Home Breaking news आक्षेपार्ह दाव्यांवर अन्न व औषध प्रशासनाचा दणका

आक्षेपार्ह दाव्यांवर अन्न व औषध प्रशासनाचा दणका

0

चंद्रपुरातील मेगा स्टोअरवर छापा, 45 हजारांचा औषधसाठा जप्त

चंद्रपूर (Chandrapur): मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, दमा यांसारखे गंभीर आजार सहज बरे करण्याचे दावे करणाऱ्या आयुर्वेदिक औषधांवर अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरातील एका आयुर्वेदिक औषध विक्री केंद्रावर छापा टाकत प्रशासनाने तब्बल 45 हजार 970 रुपये किमतीचा औषधसाठा जप्त केला.

तपासणीदरम्यान संबंधित विक्री केंद्रात मधुमेह नियंत्रण, वजन कमी करणे, हृदयरोग व दमा बरा करणे तसेच तापावर प्रभावी उपचार असल्याचे दावे करणारी 16 प्रकारची आयुर्वेदिक औषधे आढळून आली. या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये करण्यात आलेले दावे कायद्याच्या निकषांशी विसंगत आणि दिशाभूल करणारे असल्याचे निदर्शनास आले. यापैकी तीन औषधांचे नमुने पुढील प्रयोगशाळा तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित साठा जप्त करण्यात आला.

अधिकाऱ्यांच्या मते, कोणताही वैज्ञानिक पुरावा किंवा वैद्यकीय मान्यता नसताना गंभीर आजारांवर हमखास उपचाराचे दावे करणे हे औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिरात) कायदा, 1954 अंतर्गत गंभीर स्वरूपाचे उल्लंघन आहे. त्यामुळे संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी चमत्कारिक उपचारांच्या आणि भ्रामक जाहिरातींच्या आहारी जाऊ नये, कोणतेही औषध घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक आणि विक्रेत्यांविरोधात भविष्यातही अशाच प्रकारची कठोर मोहीम सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.