Home Artical Blog मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे

मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे

0

चंद्रपूर(Chandrapur) :
आज सकाळी सिंदेवाही वनक्षेत्रातील गुंजेवाही परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मागील पाच वर्षांत (२०२१ ते २०२५) चंद्रपूर जिल्ह्यात वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल २०० नागरिकांचा मृत्यू झाला असून, २०२६ या वर्षातील केवळ पाच महिन्यांतच १९ जणांचा बळी गेला आहे. एकूण २१९ मृत्यू हा केवळ आकडा नसून उध्वस्त झालेल्या कुटुंबांची संख्या असल्याचे धोतरे यांनी नमूद केले.
“सानुग्रह मदतनिधी देणे किंवा त्यात वाढ करणे हा पर्याय नसून मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाय अमलात आणणे गरजेचे आहे. शासनाने कठोर आणि प्रभावी निर्णय घेणे आवश्यक आहे. चंद्रपूर जिल्ह्याकडे सातत्याने दुर्लक्ष करून चालणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, “सर्वाधिक मानव-वन्यप्राणी संघर्ष आणि मृत्यू होणारा जिल्हा अशी चंद्रपूरची ओळख निर्माण होणे अत्यंत दुर्दैवी आहे. २०२० मध्ये राज्य सरकारने गठीत केलेल्या राज्यस्तरीय चंद्रपूर जिल्हा वाघ-मानव संघर्ष समितीचा अहवाल प्राप्त होऊन पाच वर्षे उलटली, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.”
ब्रह्मपुरी वनविभागातील वाघांची संख्या ही त्या भागाच्या ‘केरिंग कॅपिसिटी’पेक्षा तिप्पट असल्याचे सांगत त्यांनी या भागातील वाघांची संख्या, अधिवास आणि संघर्षाच्या घटनांचा सखोल अभ्यास करून तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी केली.
दरम्यान, जिल्ह्यात वाढत्या मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी “अन्नत्याग सत्याग्रह” आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.