Home Artical Blog भारताची जागतिक प्रतिमा मजबूत करण्यासाठी मोदींचे प्रयत्न महत्त्वाचे : शरद पवार

भारताची जागतिक प्रतिमा मजबूत करण्यासाठी मोदींचे प्रयत्न महत्त्वाचे : शरद पवार

0

मुंबई(Mumbai): राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक भूमिका मांडत देशाच्या सन्मानाच्या प्रश्नावर राजकारण टाळले पाहिजे, असे मत व्यक्त केले. पुण्यात पार पडलेल्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना वेग आला आहे.
लक्ष्मणराव गुट्टे रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी आपल्या राजकीय आयुष्यातील अनेक अनुभव शेअर केले. राजकीय मतभेद असले तरी देशहित सर्वोच्च असते, हे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, भारताची जागतिक पातळीवरील प्रतिमा अधिक मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत आणि त्याची दखल घेतली पाहिजे.
या मेळाव्यात मंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर, जयकुमार रावल, रणजितसिंह मोहिते पाटील, यांच्यासह अनेक माजी युवक राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित होते. भाषणादरम्यान शरद पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासातील आठवणींनाही उजाळा दिला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातून प्रेरणा मिळाल्याचे सांगताना त्यांनी बारामती युवक काँग्रेसपासून सुरू झालेल्या आपल्या राजकीय वाटचालीचा उल्लेख केला. तसेच जवाहरलाल नेहरू यांच्याशी झालेल्या भेटीचा किस्साही त्यांनी सांगितला. इंदिरा गांधी यांच्या रशिया दौऱ्यातील एका प्रसंगाचा उल्लेख करताना त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. स्वागतासाठी अधिकारी वेळेवर उपस्थित नसतानाही इंदिरा गांधी यांनी संयम राखत लहान मुलांमध्ये मिसळून संवाद साधला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली.
शरद पवार यांच्या या विधानांमुळे विरोधी राजकारणाच्या चौकटीपलीकडे जाऊन देशाच्या प्रतिमेबाबत सकारात्मक भूमिका घेण्याची गरज पुन्हा चर्चेत आली आहे.

मोदी भारताची जागतिक प्रतिमा जपत आहेत'; शरद पवारांच्या वक्तव्याने राजकीय  चर्चांना उधाण - Deenbandhu