नवनीत राणांच्या विरोधात गुन्हा दाखल

0

हैदराबाद(Hyderabad), 10 मे अमरावती(Amravati) मतदारसंघातील भाजप उमेदवार नवनीत कौर राणा(Navneet Kaur Rana) यांच्या विरोधात तेलंगणामध्ये गुन्हा दाखल झालाय. निवडणूक आयोगाच्या तक्रारीवर स्थानिक शादनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

निवडणूक प्रचारादरम्यान झहीराबादमध्ये नवनीत राणा यांनी काँग्रेसला मतदान करणे म्हणजे पाकिस्तानला मतदान करण्यासारखे असल्याचे म्हटले होते. दरम्यान, नवनीत राणा यांचे हे विधान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले आणि अनुचित टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नवनीत राणा या भाजपाच्या उमेदवार बीबी पाटील यांच्या प्रचारासाठी जहीराबाद लोकसभा मतदारसंघातील संगारेड्डी येथे आल्या होत्या. नवनीत राणा म्हणाल्या की, गेल्या 5 वर्षांत मी बीबी पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात काम करताना पाहिले आहे.

भाजपाचे 400 जागांचे लक्ष्य पूर्ण केले जाईल आणि 400 जागांपैकी एक जागा झहीराबाद असेल. तसेच, काँग्रेसला मतदान करणे म्हणजे पाकिस्तानला मतदान करण्यासारखे आहे आणि मी त्याचा निषेध करण्यासाठी झहीराबादला आल्याचे राणा म्हणाल्या होत्या. नवनीत राणांच्या या विधानाच्या विरोधात निवडणूक अधिकाऱ्यांनी शादनगर पोलिसात तक्रार दाखल केलीय.