देशमुखी बाणा… थेट पक्षाध्यक्षांनाच इशारा

0

आशिष देशमुख म्हणाले राष्ट्रीय कार्यकारिणीत थेट नियुक्ती नको

_____________________________________________________________________

नागपूर. परखड मतांसाठी ओळखले जाणारे माजी आमदार आशिष देशमुख (Former MLA Ashish Deshmukh ) यांनी पुन्हा एकदा थेट पक्ष नेतृत्वालाच डोळे दाखविली आहेत. मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) स्वतः जसे निवडून आले, त्याप्रमाणेच काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय कार्यकारणीतील सदस्यांची नियुक्ती निवडणुकीद्वारे व्हावी, त्यांची थेट नियुक्ती केली जाऊ नये, अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात आम्ही दिल्लीत काही वकिलांशी चर्चा केली असून गरज पडल्यास यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी केलेल्या मागणीबाबत नेत्यांकडून प्रतिक्रिया देणे टाळले जात आहे. पण, काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागणीचे स्वागत केले आहे. पक्षाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर ते आवश्यक असल्याचे कार्यकर्त्यांचेही म्हणणे आहे.

भारतीय जनता पक्षाकडून आमदार राहिलेले आणि नंतर काँग्रेसमध्ये गेलेले आशिष देशमुख सडेतोड मते मांडत असतात. बरेचदा त्यांची विधाने नेत्यांनाच अडचणीत आणणारीही ठरतात. आता पुन्हा एकदा त्यांनी अशाच प्रकारचे स्पष्ट मत मांडले आहे. आशिष देशमुख म्हणाले की, काँग्रेसच्या संविधानानुसार पक्षातील मोठ्या पदावरील व्यक्ती निवडून यावी, अशी व्यवस्था आहे. मल्लिकार्जून खरगे हे निवडणुकीद्वारे काँग्रेसेचे अध्यक्ष झाले, याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र, याबरोबरच काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांची नियुक्तीही निवडणुकीद्वारे व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे. मात्र, गेल्या २८ वर्षांपासून या सदस्यांची थेट नियुक्ती पक्षाध्यक्षाद्वारे केली जात आहे. यासंदर्भात आम्ही काही नेत्यांनी दिल्लीतील काही वकिलांशी चर्चा केली असून गरज पडल्यास याप्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागू. आमचा लढा पक्षश्रेष्ठींविरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ज्याप्रकारे मल्लिकार्जून खरगे निवडून आले, त्याप्रमाणेच काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीतील सदस्य आणि प्रत्येक राज्याचे प्रदेशाध्यक्ष निवडून येण्यासंदर्भात काँग्रेसच्या संविधानात प्रावधान आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी, एवढीच आमची मागणी आहे. या देशाला केवळ काँग्रेस वाचवू शकते. मात्र, काँग्रेसला जुन्या कामाच्या पद्धतीतून बाहेर पडायला पाहिजे. काँग्रेसच्या कार्यकारिणीत नवीन लोकांनी येणे गरजेचे आहे. नुकताच तीन राज्याच्या निवडणुका झाल्या, त्यात कुठेच काँग्रेस दिसत नाही. गेल्या ३० वर्षांपासून त्याच त्या लोकांना संधी मिळत असेल, तर पक्ष म्हणून काँग्रेस कधीच प्रगती करू शकणार नाही, अशी प्रतिक्रियाही देशमुख यांनी नोंदविली

_______________________________________________________________________________________