Home Artical Blog महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना, नागपूर विभागाचा भव्य विभागीय मेळावा उत्साहात संपन्न!

महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना, नागपूर विभागाचा भव्य विभागीय मेळावा उत्साहात संपन्न!

0

नागपूर(Nagpur): नागपूर येथे महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना, नागपूर विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य विभागीय मेळावा अभूतपूर्व उत्साह, संघटनात्मक एकता आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधून सुमारे ४०० निदेशक, प्रशिक्षक आणि सभासदांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मेळाव्याला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करून दिले.

कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते झाले, तर संघटनेचे मुख्य मार्गदर्शक व माजी सरचिटणीस भोजराज काळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. पदवीधर शिक्षक आमदार अभिजित वंजारी यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.

या प्रसंगी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नागपूरचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, शासकीय आयटीआय नागपूरच्या उपसंचालक सौ. श्वेता कुलकर्णी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रमोद ठाकरे, माजी सरचिटणीस विनोद दुर्गपुरोहित, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार दिलीप कडू, संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, सरचिटणीस राजेश खडबडे तसेच राज्य, विभागीय व जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे नव्या कार्यकारिणीने एका वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा सभासदांपर्यंत पोहोचविणे आणि आयटीआय संवर्गाच्या विविध प्रश्नांवर लोकप्रतिनिधींसोबत थेट संवाद साधणे हे होते.

उद्घाटक आमदार सुधाकर अडबाले यांनी कौशल्य विकास क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी शिक्षकांना आवश्यक सुविधा, प्रशिक्षण साहित्य आणि स्वायत्तता उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. तर आमदार अभिजित वंजारी यांनी आयटीआय संवर्गाच्या समस्या विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन देत, “आयटीआय निदेशक संघटना ही केवळ मागण्या करणारी नव्हे तर समाजाला कौशल्यसंपन्न मनुष्यबळ घडविणारी संघटना आहे,” असे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय भाषणात भोजराज काळे यांनी संघटनेच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेत संघटनेमुळे सभासद आणि प्रशासन यांच्यात निर्माण झालेल्या सकारात्मक समन्वयाची माहिती दिली. सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे यांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत कौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याचे आवाहन केले.

संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, माजी सरचिटणीस विनोद दुर्गपुरोहित आणि उमेदवार दिलीप कडू यांनी संघटनात्मक कार्य, उपलब्धी आणि भावी दिशा यावर मार्गदर्शन करत सर्व सभासदांना एकजुटीचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी ढुमणे, सूत्रसंचालन साहेबराव गुडधे, तर आभार प्रदर्शन प्रेमानंद भैसारे यांनी केले.

नागपूर शाखा, मुलींची शाखा आणि इंदोरा आयटीआयच्या स्वागत समितीने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा मेळावा यशस्वी ठरला. अनेक माजी व विद्यमान सभासदांच्या आर्थिक व संघटनात्मक सहकार्यामुळे कार्यक्रमाला अधिक भव्यता प्राप्त झाली.

निदेशक बंधू-भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा विभागीय मेळावा संघटनात्मक ऐक्य, विचारमंथन आणि आयटीआय संवर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरला. अशी बातमी श्री सहदेव चव्हाण यांनी दिली.