदर्भातील छोट्या गावांमधून आलेल्‍या आणि अडचणींवर मात जागतिक पातळीवर स्थान निर्माण करणारे हे 24 संशोधक इतरांसाठी रोल मॉडेल आहेत. या संशोधकांनी येथेच न थांबता प्रत्‍येकाने किमान दोन विज्ञाननिष्‍ठ व्‍यक्‍ती तयार करून समाजाला विज्ञाननिष्‍ठ बनवावे आणि देशासाठी दोन नवे तंत्रज्ञान विकसित करावे, असे आवाहन लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले.
अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगातील अव्वल दोन टक्के शास्त्रज्ञांमध्ये निवड झालेल्या नागपूर व विदर्भातील २४ शास्त्रज्ञांचा सत्कार सोहळा शनिवारी टॅमराईड हॉल येथे उत्साहात पार पडला. विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित या सोहळ्यास विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य होते तर प्रमुख पाहुणे कृष्‍णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्‍सेस कराडचे प्रमुख सल्‍लागार प्रा. डॉ. वेदप्रकाश मिश्रा, नीरीचे संचालक डॉ. वेंकट मोहन प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थ‍ित होते. मंचावर विदर्भ गौरव प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष डॉ. गिरीश गांधी, अॅड. फिरदोस मिर्झा, अतुल दुरुगकर व नीलेश खांडेकर यांची उपस्‍थ‍िती होती. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते शास्‍त्रज्ञांचा शाल, श्रीफळ व स्‍मृतिचिन्‍ह देऊन सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी ‘नागपूरचा गौरव: विज्ञानरत्‍न’ या पुस्तिकेचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.
डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी समाजविकासात विज्ञानाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. विज्ञानाचा विकास हाच समाज विकासाचा मापदंड असून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन अंगी बाणवणे ही असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधकांचा सत्कार हा व्यक्तीचा नाही तर त्यांनी स्वीकारलेल्या तर्काधारित समाज निर्मितीच्या जबाबदारीचा गौरव आहे. विज्ञान हा विषय नसून जीवनपद्धतीचा भाग व्हावा. तुम्हीच समाजाचे रोल मॉडेल आहात आणि नागपूरचे हे विज्ञानातील प्राईड आहे,” असे ते म्हणाले.
प्रास्‍ताविकातून डॉ. गिरीश गांधी यांनी संशोधकांच्‍या सत्‍कारामागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचा सूत्रसंचालन शुभदा फडणवीस यांनी केले तर नीलेश खांडेकर यांनी आभार मानल.

चार पिढ्यांचा सन्‍मान
सत्‍काराला उत्‍तर देताना डॉ. संजय ढोबळे यांनी या सोहळ्यात संशोधकांच्‍या चार पिढ्यांचा विदर्भ गौरव प्रतिष्‍ठानतर्फे सन्‍मान करण्‍यात आल्‍याबद्दल डॉ. गिरीश गांधी यांचे धन्‍यवाद मानले. हा सर्व संशोधकांसाठी सुवर्णयोग असल्‍याचे ते म्‍हणाले. संशोधनासाठी प्रचंड मेहनत, वेळ आणि आर्थिक साहाय्याची गरज असते. आर्थिक सहाय मिळाल्‍यास संशोधकांच्‍या अनेक समस्‍या सुटू शकतात, असे ते म्‍हणाले. यावेळी डॉ. आशा जुवारकर यांनीदेखील आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

या 24 संशोधकांचा झाला सन्‍मान
विदर्भ गौरव प्रतिष्‍ठानच्‍यावतीने अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगातील अव्वल दोन टक्के शास्त्रज्ञांमध्ये निवड झालेल्या नागपूर व विदर्भातील २४ शास्त्रज्ञांचा सत्कार करण्‍यात आला. त्‍यात डॉ. तनवीर आरफीन, डॉ. आशिष बढिये, डॉ. मकरंद बल्‍लाळ, डॉ. अमीत बाफना, डॉ. भारत भानवसे, डॉ. तौसिफ दिवाण, डॉ. संजय ढोबळे, डॉ. एम. डी. गोयल, डॉ. आशा जुवारकर, डॉ. नीती कपूर, डॉ. अरविंद कुमार, डॉ. सुनील कुमार, अंकित लढ्ढा, डॉ. सचिन मांडवगणे, डॉ. एस. व्‍ही. मोहरील, डॉ. वेंकट मोहन, डॉ. चंद्रहास्‍य नंदनवार, डॉ. पी. व्‍ही, निधीश, डॉ. प्रदीप राउल, डॉ. बाबासाहेब संकपाळ, डॉ. श्रीराम सोनवणे, डॉ. जितेंद्र टेंभुर्णे, डॉ. के. एल. वासेकर व डॉ. अतुल येरपुडे यांचा समावेश होता.