Home Top News कूलर वापरताना घ्या ‘ही’ काळजी;महावितरणचे नागरिकांना आवाहन

कूलर वापरताना घ्या ‘ही’ काळजी;महावितरणचे नागरिकांना आवाहन

0

नागपूर (Nagpur), दि. 28 मे, 2026: – उन्हाचा वाढता पारा आणि उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी सध्या घराघरांमध्ये कूलरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कूलरचा हा गारवा आपल्याला सुखद वाटत असला, तरी किरकोळ निष्काळजीपणा किंवा तांत्रिक बिघाडामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडेच खरबी रोड येथील एका इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरचा चालू कूलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. एका तज्ज्ञ व्यक्तीच्या बाबतीत घडलेली ही घटना अत्यंत चटका लावून जाणारी आहे.
हाच अनर्थ टाळण्यासाठी आणि नागरिकांचा उन्हाळा सुरक्षित व निर्धास्त जावा, यासाठी महावितरणने काही सोपे आणि अत्यंत महत्त्वाचे सुरक्षेचे नियम जाहीर केले आहेत. थोडीशी सतर्कता ठेवून आपण आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेऊ शकतो.

‘अर्थिंग’ योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे! – महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, कूलरमध्ये बिघाड असल्यास आणि घरात योग्य ‘अर्थिंग’ (Earthing) नसेल, तर कूलरच्या लोखंडी बॉडीमध्ये विजेचा प्रवाह उतरतो. अशा वेळी ओल्या हाताने किंवा अनवाणी पायाने स्पर्श झाल्यास तीव्र शॉक बसू शकतो. त्यामुळे घराची वीज यंत्रणा सुरक्षित असणे गरजेचे आहे.

सुरक्षित गारव्यासाठी ‘हे’ नियम नक्की पाळा:
• पाणी भरताना सावधानता: कूलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी मुख्य स्विच (Main Switch) बंद करून प्लग पूर्णपणे बाहेर काढावा. चालू कूलरमध्ये कधीही पाणी भरू नये.
• आयएसआय (ISI) मार्कच निवडा: बाजारातून कूलर खरेदी करताना नेहमी आयएसआय मार्क असलेला दर्जेदार कूलरच खरेदी करा.
• तज्ज्ञांकडून तपासणी: कूलर उन्हाळ्यात पहिल्यांदा सुरू करण्यापूर्वी अधिकृत इलेक्ट्रिशियनकडून त्याची आणि घराच्या अर्थिंगची व्यवस्थित तपासणी करून घ्यावी.
• ओल्या हातांनी स्पर्श टाळा: हात ओले असताना किंवा पाय ओले असताना कोणत्याही विद्युत उपकरणाला अथवा स्विचला स्पर्श करू नये.
• स्वतंत्र पॉवर सॉकेट: कूलरसाठी नेहमी स्वतंत्र पॉवर सॉकेटचा वापर करा. एकाच सॉकेटवर अनेक मोठी उपकरणे (मल्टिप्लग) जोडणे टाळा.
• गृहिणी आणि लहान मुलांची विशेष काळजी: घरातील लहान मुले खेळताना कूलरच्या लोखंडी जाळीला स्पर्श करण्याची शक्यता असते, त्यामुळे मुलांना कूलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे. महिलांनीही ओल्या हाताने कूलर हाताळू नये.
• त्वरित दुरुस्ती: कूलरमधून आवाज येत असल्यास किंवा वायर कट झाली असल्यास त्वरित तज्ज्ञांकडून तो दुरुस्त करून घ्यावा.

शॉक बसल्यास काय करावे?: दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीला विजेचा धक्का लागल्यास, त्याला थेट हात लावू नये. त्वरित मुख्य वीज प्रवाह (Main Switch) बंद करावा आणि कोरड्या लाकडी वस्तूच्या किंवा प्लॅस्टिकच्या साहाय्याने त्या व्यक्तीला विजेच्या स्रोतापासून दूर करावे व त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी.

विद्युत सुरक्षेबाबत कोणतीही शंका असल्यास किंवा अपघात घडल्यास नागरिक महावितरणच्या 1912, 19120, 1800 212 3435 किंवा 1800 233 3435 या 24 तास सुरु असलेल्या टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा.

“घरातील विद्युत उपकरणांची वेळोवेळी तांत्रिक तपासणी करा, सतर्क राहा आणि सुरक्षित उन्हाळ्याचा आनंद घ्या,” असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर