Home Artical Blog महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा

महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा

0

नागपूर (Nagpur), 6 जून, 2026: महावितरणच्या २1 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नागपूर परिमंडलाच्या वतीने येथील ‘विद्युत भवन’ कार्यालयात एक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार, यावर्षीचा वर्धापन दिन अत्यंत साधेपणाने परंतु सेवाभावाचा दृढ संकल्प करत साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे वर्ष असल्याने, त्यांच्या पुतळ्याला आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आले. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेची शपथ घेतली. ‘अपघातमुक्त महावितरण’ हे ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक स्तरावर सुरक्षिततेचे नियम पाळण्याचा आणि तांत्रिक बाबींमध्ये अधिक अचूकता आणण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमात ‘ग्राहक देवो भव’ या मंत्रावर विशेष भर देण्यात आला. ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज सेवा पुरविणे, ग्राहकांच्या तक्रारींचे तत्पर निवारण करणे आणि महावितरणच्या योजना तळागाळातील ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, या उद्दिष्टांचा पुनरुच्चार करण्यात आला. यासोबतच, कंपनीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि तांत्रिक कार्यक्षमता वाढवून व्यावसायिक स्तरावर महावितरणला अधिक बळकट करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मुंबई येथील मुख्य कार्यक्रमाचे थेट ऑनलाइन प्रक्षेपण होते. याद्वारे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी संपूर्ण राज्यभरातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी संचालक (संचलन/प्रकल्प) सचिन तालेवार, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, संचालक (वित्त) अनुदिप दिघे आणि संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनीही आपले मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी आपल्या भाषणात महावितरणच्या गेल्या 21 वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करत, आगामी काळात अधिक पारदर्शक आणि गतिमान सेवा देण्याचे आवाहन केले. या प्रसंगी अधीक्षक अभियंते अमित परांजपे, संजय वाकडे आणि दिपाली माडेलवार यांनीही उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत कार्यासाठी प्रोत्साहित केले.

या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास नागपूर परिमंडळ कार्यालय, प्रादेशिक कार्यालय, शहर व ग्रामीण मंडळ, पायाभूत आराखडा विभाग, स्थापत्य मंडळ, भरारी पथक आणि चाचणी व सुरक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर