

नागपूर (Nagpur), दि. 6 फेब्रुवारी 2026: महावितरणच्या नागपूर परिमंडळांतर्गत येणाऱ्या महाल विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाल विभागातील चार महत्वाच्या 33/11 केव्ही वीज उपकेंद्रांना त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापन, तांत्रिक अचूकता आणि दर्जेदार ग्राहक सेवेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयएसओ 9001:2015 हे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
नागपूर शहरातील बाजारपेठ आणि महत्वाची म्हणून ओळखली जाणा-या महाल विभागातील आनंदम उपकेंद्र, मॉडेल मिल उपकेंद्र, उमरेड रोड आणि जयहिंद या 33/11 केव्ही या उपकेंद्रांनी यशाचे शिखर गाठले आहे. महावितरणच्या ‘सुसह्य जीवन’ (Ease of Living) संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणीसाठी केवळ वीज पुरवठा करणेच नव्हे, तर तो अखंडित आणि उच्च दाबाचा (Quality Power) देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मानक ठरलेली कार्यप्रणाली हे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून उपकेंद्रांच्या कामकाजात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत, ज्यात प्रामुख्याने प्रामुख्याने उपकेंद्रातील सर्व यंत्रसामग्री आणि सुरक्षा प्रणालींची कडक चाचणी घेऊन त्यांचे नूतनीकरण करण्यात आले. रोहित्र (Transformers) आणि वीजवाहिन्यांची अत्याधुनिक पद्धतीने तपासणी व देखभाल, ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी पारदर्शक आणि वेगवान कार्यप्रणाली आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जागतिक मानकांचा अवलंब आणि उपकेंद्र परिसराचे सुशोभीकरण या बाबींभर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांची एकजूट आणि ‘टीम वर्क’चे यश विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, हे यश केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे नव्हे, तर उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी स्वतःहून घेतलेल्या पुढाकारामुळे मिळाले आहे. कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने कामकाजात शिस्तबद्धता आणली आणि सेवा सुधारण्यासाठी अतिरिक्त श्रम घेतले. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वी झाला.
हे यश महाल विभागातील सर्व अभियंता, तांत्रिक कर्मचारी, देखभाल-दुरुस्ती पथक (Maintenance Team) आणि ऑपरेटर यांच्या अथक परिश्रम, उत्कृष्ट योगदान आणि कर्तव्यनिष्ठेचे फलित आहे. हे मानांकन म्हणजे महाल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक कष्टाची आणि समर्पणाची पावती आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
















