

मुंबई (Mumbai), दि. ५ जून : महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना प्रतिष्ठेचा ‘महा आयकॉन 2026’ जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘पुढारी’ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

मुंबई येथे आयोजित या कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, ‘पुढारी’ समूहाचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव तसेच संपादक योगेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याच्या विकासात आणि ऊर्जा व्यवस्थेच्या बळकटीकरणात लोकेश चंद्र यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याच्या उद्देशाने ‘पुढारी’ माध्यम समूहाने ‘महा आयकॉन 2026’ या नव्या उपक्रमाचे आयोजन केले होते.
या पुरस्कारामुळे ऊर्जा क्षेत्रातील उत्कृष्ट प्रशासन, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि जनहिताच्या कामांना मिळालेली ही महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.



















