Home Artical Blog शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा राज्य सरकारचा डाव हाणून पाडू काँग्रेस विधिमंडळ नेते विजय...

शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा राज्य सरकारचा डाव हाणून पाडू काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

0

गोंडपिपरीतील १२ गावांच्या जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश

चंद्रपूर(Chandrapur),दि.२८: गोंडपिपरी तालुक्यातील १२ गावांतील सुपीक शेतजमीन उद्योगांच्या नावाखाली अधिग्रहित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न म्हणजे शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच घाला असल्याची घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. शेतकरी एकता संघर्ष कृती समितीच्या वतीने आयोजित भव्य शेतकरी परिषदेत बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला की, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरू असा इशारा सरकारला दिला.

गोंडपिपरी तालुक्यातील १२ गावांतील शेतकऱ्यांना काही महिन्यांपूर्वी उद्योग प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे सूचनापत्र देण्यात आले होते. मात्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित शेतकरी परिषदेत हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करताना म्हणाले की, एका बाजूला कर्जबाजारीपणा, नापिकी आणि शेतकरी नैसर्गिक संकटांनी होरपळत आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकार उद्योगपतींच्या फायद्यासाठी त्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ही जनविरोधी आणि शेतकरीविरोधी भूमिका आहे.ते पुढे म्हणाले,जमीन ही शेतकऱ्यांची आई आहे. त्या मातीत त्यांचे आयुष्य आणि पुढच्या पिढ्यांचे भविष्य दडलेले आहे. सरकारने विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळ करू नये. १२ गावांतील शेतजमीन कोणत्याही परिस्थितीत अधिग्रहित होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

या परिषदेत शेतकरी नेते तथा माजी आमदार ॲड. वामनराव चटप, ॲड. दिपक चटप, ॲड. बोधी रामटेके यांनी देखील सरकारच्या भूमिकेवर कठोर टीका करत शेतकऱ्यांच्या लढ्याला कायदेशीर आणि संघटनात्मक पाठबळ देण्याची ग्वाही दिली.
परिषदेदरम्यान एका वयोवृद्ध महिलेने डोळ्यात अश्रू आणत सरकार आणि स्थानिक आमदारांविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी भाजप आमदार देवराव भोंगळे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत १२ गावांमध्ये त्यांना गावबंदीचा ठरावही पारित केला.

परिषदेच्या शेवटी शेतकरी, ग्रामस्थ आणि संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले. या आंदोलनामुळे गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप आणखी तीव्र झाल्याचे चित्र दिसून आले.