Home Artical Blog ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

• ‘रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार-२०२६’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
• ग्रामीण विकास मंत्री, महसूल मंत्री, श्री रणजीतबाबू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती.
• RD Foundation चे अध्यक्ष आमदार डॉ आशिषराव देशमुख यांचा उपक्रम.

महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामीण विकास मंत्री मा. श्री. रणजीतबाबू देशमुख यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त RD Foundation तर्फे आयोजित “रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार-२०२६” वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. ग्रामीण विकासाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या *९ ग्रामपंचायती / संस्थांचा यावेळी रणजीत देशमुख ग्रामविकास पुरस्कार व प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.*

आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक करताना सांगितले की, “गावांचा विकास हा राष्ट्राच्या प्रगतीचा केंद्रबिंदू आहे. ग्रामविकास मजबूत झाला तरच देश सक्षम होईल. ग्रामविकासातूनच सर्वांगीण विकास होणार आहे. रणजीतबाबू देशमुख यांनी ग्रामीण विकासासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. RD Foundation ने सुरू केलेला हा पुरस्कार उपक्रम ग्रामीण भागात काम करणाऱ्यांना नवी ऊर्जा देणारा आहे. ग्रामीण भागात निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या ग्रामपंचायती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. गावपातळीवर सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने शेतकरी प्रगती करत आहे. विविध क्षेत्रात ज्या ग्रामपंचायती व संस्थांनी उत्तम कामगिरी केली आहे त्यांना या ग्रामविकास पुरस्कारामुळे नवी ऊर्जा मिळणार आहे. लोकसहभागातूनच विकास होत असतो हे या पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींनी व संस्थांनी दाखवून दिले आहे. लोकसहभाग हा ग्रामविकासाचा गाभा आहे”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे होते. महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, माजी ग्रामीण विकास मंत्री रणजीतबाबू देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी RD Foundation च्या या उपक्रमाची स्तुती केली. ग्रामविकास पुरस्कारामुळे विकासाची स्पर्धा निर्माण होऊन प्रत्येक गावात विकासाला चालना मिळेल, असे ते म्हणाले.

रणजितबाबू देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा आणि त्यांच्या पत्नी रुपाताई देशमुख यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

यावेळी RD Foundation चे अध्यक्ष आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी प्रास्ताविकातून पुरस्कारामागील संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, “रणजीत देशमुख ग्रामविकास पुरस्कार-२०२६” हा उपक्रम रणजीतबाबूंच्या ग्रामविकासाच्या दूरदृष्टीला अभिवादन करणारा आहे. त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात ग्रामीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून काम केले. गावांचा विकास हा राज्याच्या प्रगतीचा पाया आहे, ही त्यांची ठाम भूमिका होती. त्याच विचारातून प्रेरणा घेत ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराची संकल्पना माझ्या मनात आली. या पुरस्कारांच्या माध्यमातून इतर गावांनाही प्रेरणा मिळेल आणि ग्रामविकासाची चळवळ अधिक व्यापक होईल, असा मला विश्वास आहे. समाजासाठी कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती आणि संस्थांना नवीन ऊर्जा देण्याच्या संकल्पनेतून आज हा उपक्रम सुरू करतोय. ग्रामीण भारत बदलत आहे आणि त्या परिवर्तनामागे गावपातळीवर निस्वार्थ भावनेने काम करणारी माणसं आजही टिकली आहे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं तसेच त्यांच्या माध्यमातून गावांचा विकास व्हावा, यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. या पुरस्काराच्या माध्यमातून लोकांना प्रेरणा मिळेल आणि ग्रामविकास पुरस्काराची संकल्पना खऱ्या अर्थाने फलश्रुत झालेली येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल, अशीच अपेक्षा आजच्या दिवशी करतो.”

या पहिल्याच वर्षी खालील ९ ग्रामपंचायती / संस्थांना “रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार-२०२६ व प्रत्येकी एक लाख रुपये देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले :

• लोकसहभाग क्षेत्रात गौरवास्पद कामगिरीबद्दल ग्रामपंचायत उमरी भरतपूर, ता. सावनेर

• गुन्हेगारीमुक्त, दारूबंदी व महिला संरक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी ग्रामपंचायत विरली, ता. उमरेड

• सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तसेच पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ग्रामपंचायत तरोडी, ता. कामठी

• जलसमृद्ध गाव संकल्पना प्रभावीपणे राबविल्याबद्दल ग्रामपंचायत खुर्सापार ता. काटोल

• उपजीविका क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ग्रामपंचायत आष्टीकला, ता. कळमेश्वर

• शिक्षण क्षेत्रातील नाविण्यपूर्ण ज्ञानवर्धिनी शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चणकापूर, ता. सावनेर

• आरोग्य क्षेत्रातील प्रशंसनीय कार्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र भिष्णूर, ता. नरखेड

• आदर्श ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायत धामणा, ता. मौदा

• ग्रामविकासासाठी सातत्यपूर्ण CSR योगदानाबद्दल JSW Foundation, कळमेश्वर

कार्यक्रमाला डॉ आयुश्री देशमुख, गिरीश गांधी, आयोजन समितीमध्ये माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद नागपूर अनिलबाबू देशमुख, अशोकराव धोटे, सुनिताताई गावंडे, संध्याताई गोतमारे आणि निशाताई सावरकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामपंचायत प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. सूत्रसंचालन डॉ विजय धोटे आणि आभार प्रदर्शन अशोकराव धोटे यांनी केले.