शाळाबाहय 180 बालकांना शाळेत प्रवेश

0

शाळाबाहय 180 बालकांना शाळेत प्रवेश

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने घेतला शिक्षणापासून वंचित बालकांचा शोध

नागपूर दि. 6 :   जिल्हयातील आर्थिक अथवा अन्य कारणांमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर तर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डी. पी. सुराणा यांचे मार्गदर्शनाखाली या मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरचे सचिव तथा न्यायाधीश सचिन पाटील यांनी तीन विधी स्वयंसेवक यांचे विशेष पथक स्थापन केले.

या मोहिमेअंतर्गत नागपूर शहर व नागपूर ग्रामीण भागातील विविध वाड्या, वस्त्या, झोपडप‌ट्टी, आदिवासी पाडे आणि स्थलांतरित लोकांच्या वस्त्यांमध्ये विधी स्वयंसेवक मुकुंद आडेवार, मुखाहीद खान व राजरतन वानखेडे यांचे पथक जिल्हा परिषदेचे बालरक्षक समन्वयक प्रसेनजित गायकवाड यांच्यासोबत प्रत्यक्ष भेटी देऊन शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचा शाळेत प्रवेश करण्याची प्रक्रीया सुरू केली. तसेच नागपूर शहर व ग्रामीण भागांमध्ये जावून नागरीकांमध्ये बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार या कायद्याबाबतदेखील जनजागृती करण्यात आली. पूर्वी शाळेत दाखल असलेल्या, परंतु काही कारणांमुळे सध्या शाळेत न जाणा-या बालकांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांमध्ये प्रबोधन करण्यात आले. मोहीमेदरम्यान अशा बालकांना शाळेत नियमित उपस्थित राहण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यास संबंधित मुलांच्या पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

जास्तीत जास्त शाळाबाहय व शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या पालकांना प्रेरीत करण्यासाठी संबंधित शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. मोहिमेदरम्यान नागपूर शहरातील 102 व ग्रामीण भागातील 78 अशा शिक्षणापासून वंचित असलेल्या एकूण 180 बालकांना शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामध्ये कधीही शाळेत न गेलेले 55 आणि मध्येच शाळा सोडलेले 125 मुला मुलींचा समावेश आहे. त्यापैकी 3 मुले व 2 मुली अपंग आहेत.

मुलींचे प्रमाण लक्षणीय

            सर्वेक्षण करतेवेळी शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिक्षणापासून वंचित मुलींना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी विशेष भर देण्यात आला. तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य देणेसाठी देखील विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

एकल पालक मुलींना आर्थिक मदत

मोहिमेअंतर्गत गौतमनगर, गि‌ट्टीगोदाम येथील दोन एकल पालक मुलींना शासनाच्या सावित्रीबाई फुले संगोपन योजनेची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विधी स्वयंसेवक पथकाने मदत केली. तसेच मुलांकरीता असलेल्या शासकीय शिष्यवृत्ती योजनांची देखील पालकांना माहीती देण्यात आली.

मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव तथा न्यायाधीश सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे बालरक्षक समन्वयक प्रसेनजित गायकवाड, विधी स्वयंसेवक व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.