Home Artical Blog ही कसली निवडणूक…??? सब गोलमाल… भाग – १

ही कसली निवडणूक…??? सब गोलमाल… भाग – १

0
विदर्भ साहित्य संघाची निवडणूक पोस्टल बैलेट पद्धतीनं होते. म्हणजे काय…??? तर मतदार यादीत ज्या सभासदांची नावं पत्त्यासह प्रकाशित झाली आहेत, अशा मतदारांच्या पत्त्यावर बैलेट पेपर पाठवला जातो… निवडणूक निर्णय अधिकारी गोपनियतेचा अवलंब करीत हा बैलेट पेपर पोस्टाच्या माध्यमातून रवाना करतात. हे बैलेट पाकीट मतदार सभासदाच्या पत्त्यावर (म्हणजे मतदार यादीत नमूद पत्त्यावर पोहचतं.) या बैलेट पाकीटात परतीच्या टपालाकरिता कोणतंही टपाल तिकीट न लावलेलं वि. सा. संघाच्या निवडणूक अधिका-यांच्या नावे, साहित्य संघाच्या सीतावर्डी स्थित मुख्यालयाचा संपूर्ण टपाली पत्ता असलेलं एक पाकीट आहे. याशिवाय, अध्यक्ष पदासाठीच्या सर्व ( एकूण संख्या ५) उमेदवारांची एक लाल रंगाचं बैलेट आणि कार्यकारिणी सदस्यपदाकरिता उभ्या असलेल्या सर्व (एकूण ८३) उमेदवारांची उपनामाच्या आद्याक्षरानुसार छापील पांढ-या रंगाचं बैलेट आणि मतदारांना मतदान कसं करावं, यासाठी मार्गदर्शक सूचनांचं एक माहिती पत्रक पाठविण्यात आलं आहे. याच माहिती पत्रकाच्या मागे मतदान पत्रिका मतपेटीत टाकण्याकरिताचे प्राधिकार पत्र छापण्यात आलं आहे.
या प्राधिकार पत्रानुसार बैलेट कलेक्टरचे (कैरियर) नाव, स्वत:चं नाव, मतदार यादीतला सभासद क्रमांक लिहून स्व स्वाक्षरीसह, मतदार संबंधित बैलेट कलेक्टरला मतदान पत्राचा बंद लिफाफा बैलेट बॉक्समध्ये टाकण्याकरिता प्राधिकृत करीत आहे, असा या प्राधिकार पत्राचा अर्थ आहे…
निवडणूक अधिका-यांनी हे स्पष्ट केलं आहे, की, तीन प्रकारे मतदान करता येईल… १) मतदान पत्रिका स्वखर्चाने टपालाने/स्पीड पोस्टने/कुरियरने पाठवता येईल. २) नागपुरातील वि.सा.संघ कार्यालयात स्वत: उपस्थित राहून आपले ओळख पत्र प्रस्तुत करुन बैलेटचा बंद लिफाफा मत पेटीत टाकता येईल. किंवा, ३) प्राधिकृत केलेल्या व्यक्तिच्या माध्यमातून, स्व ओळख पटवून बैलेट मतपेटीत टाकता येईल,..या करिता मात्र मतदात्याला मतदान यादीतील आपला सभासद क्रमांक, नाव आणि स्वाक्षरी प्राधिकृत पत्रावर करणे अनिवार्य करण्यात आलं आहे.
मतदानकर्त्याला आपल्या पसंतीच्या अध्यक्ष पदाच्या एका आणि कार्यकारिणी सदस्य पदाकरिता उभे असलेल्या २२ नावांच्या पुढे केवळ राईट मार्क पेनाने करायचा आहे…. २३ वा मार्क झाला, तर मतदान अवैध… बावीसपेक्षा कमी राईट मार्क असले तर मात्र मतपत्रिका अवैध होणार नाही… राईट मार्क शिवाय कोणतीही अन्य खूण, सही आदी केले, तरी मतदान अवैध, हे नक्की…
याठिकाणी एक बाब स्पष्ट होऊ शकलेली नाही, की मतपेटीत बैलेट टाकण्याकरिताची वेळ काय…??? प्राधिकृत करण्यात आलेली एक व्यक्ती किती, किंवा कितीही मतपत्रिका टाकू शकते काय…???
या प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर गोलमाल नाही का…??? प्रत्येक दिवसाची मतपेटी वेगऴी असेल, की मतपेटी पूर्ण भरेपर्यंत वापरली जाईल, आणि नंतर ती बदलली जाईल… गैरप्रकार टाळण्याकरिता CCTV लावलेले असतील का…???? पैनल प्रतिनिधी मतपेटीच्या निगराणीकरिता मुक्कामी असतील का….??? हे असे प्रश्न, याकरिता, की यंदाची निवडणूक सर्वार्थानं वेगळी आहे… अटीतटीची आहे…. सारस्वतांनी कधी नव्हे ती लंगोट कसलीय्….शड्डू ठोकलाय…
जी माहिती चहू दिशांनी कानी येतेय त्यानुसार सर्वच्या सर्व पैनल्स (कुणाचाही अपवाद नाही) हे दोन्ही बैलेट, प्राधिकार पत्र आणि परतीचा टपाल तिकीट न लावलेला लिफाफा आपल्या ताब्यात घेण्याच्या पूर्ण प्रयत्नात आहेत. को-या मतपत्रिका आम्हाला सोपवा, मतदानाचं पुण्यकर्म पार पाडलं जाईल, असा विश्वास मतदारांना दिला जातोय… मतदाराच्या ओळखीची यंत्रणा कामी लागलीय….अमूक एका व्यक्तीला, उमेदवाराला, पैनलला मतदानाकरिता हा सारा खटाटोप चाललाय्…. हे असं कोणत्या नैतिकतेत बसतं….????
या प्रश्नावर अनेकांचं उत्तर एकच आहे, की, बैलेट मतदान असंच होतं… वर्षानुवर्षे असंच होत आलंय्… या अशा प्रकारे जर बैलेट मतदान होत असेल, तर या प्रकाराचं समर्थन करता येईल…??? विवेकी-विचारी- शहाणा-शिक्षित-आणि संविधान संमत वर्तनाचा सतत उद्-घोष करणारा विचारवंत मतदार या अशा मतदान प्रक्रियेशी सहमत आहे…???? याचा अर्थ स्पष्ट, ज्याच्याजवळ बैलेट गोळा करण्याचं सामर्थ्य, यंत्रणा, कौशल्य आहे, विजय त्याचाच आहे… पटतं…???
वि. सा. संघाची ही निवडणूक आणि विशेषत: निवडणूक प्रक्रियेत झोल आहे. काही उदाहरणं मी प्रस्तुत करतो..
अ) मतदार सभासदांच्या नागपूर शहराच्या मूळ संपूर्ण सूचीत एकूण १६१ पाने आहेत, आणि मतदारांची संख्या ३६१० आहे. नागपूर शहर वगळून विदर्भाच्या यादीत १७७ पाने आहेत, आणि मतदारांचा आकडा जिल्हा आणि गावश: विभागून आहे ( एकत्रित सभासद आकडा नमूद नाही.) या याद्यांचा बारकाईनं अभ्यास केला, तर लक्षात येतं, की याद्या अपूर्ण आहेत. अक्षरश: शेकडो सभासद नावं अशी आहेत, की, सभासद नमूद पत्त्यावर निवासीच नाहीत. अनुभव असा आहे, की शेकडो पत्रं, या मुळे पैनल्सना परत आली… श्री. गिरीश गांधी, किंवा श्री. प्रदीप दाते, किंवा डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, किंवा डॉ. रवींद्र शोभणे किंवा श्री.रंजन दारव्हेकर याबद्दलची अनुभवसिद्ध साक्ष देऊ शकतील. आता मुद्दा असा, की, याद्यांमध्ये ही जी अपूर्णता आहे, त्याची जबाबदारी कुणाची..??? कोण देणार उत्तर…??? कुणाला विचारायचे प्रश्न…???
निवडणूक अधिका-यांचं म्हणणं स्पष्ट आहे, ते म्हणतात, संघानं आम्हाला मतदार यादी दिली. यादीनुरुप काम सुरु आहे… जे पत्ते यादीत आहेत, त्या पत्त्यांवर टपालानं बैलेट रवाना करण्यात आले. विविध पैनल्सचा अनुभव लक्षात घेता, शेकडो पत्र, NOT FOUND या शे-यासह परत आली. म्हणजे बैलेटही परत येणार… हे बैलेट पाकीट साहित्य संघात कुणीही न पळवता सुरक्षित परत यावं याकरिता निवडणूक यंत्रणेचा पुढाकार आहे काय…??? याकरिताची उपाय योजना काय…??? NOT FOUND श्रेणीतल्या बैलेटची चोरी होणार नाही, याबाबतची हमी काय…?? निवडणुकीच्या रिंगणातील विविध पैनल्स याबाबतीत सजग आहेत काय… ??? या मंडळींनी कोणती दक्षता घेतली आहे काय…??? सगळंच अनुत्तरीत. जगाच्या पाठीवरील सगळ्या मोठ्या आपल्या चुनाव समृद्ध देशात ही छटाकभर निवडणूक मतदान शुचितेचे सगळे प्रस्थापित संकेत धाब्यावर बसवून होत आहे… बरोबर ना…ॽ
या निमित्तानं अपूर्णतेचे काही नमुने मी प्रस्तुत करतोय…
१) नागपूर शहर यादी / पान ४३- सभासद संख्या ९५२
चक्रवर्ती मधुमिता सुजितकुमार
(पत्ताच नमूद नाही… बोला, काय करायचं…)
२) नागपूर शहर यादी / पान ४४ – सभासद संख्या ९७४
चाटे अश्विनी अशोक, शिवाजीनगर, नागपूर – १०
(कुठं शोधायचं…??? घराघरात चौकशी करायची का.., की दवंडी पिटायची…???? )
३) नागपूर शहर यादी / पान ४२ – सभासद संख्या ९२६
घारे श्याम, गिरीपेठ, नागपूर -१०
( कसं शोधायचं श्याम भाऊंना…??? वेणू वादन करायचं…??? )
अशी अनेक उदाहरणं आहेत… शेकडोनं आहेत….किती सांगायची.???
ब) आत्ता मान्यवरांच्या निवासी पत्त्यांची उदाहरणं देतो –
१) नागपूर शहर यादी / पान २४ – सभासद संख्या ५३१
कुळकर्णी बळवंत जनार्दन,
१७२, छत्रपती नगर, नागपूर – १५
हे मान्यवर आहेत बाळ कुळकर्णी… आपले पूर्व संपादक, लोकमत… मी बाळाजींना विचारलं याबद्दल, ते म्हणाले, मी १९९२ सालीच या पत्यावरुन एक्झिट केलं. आता २०२६ सुरु आहे… बाळाजी संघात नियमित जातात…आता काय बोलायचं…????
आणखी एक दाखला देतो.
२) नागपूर शहर यादी / पान ९७ / सभासद संख्या – २१५६
पांडे शैलेन्द्र हरिप्रसाद
१४०, बडगे भवन, लेंढरा पार्क, रामदासपेठ, नागपूर – १०
हे मान्यवर वर्तमानात आहेत दैं. तरुणभारतचे समूह संपादक. लोकसत्ता, सकाळ, लोकशाही वार्ता आदी दैनिकाक संपादक पदाची जबाबदारी सांभाळून पांडे साहेब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रसिद्धी सहाय्यकही राहिले… शैलेद्रजींशी मी बोललो. त्यांचा रिप्लाय होता, मी १९९४ सालीच बडगे भवन सोडलं….
अशीच आणखी ही उदाहरणं लिहू का….???
क) संघाच्या या निवडणुकीत मतदानाकरिता दिवंगतही स्वर्गातून पृथ्वीरोहण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, दिवंगतांचीही नावं या मतदार यादीत आहेत… लिहुन क्या, ही दिवंगत मंडळीही मतदान करणारच….
याविषयीच्या आणि आणखीही चमत्कारिक वृत्तांताकरिता माझ्या पुढच्या विदर्भ साहित्य संघ फाईल्स – ३, ही कसली निवडणूक प्रक्रिया…??? सब गोलमाल… – भाग – २ ची वाट बघा….
मी आधीच स्पष्ट केलंय्, की मी सत्य सांगेन, तथ्य मांडेन… पुराव्याशिवाय एकही अक्षर लिहिणार नाही.. माझा कुणावरही कोणताही आरोप नाही…. मी पत्रकार आहे, प्रश्न विचारणं माझा नैतिक अधिकार आणि कर्तव्य आहे… मी स्वयंसेवक पत्रकार आहे, त्यामुळे राष्ट्र सर्वप्रथम या कर्तव्याचीही मला नम्र जाणिव आहे. मी माझा अधिकार आणि कर्तव्य बजावणार… माझी विनंती आहे आपल्याला, मतदान पत्रिका घाईनं मार्क करु नका….कुणालाही मुळीच देऊ नका…. पोस्ट करू नका… समग्र विचार करा… माझं वृत्त लेखन कृपा करुन वाचा…आपणही व्यक्त व्हा… आणि नंतर काय घ्यायचा तो निर्णय विवेकानं घ्या… माझ्या लिखाण पूर्तीकरिता मला ८-१० दिवसांचा वेळ द्या… मी सगळं सविस्तर लिहीन, हा शब्द….
श्री रवी गुळकरी यांच्या फेसबुक वाॅलवरून साभार
श्रीगुरुदेव दत्त
@ निसर्गदत्त
दि. २३/०२/२०२६