

चंद्रपूर(Chandrapur): शहरातील बाजार वॉर्ड, गंज वॉर्ड, बालाजी वॉर्ड, पठाणपुरा, बाबूपेठ, भानापेठ, हॉस्पिटल वॉर्ड, एकोरी वॉर्ड, महाकाली वॉर्ड, जलनगर वॉर्ड, बिनबागेट वॉर्ड, रामनगर, दादमहल वॉर्ड, गौतम नगर, समाधी वॉर्ड, कोतवाली वॉर्ड, विठ्ठल मंदिर वॉर्ड, अंचलेश्वर गेट परिसर, ताडबन तसेच भिवापूर परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी अजूनही नियमित पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील दोन वर्षांपासून अमृत योजनेअंतर्गत शहरात पाईपलाईन व मीटर बसविण्याचे काम करण्यात आले. मात्र कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांच्या नळाला नियमित पाणी मिळत नसल्याने महिलांना ४६ अंश तापमानाच्या कडक उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी महिलांना सकाळपासून पाण्याच्या प्रतीक्षेत रांगा लावाव्या लागत असून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्त अकलूरी नरेश यांना निवेदन देण्यात आले. शहरात तातडीने नियमित व अखंडित पाणीपुरवठा सुरू करावा, टँकरद्वारे पाणीपुरवठा वाढवावा तसेच अमृत जल योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. युवराज धानोरकर यांच्या आदेशाने नगरसेविका डीलन केळझरकर, युवासेना जिल्हाप्रमुख शैलेश केळझरकर, गोमती पाचभाई, अॅड. मृणालिनी रागीट, गीता माहुलकर, मेघा आक्केवार, सीमा मेश्राम, संतोषी कादलवार, महेश पाटील, कार्तिक डोनीवार व वीरेन वाटकर यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले.
दरम्यान, तातडीने उपाययोजना न झाल्यास चंद्रपूर शहरातील महिला महानगरपालिकेच्या नळांवर येऊन “पाणी हक्क उठाव” आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
तर्फे
गोमती शारदा मनोहर पाचभाई
शिवसेना, चंद्रपूर
मो. ९६५७२०००१०


















