Home Breaking news विदर्भ साहित्य संघ फाईल्स – १

विदर्भ साहित्य संघ फाईल्स – १

0
विदर्भ साहित्य संघाची २०२५ – ३१ निवडणूक विविध कारणांनी कधी नव्हे इतकी चर्चेत आहे. मुद्दे वेगवेगळे आहेत…. श्री. गिरीश गांधी यांची उमेदवारी, माझ्या उमेदवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पाठिंबा आहे, असा गांधींकडून झालेला कथित प्रचार, या प्रचारावर नितीनजींनी जारी केलेल्या खुलाश्याची धूळ खाली बसते न बसते तोच नवी राजकिय हस्तक्षेपाची बातमी समोर आली….
या बातमीनुसार भाजपाई संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकरांच्या निवडणूक प्रक्रियेतील राजकिय हस्तक्षेपाबाबत अक्षरमित्र पैनलने आरोप केले. या आरोपांवर डॉ. कोठेकरांनी खुलासाही केला. डॉ. कोठेकरांच्या खुलाश्यानंतर सध्यातरी धुराळा शांत आहे, मात्र श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी याबाबत नितीन गडकरी महोदयांना पुन्हा पत्र लिहून प्रकरणात गडकरींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय्….
नितीनजी आता यात लक्ष घालतील, अशी शक्यता नाही. दरम्यान, गडकरी यांच्या कथित पाठिंब्याला विरोध करणा-या श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नितीन राऊत यांनी दिलेला पाठिंबा स्विकारला, या पाठिंब्याचं समर्थन केलं. मला इथं नमूद केलं पाहिजे, की गडकरी साहित्य संघाचे आजीवन सभासद तरी आहेत, राऊत तर सभासदही नाहीत, तरीही श्रीभाजो मात्र राऊत यांच्या समर्थनाचं समर्थन करताहेत…
डॉ. रवींद्र शोभणे यांच्या मते साहित्यिकच संघाचा अध्यक्ष असला पाहिजे, इथं पासून मीच कसा एकटा साहित्यिक, अशी पिपाणी शोभणे यांनी वाजवली. असेच काहीसे मुद्दे उपस्थित करुन डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी या निवडणुकीत शड्डु ठोकला आहे. श्रीभाजो यांना व्यावसायिक व्यक्ती वि. सा. संघाच्या अध्यक्षपदी नकोय्… ती का नको, गांधींना ते का डिस्-क्वालिफाय मानतात, श्रीमान गांधींचा असा कोणता पुर्वेतिहास आहे, की जोशी विरोध करताहेत, याची सबळ कारणं गांधींचे सख्खे मित्र असणा-या श्रीभाजोंनी टाळली आहे… गांधींना त्यांचा विरोध मात्र कायम आहे.
डॉ. पिनाक दंदे या चळवळ्या महाशयांनी संपादकांची फळी रिंगणात उतरवून निवडणुक रंगतदार केली आणि वेळ येताच दाते-मानेकरांच्या पैनल बरोबर समझौता घडवून निवडणुक गांभिर्यानं घेतली, हा संकेतही दिला. रंगकर्मी रंजन दारव्हेकर यांची एकपात्री प्रयोगाची तालीम सध्या आरश्यासमोर उभं राहून ते स्वत: एकटेच करताहेत, आणि आणि आपलीच तालीम आपणच बघताहेत. अशा जिगरीला साधना लागते, ती त्यांच्याकडे आहे..
या निवडणुकीत गठ्ठा मतांचे मोटामोटी तीन भाग आहेत. ‘सप्तक’वाली मतं, ‘व्हिसीए’वाली मतं आणि श्री.आशुतोष शेवाळकरांनी ‘वि. सा. संघाच्या आजीव सभासद क्लबला’ बळकट करण्याकरिता अमराठी-व्यावसायिक-धंदेवाईक लॉबीला आजीव सदस्य करुन घेतलेली मतं, असे हे मतदारांचे हुकुमी तीन भाग आहेत. रंजन दारव्हेकर यांच्या एकपात्री प्रयोगासह साडेतीन पैनलची ही निवडणूक आता सारस्वत जगतात चर्चेचा विषय झाली आहे.
या निवडणुकीत मुद्द्यांवर कोणतीही ठोस चर्चा नाही. ही चर्चा कुणालाही करायची नाही. जी काय चर्चा आहे, ती वरवरची आहे. या चर्चेतील मुद्दे फारसे गांभीर्याचे नाहीत, असं मत जाणकारांचं आहे. चर्चा तर अशीही आहे, की कुणालाही साहित्य संघाशी निगडीत मुलभूत मुद्यांवर चर्चा करायचीच नाही. माध्यमांमध्येही जी चर्चा होतेय, ती उथळ आहे, आणि त्यामुळेच पत्रकाराचं निहित कर्तव्य बजावण्याकरिता ही मालिका मी लिहित आहे.
एक बाब मी प्रामुख्यानं स्पष्टपणे नमूद करु इच्छितो, की, मी जे काही लिहिन, ते सप्रमाण असेल. लॉजिकल असेल. साहित्यप्रेमी नागरिक या नात्यानं माझ्या सारख्या सामान्यांना पडणारे प्रश्न आणि मुद्दे मी उपस्थित करणार आहे. फुकाचं मी काहीही लिहिणार नाही. जे काही लिहिन ते सप्रमाण असेल. मुद्द्यांवर लिहिन. मतदारांमध्ये जाणिव-जागृती करणे, हा यामागचा हेतू आहे.
हे लिखाण करताना पत्रकार या नात्यानं मी संबंधितांशी संवाद साधणार आहे. ई मेल किंवा वॉटस् एपच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन हा संवाद केला जाईल. प्रश्न विचारले जातील. आरोपाचा पुरावा मागीतला जाईल. आणि संबंधितांचा त्या विषयीचा जबाबही माझ्या लिखाणातून स्पष्टपणे नोंदवला जाईल.
विश्वास हा आहे, की निवडणूक आणि विदर्भ साहित्य संघाशी संबंधित सर्व मान्यवर सहकार्य करतील, लोकशाहीच्या मार्गानं संवाद करतील.
‘विदर्भ साहित्य संघ फाईल्स’ ची प्रस्तुती दृक्श्राव्य असावी, या करिताही प्रयत्न आहे, मात्र याकरिता संबंधितांची ऑन कैमेरा बोलायची तयारी हवी. संबंधितांनी बोलावं, याकरिता प्रयत्न आहेत.
१०३ वर्षांच्या या संस्थेच्या कार्यकारिणी आणि अध्यक्षपदाकरिता जवळ जवळ २ दशकानंतर होणारी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. मतदार विवेकी-सुसंस्कृत- उच्चशिक्षित-प्रतिष्ठित-प्रगल्भ-सारासार आणि जातीपातीचा विचार न करणारा आहे, अशी धारणा आहे. माय मराठीची सेवा करण्याचं साहित्य संघ हे एकच माध्यम आहे, अशी मराठी साहित्यिकांचा आणि सारस्वतांची पक्की धारणा असल्यानं यंदा उमेदवारीचा उच्चांक आहे. या निवडणुकीला जिल्हा परिषद – ग्रामपंचायत निवडणुकांची /अव/ कळा आलीय्.
मतचोरीची बोंब देशात होत असताना या निवडणुकीत एकगठ्ठा मतपत्रिका गोळा करायला सारस्वत मंडळी आणि त्यांचे निवडणूक शिलेदार जुंपले आहेत. ‘मतदाता के घर बैलेट’, जिसमें दम, वह मतदाता के घर पहुँचकर उठा ले बैंलेट’वाली ही निवडणूक कशी ??? हाच मुलभूत प्रश्न आहे.
श्रीगुरुदेव दत्त
@ निसर्गदत्त
दि. २२/०२/२०२६
श्री रवी गुळकरी यांच्या फेसबुक वाॅलवरून साभार