

गडकरी, फडणवीस आणि पोलीस आयुक्तांना निवेदन सादर
किमान ९ हजार रुपये पेन्शन व महागाई भत्त्याची मागणी
नागपूर (Nagpur): ईपीएस-95 निवृत्त वेतनधारकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने तातडीने चर्चा आयोजित करावी, अशी मागणी संबंधित संघटनांनी केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने चर्चा निमंत्रण पत्र क्रमांक 2705/2026 दिनांक 27 मे 2026 ची हार्ड कॉपी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नागपूर पोलीस आयुक्त यांना सादर करण्यात आली आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात ईपीएस-95 निवृत्त वेतनधारकांना किमान 9 हजार रुपये मासिक पेन्शन, महागाई भत्ता (डी.ए.), सामाजिक सुरक्षा सुविधा तसेच ईपीएस-95 योजनेत आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांवर सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी संबंधित मान्यवरांनी लवकरात लवकर बैठक आयोजित करावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, देशभरातील सुमारे 81 लाख ईपीएस-95 निवृत्त वेतनधारक अत्यल्प पेन्शनवर उदरनिर्वाह करत असून अनेक जण आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. सध्या संघटना संबंधित मान्यवरांकडून चर्चेच्या तारखेची प्रतीक्षा करीत असून निवृत्त वेतनधारकांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.















