Home Artical Blog महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचा रणसंग्राम!

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचा रणसंग्राम!

0

विधान परिषदेच्या १६ जागांसाठी बिगुल; १८ जूनला मतदान

मुंबई(Mumbai): महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या १६ जागांसाठी अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या जागांसाठी येत्या १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून, अमरावतीसह राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.

निवडणूक प्रक्रियेला २५ मे २०२६ पासून अधिकृत अधिसूचनेद्वारे सुरुवात होणार आहे. इच्छुक उमेदवारांना १ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, २ जून रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. तसेच ४ जून ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आवश्यक निकष पूर्ण न झाल्यामुळे २०२२, २०२४ आणि २०२५ मध्ये रिक्त झालेल्या जागांवर निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीसाठी किमान ७५ टक्के संस्था कार्यरत असणे आणि ७५ टक्के मतदार पदावर असणे बंधनकारक असते. आता हे निकष पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या निवडणुकांसाठी १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार असून, २२ जून रोजी मतमोजणी होईल. त्यानंतर २५ जूनपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे या निमित्ताने दिसू लागली आहेत.