पश्चिम बंगालमधल्या नक्षलबारी Naxalbari गावात ६० च्या दशकात जन्मलेला पण मुळात माओवादाचच एक अतिहिंसक रूप असलेला नक्षलवाद तिथून मजल दरमजल करत सध्याचा तेलंगणा (पूर्वीचा आंध्र प्रदेश) मार्गे २० वर्षांनी म्हणजे ८० च्या दशकात निसर्गसंपन्न Gadchiroli गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. गगनचुंबी वृक्ष, अतिदुर्मिळ प्रजातीचे पशुपक्षी, हिरवेगार डोंगर, वैनगंगा, पोटफोडी, पामुलगौतम, पर्लकोटा, गाढवी, वैलोचना, खोब्रागडी, टिपागडी, प्राणहिता, बांडीया अशा अनेक खळाळत्या नद्या, नदीसारखेच महाकाय दिसणारे रानोमाळ हुंदडत वाहणारे नाले, जागतिक दर्जाचा उच्च प्रतीचा सागवान, परदेशी प्रचंड मागणी असलेला व्हर्जिनीया तंबाखू अशा सगळ्या समृद्धतेनं नटलेला, वैभवशाली आदिवासी संस्कृती असलेला हा जिल्हा…शिवाय याच्या पोटात हिरे, लोह, लाईमस्टोन अशी कित्येक मौल्यवान खनिजं दडलेली. तरीही एखाद्या श्रीमंत राजकुमाराने पराधीन होऊन आयुष्यभर चिंध्या पांघरून दारीद्र्यात जीवन कंठावं तसा हा जिल्हा जगत आला. किंबहुना आजही जगत आहे.
याला अनेक गोष्टींसह नक्षलवादही कारणीभूत आहे. केवळ वनपर्यटनावरच आफ्रिकेसारखी सक्षम अर्थव्यवस्था निर्माण करण्याची सगळी क्षमता असतानाही नक्षलवादाच्या पोलादी पंज्यात हा जिल्हा सतत तडफडत राहिला. या जिल्ह्याचं नशिब असं की चंद्रपुरातून जिल्हा म्हणून स्वतंत्र होण्याच्या काही वर्षांपूर्वीच या जिल्ह्यात नक्षलवादाचा पायरव ऐकू येऊ लागला. बाळ जन्मले की सटवाई येऊन त्याचं भाग्य लिहून जाते म्हणतात. सटवाईनं कुणा बाळाच्या भाग्यात काय लिहिलं माहित नाही. पण या जिल्ह्याच्या कपाळावर नक्षलवादाचा काळा शिक्का मारून ही सटवाई निघून गेली. त्यानंतर या जिल्ह्याच्या वाट्याला आली ती अतिमागास, गरीब, निरक्षर, उद्योगविहीन, बेरोजगार ही तिरस्करणीय लेबलं. भाषावार प्रांत रचनेनुसार १९६० मध्ये निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या अतिपूर्वेचा हा जिल्हा जणू या राज्याच्या अंगावरचा कुष्ठरोगाचा डाग असावा, अशीच वागणूक या जिल्ह्याला मिळत गेली. अजुनही गडचिरोली म्हटलं की आधी नक्षलग्रस्त हा शब्द लावतातच.
गडचिरोली हे नुसतं नाव उच्चारलं तरी पुणे, मुंबई सोडा पण इथून उण्यापुऱ्या पावणे दोनशे किमीवर असलेल्या नागपुरकर मंडळींचीही तंतरते. त्यामुळे एकतर या जिल्ह्याला ‘नको रे बाबा!!!’ म्हणत वाळीत टाकण्यात आलं किंवा केवळ सहानुभूती म्हणून सरकारी योजनांची खैरात वाटण्यात आली. महाराष्ट्रातील इतर कुठल्याही जिल्ह्याच्या नशिबी आले नाहीत, असे भोग या जिल्ह्याच्या नशिबी आले जे अजुनही संपलेले नाहीत.
८० च्या दशकात गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या नक्षलवाद्यांनी आधी या जिल्ह्याचा चांगला अभ्यास केला होता. इथले गरीब, निरक्षर आदिवासी स्थानिक व अन्य भागातून येणारे व्यापारी यांच्याकडून, सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून नागवले जात होते. निसर्गाच्या सानिध्यात जगणारे आदिवासी मुळातच शांतताप्रेमी. झालेला अन्याय गपगुमान सहन करायचा आणि जगायचं हे त्यांचं जीवन होतं. शिवाय त्यांच्या निरक्षरतेचा आणि साधेपणाचा फायदा काहीजण सतत घ्यायचे. नेमकी हीच बाब हेरून नक्षलवाद्यांनी आपली राॅबीन हुड प्रतिमा पुढं केली. गरीबीत खितपत पडलेल्या, अन्याय सहन करत असलेल्या गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी आम्ही जणू तारणहार म्हणून आलो आहोत,
असच चित्र त्यांनी सुरूवातीला रंगवलं. तेंदूपत्ता व्यवसाय असो की, बांबू कटाई यात आदिवासींवर अन्याय होतच होता. सरकार दफ्तरीही त्यांची दखल घेतली जात नव्हती. तेव्हा या चुका टाळता आल्या असत्या तर आदिवासींनी नक्षलवाद्यांना थाराच दिला नसता. पण तेलुगू कवी गदर आणि हिंदीतील दुष्यंतकुमारसारख्या विद्रोही कवींच्या कविता मधूर स्वरात गाणारे, अन्यायाचा विरोध करा म्हणून सरकारच्या नावाने बंदुक नाचवणारे, आदिवासींची भाषा शिकून त्यांच्या रेला नृत्यात सहभागी होत त्यांना क्रांतिगीतांची संथा देणारे हे नक्षल तरुण तत्कालीन परीस्थितीत आदिवासींना आपले वाटले नाही, तरच नवल…एकूण आदिवासींनाही आपल्या बाजुने आवाज उठविणारा, न्याय मिळवून देणारा कुणी आला आहे, असं वाटायला लागलं. सरकारी लालफितशाहीनं गांजलेल्या, साध्या साध्या सुविधांसाठी तडफडत असलेल्या या लोकांना नक्षलवादी नायक वाटू लागले.
पण पुढं काही वर्षांत हे चित्र बदलत गेलं. नक्षलवाद्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हे त्यांच्याही लक्षात यायला लागलं. सुरूवातीला आदिवासी व स्थानिक नागरिकांची बाजू घेऊन भांडणारे, त्यांच्यासाठी सरकारचे अधिकारी,कर्मचारी यांना बंदुकीच्या नळीच्या जोरावर वठणीवर आणणारे नक्षलवादी आता पोलिस खबरी ही नवी टुम काढून याच आदिवासी बांधवांच्या कोवळ्या तरुणांचे बळी घेऊ लागले. हे बळीसत्र अद्याप थांबलेलं नाही. बेडकांना मारायला साप पाळावा आणि सापानं आपलाच चावा घ्यावा, असं काहीसं घडलं. नक्षलवाद्यांना पोलिसांच्या हालचालींची बित्तंबातमी पुरविणारे आदिवासी मग हे टाळू लागले. पण आता बंदुकीची नळी त्यांच्याही कानशीलावर होती. शिवाय हळूहळू नक्षलवाद्यांनी आपल्या चळवळीत स्थानिक तरुणांची भरती सुरू केली होती. मग एआरडी (एरीया रक्षक दल), जीआरडी (ग्राम रक्षक दल) किंवा जन मिलिशियासारख्या गटात सहभागी होऊन अनिच्छेनच का होईना नक्षलवाद्यांचे हुकूम ऐकण्याशिवाय त्यांच्या हाती दुसरं काही उरलं नाही.
जनवादी क्रांती, सर्वहारा क्रांती, फॅसिस्ट सरकारचा विरोध असे परवलीचे शब्द वापरणारा नक्षलवाद सुरूवातीला पोलिसांना टिपायचा. मग वनविभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग अशा सरकारी विभागांना निशाणा बनवत, कधी कंत्राटदारांना ठार करत मग आदिवासींचेच मुडदे पाडू लागला. नक्षलवादानं या जिल्ह्यात रोवलेली पाळमुळं सहज लक्षात येत नाहीत, तसं त्यांच्यामुळे झालेलं नुकसानही पटकन लक्षात येत नाही. १९६० मध्ये निर्माण झालेल्या महाराष्ट्रातील इतर जिल्हे वेगानं प्रगती करत गेले. शेतालाच रान म्हणणारा, पाण्यासाठी कायम तहानलेला मराठवाडा असो की, सत्तेच्या केंद्रस्थानी असलेला पश्चिम महाराष्ट्र तिकडे सारं अर्थकारण एकवटलं. विदर्भावर सातत्यानं अन्याय होत असला तरी इथल्या ११ जिल्ह्यांपैकी इतर दहा जिल्ह्यांच्या प्रगतीचा वेगही गडचिरोलीच्या तुलनेत बराच बरा होता.
अगदी गडचिरोलीचा जुळा जिल्हा असलेल्या चंद्रपुरात कोळसा, सिमेंट, पोलाद, वीज निर्मिती असे अनेक उद्योग निर्माण होऊन या जिल्ह्याची भरभराट झाली. पण १९६० पासून २०२३ म्हणजे तब्बल ६३ वर्षे हा जिल्हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागेच राहिला. सुरजागडसारखी लोहखनिजाची खाण या जिल्ह्यात सुरू व्हायला राज्याच्या आयुष्याची सहा दशके उलटावी लागली यातच सारं आलं. खरेतर नक्षलवाद तेवढा भीषण नाही जेवढी त्याची प्रतिमा निर्माण केली जाते. सुरूवातीला या नक्षलवादाच्या प्रेमात अनेक प्रसार माध्यमे आणि अजुनही थोर म्हणून मिरवणारे काही पत्रकारही होते. रोमाॅंसिंग विद नक्षलजिममुळे किंवा नक्षलवाद्यांची प्रतिमा राॅबीन हुडी बनवण्यातून आपण या जिल्ह्याच्या नशिबी कोणते भोग आणत आहोत हे त्यांच्या गावीही नव्हतं. राज्यातील इतर नागरिकांनीही या जिल्ह्यातील नक्षलवादाचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळं या जिल्ह्याच्या बस स्थानकावर उतरलं की, नक्षलवादी बंदुकाच्या फैरी झाडून आपलं स्वागत करतील, इथले आदिवासी पानं गुंडाळून ‘झिंगालाला’ करत असतील, अशा कल्पना विलासात ते रममाण राहिले. सरकारी विभागांमध्येही गडचिरोलीत स्थानांतरण म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा हीच धारणा पक्की झाली. त्यामुळे या जिल्ह्यात ना उद्योजक आले, ना गुंतवणूक आली, ना जिल्ह्यासाठी उपयोगी ठरू शकणारे कर्तबगार अधिकारी (काही अपवाद वगळता) आले. म्हणून महाकवी सुधाकर गायधनीच्या कवितेत उल्लेखिल्याप्रमाणे हा जिल्हा कायम सोनं पांघरून चिंध्या विकत बसला.
नक्षल या एका शब्दानं या जिल्ह्यातील जल, जंगल, जमिन सारं इतर जिल्हे, राज्यापासून जणू अलिप्तच केलं. इथं ना सिंचनाची व्यवस्था होऊ शकली, ना उद्योगाची, ना नीट शिक्षण, ना आरोग्य. पण दिवंगत आबा (आर. आर. पाटील) यांच्यामुळं हा जिल्हा काही प्रमाणात नक्कीच पालटला. पोलिस विभागानही कात टाकत आदिवासींना पोलिसी खाक्या दाखवण्याऐवजी त्यांना मदतीचा हात पुढं करत सर्वतोपरी सहाय्य सुरू केलं. आजही हा एकटा पोलिस विभाग शासकीय चाकोरी बाहेर जाऊन महसूल, बांधकाम व सर्वच शासकीय विभागाची कामं इमानेइतबारे पार पाडतो. जनजागरण मेळाव्यातून आदिवासींना विविध योजनांचे लाभ, दाखले देणं असो की, ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून एखादा रस्ता दुरुस्त करणं असो पोलिस जवान कायम मदतीला धावून येतात. पोलिसांनी राबवलेल्या या मायेच्या धोरणाची गोड फळं आता मिळू लागली आहेत. नक्षलवादाचं कंबरडं मोडण्यात त्यांना बरच यश मिळालं आहे. पण फक्त कंबरडच मोडलं आहे
बरं का…नक्षलवाद पूर्णपणे संपला आहे, असं अजिबात समजू नका. याचं ताजं उदाहरण म्हणजे १५ नोव्हेंबर २०२३ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली होती. तेव्हा गडचिरोली शहरातील सेंटर फॉर इन्व्हेंन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲण्ड ट्रेनिंग सेंटर (सीआयआयआयटी) च्या लोकार्पणप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना “या जिल्ह्यातील नक्षलवाद आम्ही जवळपास संपवला आहे म्हणून या जिल्ह्याला नक्षलग्रस्त म्हणणार नाही”, असं विधान केलं होतं. याचं उत्तर म्हणून त्याच रात्री नक्षलवाद्यांनी दिनेश पुसू गावडे या निरपराध तरुणाचा पोलिस खबरी म्हणून खून केला. भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या पेनगुंडा-नेलगुंडा रस्त्यावर पडलेला दिनेशचा मृतदेह नक्षलवाद्यांनी या जिल्ह्यात केलेल्या हिंसाचाराचं ताजं उदाहरण आहे. पण या जिल्ह्यानं या चार दशकांत असे शेकडो तरुणांचे मृतदेह बघितले आहेत, रक्ताच्या धारा, आर्त किंकाळ्या, ढाळलेले अश्रू याची मोजदाद तरी कशी करायची? नक्षलवादामुळं या जिल्ह्यानं जे भोगलय ती कारुण्यकथा खुप दीर्घ आहे. तूर्त एवढच.