

नागपूर(Nagpur): दि. २१ मे २०२६: आज गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एका खाजगी जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे शहरातील मोठ्या भागाला वीज संकटाचा सामना करावा लागला. ताज बाग रोडवरील जाफरी हॉस्पिटलजवळ सुरू असलेल्या खोदकामादरम्यान, ३३/११ केव्ही सूतगिरणी उपकेंद्रातून निघणारी ११ केव्ही रघुजी नगर फीडरची उच्च दाब (High Tension) भूमिगत केबल जेसीबी ने पूर्णपणे छिन्नविछिन्न केली.
यामुळे ३३/११ केव्ही सूतगिरणी उपकेंद्रातील ११ केव्ही इनकमरमध्ये (Incomer) मोठा विद्युत स्फोट झाला. या तांत्रिक बिघाडामुळे उपकेंद्रातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला.

यामुळे नंदनवन, उमरेड रोड, शारदा चौक, सुभेदार, एन.आय.टी. कॉम्प्लेक्स, गणेश नगर, ईश्वर नगर आणि भांडे प्लॉट यांसह आजूबाजूच्या अनेक प्रमुख परिसरांतील सुमारे ८,००० ग्राहकांचा वीज पुरवठा तब्बल १ तास पूर्णपणे बाधित झाला होता. भरदुपारी अचानक वीज गेल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या तांत्रिक पथकाने तातडीने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि सुमारे एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर या सर्व भागांतील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले. मात्र, अशा प्रकारे अनधिकृत आणि निष्काळजीपणे केल्या जाणाऱ्या खोदकामांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून होत आहे.


















