

दोन वर्षांच्या कामगिरीमध्ये देशात आघाडीवर; नागपूरही चमकले
नागपूर (Nagpur), 5 जून 2026: केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामगिरीसाठी केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून महाराष्ट्राचा गुरुवारी (दि. 4) विविध वर्गवारीमध्ये तब्बल आठ पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. देशात इतर राज्यांच्या तुलनेत हे सर्वाधिक पुरस्कार आहेत. छतावरील सौर प्रकल्पांची संख्या, नागपूर, जळगाव, पुणे जिल्ह्यांची देशात आघाडी आणि ‘मंथ ऑफ सोलर’मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचा हा सन्मान करण्यात आला.
नवी दिल्लीतील अटल अक्षय ऊर्जा भवनात आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री श्री. प्रल्हाद जोशी यांच्याहस्ते महावितरणचे कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता श्री. दिलीप दोडके (नागपूर), अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. राहुल सोनटक्के यांनी हे पुरस्कार स्विकारले. यावेळी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा सचिव श्री. संतोषकुमार सारंगी उपस्थित होते.
येत्या मार्च 2027 पर्यंत देशभरात 1 कोटी घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचे उद्दिष्ट ठेवून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात फेब्रुवारी 2024 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. अवघ्या दोन वर्षांत देशातील 40 लाखांहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. महाराष्ट्र राज्यानेही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मोठी आघाडी घेतली आहे.
राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पीएम सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीला मोठा वेग दिला आहे. त्यामुळे महावितरणने गेल्या दोन वर्षांत 6 लाख 5 हजार 847 घरांच्या छतावर सौर प्रकल्प कार्यान्वित असून देशात द्वितीय स्थान मिळवले आहे. तर गुजरातने 6 हजार 81 हजार 411 सौर प्रकल्पांसह प्रथम आणि उत्तर प्रदेशने 5 लाख 64 हजार 846 सौर प्रकल्पांसह तिसरे स्थान प्राप्त केले आहे.
यासोबतच देशपातळीवर 10 टॉपर जिल्ह्यांमध्ये (कंसात छतावरील सौर प्रकल्पांची संख्या) नागपूर जिल्ह्याने (89,255) देशात द्वितीय क्रमांक, जळगाव जिल्ह्याने (४२,५७४) नववा क्रमांक आणि पुणे जिल्ह्याने (४२,१५१) दहावा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या दहा क्रमांकात महाराष्ट्राच्या सर्वाधिक या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे हे विशेष.
केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून मे २०२६ मध्ये ‘मंथ ऑफ सोलर’ ही मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेदरम्यान महाराष्ट्रामध्ये तब्बल ६५ हजार ७८६ अर्ज प्राप्त झाले. घराच्या छतांवर तब्बल ५४ हजार २४६ सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. या दोन्ही वर्गवारीत महाराष्ट्राने देशात द्वितीय स्थान प्राप्त केले. दि. २९ मे रोजी देशपातळीवर एका दिवसात सर्वाधिक १५ हजार घरांवर सौर प्रकल्प बसविण्यात आले असून त्यापैकी महाराष्ट्राने ४ हजार ७०० घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून प्रथम स्थान पटकावले. तसेच ६९ हजार १५६ सौर प्रकल्पांची तपासणी करून देशात अव्वल स्थान पटकावले. यासह ४१३ पुरवठादारांची नोंदणी करून ‘मंथ ऑफ सोलर’मध्ये द्वितीय स्थान मिळवले आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर



















