Home Crime भूखंड वाद प्रकरणात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यावर आरोप, पोलिस आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

भूखंड वाद प्रकरणात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यावर आरोप, पोलिस आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

0

नागपूर, दि. १ जून : भूखंडाच्या वादातून गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करून दबाव टाकल्याची तक्रार समोर आल्यानंतर नागपूर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास कलमना विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राहुल (रोहित) ओव्हाळ यांच्याकडे सोपविण्यात आला असून चौकशी प्रक्रिया सुरू झाली आहे.

इंदिरा माता नगर येथील रहिवासी अनिल ताराकांत सहारे यांनी पोलिस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्लॉट क्रमांक ६३९ संदर्भातील वाद दिवाणी न्यायालयात प्रलंबित असताना काही व्यक्तींनी खोट्या खंडणीच्या तक्रारीचा आधार घेत दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, ही तक्रार स्थानिक पोलिस ठाण्याकडे न पाठवता थेट गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आल्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांच्या कार्यकाळात त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करून चौकशीस सहकार्य केले होते. मात्र, त्यांच्या बदलीनंतर पदभार स्वीकारलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी वारंवार चौकशीसाठी बोलावून भूखंड रिकामा करण्यासाठी दबाव टाकला. तसेच, “एका आठवड्यात जागा खाली करा, अन्यथा खंडणीच्या गुन्ह्यात अडकवून कारवाई करण्यात येईल,” अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याशिवाय, एका अज्ञात व्यक्तीकडून फोनद्वारे भूखंड खाली करण्यासंदर्भात धमकीचे कॉल आल्याचेही तक्रारदाराने नमूद केले आहे. या सर्व घटनांमुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा करत मानसिक व कायदेशीर छळ होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रकरणातील सत्यता पडताळण्यासाठी संबंधित व्यक्तींच्या कॉल डिटेल रेकॉर्डची (सीडीआर) तपासणी करून संभाव्य संगनमताची चौकशी करण्यात यावी, तसेच खोट्या तक्रारींचा आधार घेऊन दबाव निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्यामुळे या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.