

एआयडीच्या मागणीला दिला भक्कम पाठिंबा
नागपूर(Nagpur), १ जून :
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तसेच असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलमेंट (एआयडी) चे संरक्षक श्री. नितीन गडकरी यांनी नागपूरहून एअर इंडियाच्या रद्द करण्यात आलेल्या विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी वैयक्तिक हस्तक्षेप करत एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहून तातडीने या सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.
नितीन गडकरी यांनी एआयडीचे अध्यक्ष आशीष काळे यांनी त्यासंदर्भात सादर केलेल्या निवेदनाला ठाम पाठिंबा दर्शविला आहे. नागपूर हे वेगाने विकसित होत असलेले आर्थिक, औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स केंद्र असल्याने येथील हवाई संपर्कात कोणतीही तडजोड होऊ नये, असे त्यांनी एन. चंद्रशेखरन यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. नागपूर–मुंबई मार्गावरील विमानसेवा कमी केल्यामुळे किंवा रद्द केल्यामुळे व्यावसायिक प्रवास, औद्योगिक उपक्रम, गुंतवणुकीच्या संधी आणि प्रवाशांच्या सोयींवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून व्यवसाय, प्रशासन आणि उद्योग क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे, याकडे लक्ष वेधत गडकरी यांनी एअर इंडियाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करून किमान एक नागपूर–मुंबई विमानसेवा तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी केली. प्रादेशिक संपर्क, आर्थिक विकास आणि जनसुविधांच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी गडकरी यांनी भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात नागपूरचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरू असलेल्या आधुनिकीकरण आणि विस्तारकामांचा उल्लेख करत नागपूर भविष्यातील विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक्स हब म्हणून उदयास येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
एआयडीने आपल्या निवेदनात एअर इंडियाच्या विमानसेवा कमी करण्याबाबत चिंता व्यक्त करत त्याचा विदर्भातील प्रवासी, गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य परिणामांकडे नितीन गडकरी व एन. चंद्रशेखरन यांचे लक्ष वेधले होते. नागपूर हे वेगाने विकसित होणारे गुंतवणूक केंद्र बनत असून प्रदेशाच्या विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी सक्षम हवाई संपर्क अत्यावश्यक असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले होते.
गडकरी यांनी तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत एआयडीने म्हटले आहे की, त्यांच्या या भक्कम पाठिंब्यामुळे विदर्भातील पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी मदत मिळेल. एअर इंडिया आणि टाटा समूह मंत्री महोदयांच्या आवाहनाला तसेच प्रदेशाच्या वाढत्या गरजांना सकारात्मक प्रतिसाद देत रद्द करण्यात आलेल्या विमानसेवा लवकरात लवकर पूर्ववत करतील, असा विश्वासही आशीष काळे यांनी व्यक्त केला आहे.




















