“तो पहिला राजकीय भूकंप असेल..”: पृथ्वीराज चव्हाण

0

(mumbai)मुंबई-शिवसेनेचा आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर बुधवारी निर्णय येणार आहे. त्यावर राजकीय क्षेत्रात मोठी उत्सूकता आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाव्य निकालावर भाष्य केले आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “या प्रकरणात पक्षांतरबंदी कायद्याचे शंभर टक्के उल्लंघन झालेले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय घ्यावा लागणार असला तरी ते एका पक्षाचे आमदार आहेत. ते पक्षाच्या हिताच्या विरोधात निर्णय देतील का? बऱ्याच शक्यता वर्तवल्या जात आहेत. पण जो काही निर्णय होईल, तो पूर्णपणे राजकीय असेल. तो निर्णय कायद्याला धरून नसेल.”

चव्हाण म्हणाले, “कायद्याला सोडून जर निर्णय झाला, तर सर्वोच्च न्यायालय काय करणार हा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालय आपले अधिकार वापरून निर्णय घेईल का? हे देखील बघावे लागेल. पहिला भूकंप नार्वेकर काय निर्णय घेतात यावर ठरणार आहे. ते यातून अंग काढून घेण्याचीही शक्यता आहे. त्यांनी जर त्यातून अंग काढले आणि निर्णय घेतला नाही, तर मग त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला पहिला निर्णय घ्यावा लागेल. तो पहिला राजकीय भूकंप असेल”, असे भाकितही त्यांनी वर्तविले.