१६ आमदारांचे काय होणार? बुधवारी फैसला!

0

(Mumbai)मुंबई- राज्यातील सत्ता संघर्षात शिंदे गटाच्या १६ आमदारांवर अपात्रतेची तलवार लटकत आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे बुधवारी निकाल देणार असल्याने शिंदे गटातील आमदारांसह राज्याचे या निकालाकडे लक्ष लागलेले आहे. महायुतीकडे भक्कम बहुमत असल्याने या निकालाचा सरकारवर परिणाम होण्याची शक्यता नसली तरी १६ आमदारांमध्ये (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश असल्याने ते अपात्र ठरल्यास काय परिस्थिती निर्माण होईल, याकडे लक्ष लागलेले आहे.

दिड महिन्यापासून शिवसेनेतील दोन्ही गटातील आमदार अपात्रतेवरुन विधीमंडळात सुरू असलेली सुनावणी केव्हाच पूर्ण झाली असून निकालही तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णयासाठी १० जानेवारीपर्यंत मुदत दिली असल्याने त्याच दिवशी निकाल जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. निकालपत्रातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू असून सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहेत. काही सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी ४ वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी या निकालपत्राच्या मसुद्यावर दिल्लीतील कायदेतज्ज्ञांचाही अभिप्राय घेतला जात आहे. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने सांगण्यात येत आहे.

निकाल शिंदे गटाच्या विरोधात लागला तरी त्याचा सरकारवर परिणाम होणार नाही. कारण महायुती सरकारकडे भक्कम बहुमत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा गट सत्तेत असल्याने भाजपला कुठलीही चिंता नसल्याची सध्याची स्थिती आहे. मात्र, तरीही मुख्यमंत्री शिंदे स्वतः अपात्र ठरल्यास काय, असा प्रश्न विचारला जात आहे. शिंदे यांना विधान सभेवर निवडून आणले जाईल, असे उत्तर यावर भाजपच्या गोटातून दिले जात आहे. मात्र, उर्वरित आमदारांचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होऊ शकतो.