

सुप्रसिद्ध गायक-गायिका आणि महिमा वाचक सुरभी दीदी यांच्या उपस्थितीत भक्तिमय सोहळा रंगणार
नागपूर (Nagpur):- धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात भक्तिरसाची अनुभूती देणाऱ्या भव्य ‘कृष्ण भक्ती संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन येत्या १३ जून २०२६ रोजी नागपुरात करण्यात आले आहे. परमहंसपूज्य डॉ. पवन सिन्हा ‘गुरुजी’ यांच्या शिष्यांच्या वतीने आयोजित या विशेष भक्तिमय कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती लाभण्याची शक्यता आहे.
हा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता सिव्हिल लाईन्स परिसरातील डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल हॉल येथे पार पडणार आहे. भक्ती, संगीत आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम असलेल्या या कार्यक्रमात विविध नामवंत गायक आणि कलाकार आपल्या सादरीकरणातून उपस्थितांना भक्तीरसात तल्लीन करणार आहेत.
कार्यक्रमात प्रसिद्ध गायक डॉ. संजय अंद्रूकर, गायक भाई करण मल्होत्रा, गायिका सुरभी त्यागी मेहरा आणि युवा गायक आस्तिक सिन्हा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच महिमा वाचक म्हणून सुरभी दीदी भक्तीमय वातावरण निर्माण करणार आहेत. कृष्ण भक्तीवर आधारित भजन, कीर्तन आणि आध्यात्मिक संदेशांचा अनोखा अनुभव या कार्यक्रमातून भाविकांना मिळणार आहे.
या भक्ती संध्याचे आयोजन पावन चिंतन धारा आश्रम, नागपूर इकाई यांच्या वतीने करण्यात आले असून, कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. आयोजकांनी भाविकांसाठी QR कोडद्वारे नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
कार्यक्रमास नागपूर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिमय वातावरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी डॉ. संजय अंद्रूकर, श्रेयस अंद्रूकर, रुपाली कांबळे आणि पंकज हजारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

















