

२५ लाखांच्या प्रलंबित बिलांसाठी ७० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
नागपूर (Nagpur) :-
ABC ने नागपूरातील जल संधारण मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर मोठी कारवाई करत अधीक्षक अभियंता रवींद्र नीलकंठराव वानखेडे यांना ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. अजनी येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र वानखेडे हे जलसंपदा विभागाच्या यांत्रिक विभागात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार हा जलसंपदा विभागात नोंदणीकृत कंत्राटदार असून, त्याने नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात केलेल्या सुदृढीकरण कामांची सुमारे २५ लाख रुपयांची बिले मंजुरीसाठी अजनी येथील कार्यालयात सादर केली होती. यामध्ये भंडारा येथील १० लाख रुपये आणि नागपूर येथील १५ लाख रुपयांच्या कामांचा समावेश होता.
ही प्रलंबित बिले मंजूर करून देण्यासाठी तसेच पुढील नवीन निविदांना मंजुरी देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. कंत्राटदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचत अजनी येथील कार्यालयात कारवाई केली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आरोपी रवींद्र वानखेडे यांना त्यांच्या कार्यालयातच ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईदरम्यान आरोपीकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, त्यांच्याकडून अतिरिक्त ३६ हजार ६३० रुपयांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.
या प्रकरणी धंतोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. एसीबीच्या या धडक कारवाईमुळे शासकीय विभागांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

















