मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न

0

मुंबई(MUMBAI), ८ मे , राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी शुभम कुमार (३०) या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे पोलिसांनी त्याला वारंवार सूचना देऊनही त्याने ऐकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचा ताफा रविवारी (५ मे) रात्री ११:१५ च्या सुमारास वांद्रे-वरळी सागरी सेतूवर ७ क्रमांकाच्या मार्गिकेवरुन मुख्यमंत्र्यांचा ताफा जात होता. त्यावेळी एक कारचालक त्याची गाडी भरधाव चालवत होता. दरम्यान पोलिसांनी कार चालकाला त्वरीत ६ क्रमांकाच्या मार्गिकेवरून जाण्याचा इशारा केला. पण हा तरुण ऐकायला तयार नव्हता. त्याने कार बाजूला न घेता पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. हा तरुण कार तशीच सुसाट दामटत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी वारंवार इशारा देऊनही तरुण थांबला नाही, त्याने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग सुरूच ठेवला अखेर पोलिसांनी त्याला थांबवलं आणि चौकशी केली. त्यावेळी त्याने आपण अभिनेता असल्याचं सांगितले. हा ३० वर्षांचा तरुण माउंट मेरी परिसर, वांद्रे पश्चिम येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईत मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा पाठलाग

तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. शुभम कुमार असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आपण अभिनेता असल्याचं या तरुणाने पोलिसांना सांगितले आहे.
———

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध
नाना पटोलेंचा घणाघाती आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तर निवडणुकीच्या काळात पाकिस्तानची आठवण काढणं म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचे म्हणत, नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानमध्ये जाऊन खाल्लेल्या बिर्याणीची आठवण येत असल्याचे म्हणत नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
———
गोंडपिपरीतील दोन मुले तलावात बुडाले
शोध मोहीम सुरु

गोंडपिपरी येथील न्यायालयाच्या मागे तलावात मित्रांसोबत अंघोळीला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा तलावात बुडाल्याची घटना घडली. सदर घटना ही मंगळवारी रात्री आठ वाजता दरम्यान उघडकीस आली. माहिती मिळताच गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या बालकांची शोधमोहीम हाती घेतली. मात्र, मृतकांचा शोध लागला नाही. काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास हे दोघेही बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. आज पुन्हा शोध मोहीम सुरु झाली आहे.

३ अधिकाऱ्यांना १ लाखाची लाच घेताना अटक

बियर परवान्यासाठी मागितली लाच

चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ या तिघांना १ लाखाची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. नवीन बिअर दुकानाच्या परवान्यासाठी त्यांनी १ लाख ३० हजारांची लाच मागितली होती.

80 पेक्षा जास्त विमाने रद्द
एकाच वेळी २०० जणांनी घेतली सुटी
एअर इंडिया एक्स्प्रेससमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. एअर इंडियाचे वरिष्ठ क्रू-मेंबर्सने एकाच वेळी सुटी घेतली आहे. एअर इंडियामधील 200 जणांनी आजारपणाची रजा घेतल्यामुळे 80 पेक्षा जास्त विमाने रद्द करावी लागली. यामुळे प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी फ्लाइटची माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केबिन-क्रू कर्मचारी नसल्यामुळे अनेक विमानांची उड्डाने रद्द करावी लागली आहे. विमाने रद्द झाल्यामुळे प्रवाशांना पूर्ण परतावा देण्यात येणार असल्याचे एअर लाईन्सकडून स्पष्ट करण्यात आले.

वारजे माळवाडी भागात गोळीबार
पोलिसांनी घटनास्थळी केला पंचनामा
संपूर्ण देशाचे लक्ष मंगळवारी बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागले होते. बारामती लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरु असताना आरोप-प्रत्यारोप सुरु होते. यंदा बारामती मतदार संघात कमी मतदान झाले. परंतु मतदान संपल्यावर धक्कादायक घटना घडली आहे. बारामती लोकसभा मतदार संघात येणाऱ्या वारजे माळवाडी भागात गोळीबार झाला. या भागातील रामनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार केल्याची घटना रात्री १०.३० वाजता घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.

हैदराबादमध्ये पावसाचे थैमान
घराची भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू

हैदराबादमधील बाचूपल्ली परिसरात मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळून चार वर्षांच्या मुलासह सात जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. ही घटना मंगळवारी रात्री घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत्यू झालेले लोक हे ओडिशा आणि छत्तीसगड येथील स्थलांतरित कामगार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी मशीनच्या सहाय्याने उत्खनन करण्यात आले, ज्याच्या मदतीने ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.