

सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत पर्यावरण संरक्षणाचा संदेश; वृक्षारोपण, घोषवाक्य व सामूहिक नृत्य स्पर्धांचे आयोजन
चंद्रपूर (Chandrapur), दि. ६ जून २०२६ : वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन या जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणाची व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती नागरी समिती, चंद्रपूर यांच्या वतीने राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियान २०२६ चा भव्य शुभारंभ सोमवार, दि. ८ जून २०२६ रोजी प्रियदर्शिनी सभागृह, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
समितीचे अध्यक्ष तुषारजी देवपुजारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात ख्यातनाम पर्यावरण अभ्यासक प्रा. विजय घुगे हे प्रमुख वक्ते म्हणून पर्यावरण संवर्धनाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध धर्मांचे धर्मगुरू एकत्र येऊन पर्यावरण संरक्षणाचा एकात्मतेचा संदेश देणार आहेत. यामध्ये महाराज सुधाकर बगडे, फादर सुनील जॉर्ज कुमार, मौलाना फजरुल रहमान खान, भंते मंगल बुद्ध विपसी आणि ग्यानी लाहोरसिंगजी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सर्वधर्मीय प्रतिनिधींच्या सहभागातून “पर्यावरण संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात प्रा. विजय घुगे यांचे पर्यावरण विषयक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले असून “काल, आज आणि उद्या” या संकल्पनेवर आधारित पर्यावरण विषयक सामूहिक नृत्य स्पर्धा तसेच घोषवाक्य स्पर्धाही घेण्यात येणार आहे. पर्यावरणाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांचे कलात्मक सादरीकरण करून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या स्पर्धांचा प्रमुख उद्देश आहे.
राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियानांतर्गत आगामी काळात व्यापक वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरण शिक्षण, जनजागृती उपक्रम तसेच विविध सामाजिक सहभागातून पर्यावरण रक्षणाची लोकचळवळ अधिक बळकट करण्याचा समितीचा संकल्प आहे.
प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा आणि पर्यावरण संरक्षणाच्या या लोकचळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रमात चंद्रपूर शहर व परिसरातील नागरिक, सामाजिक संस्था, युवक, महिला, विद्यार्थी, विविध शैक्षणिक संस्था तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती नागरी समिती, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.


















