Home Breaking news धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर यांच्या नावाची...

धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर यांच्या नावाची शिफारस

0
धर्मवीर आनंदराव दिघे महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा मिटर टॅक्‍सी चालक कल्‍याणकारी महामंडळ स्‍थापित झाले आहे. त्‍या मंडळाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी राजेंद्र खांडेकर यांची नियुक्‍ती करण्‍याबाबत मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी शिफारस करण्‍यात आली आहे.

चंद्रपूर (Chandrapur): राज्यातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या धर्मवीर आनंदराव दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक असोसिएशन गेल्या 30 वर्षांपासून राज्यभरातील ऑटोरिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांसाठी कार्यरत आहे. चंद्रपूर येथून स्थापन झालेल्या या संघटनेचे नेतृत्व राजेंद्र खांडेकर करत असून, त्यांनी चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे 100 ऑटोरिक्षा चालकांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. नवीन कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून 65 वर्षांवरील चालकांसाठी सन्मान निधी योजना, जीवन विमा, अपंगत्व विमा, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असताना अपघात झाल्यास आर्थिक मदत तसेच कौशल्य विकास योजना राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनांचा लाभ राज्यातील हजारो ऑटोरिक्षा चालक व त्यांच्या कुटुंबीयांना होणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य सरकारकडून लवकरच महामंडळाची अधिकृत स्थापना आणि अध्यक्षपदाची नियुक्ती जाहीर होण्याची शक्यता आहे. ऑटोरिक्षा चालकांच्या प्रश्नांवर दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी आणि राजेंद्र खांडेकर यांच्या नावाचा सकारात्मक विचार करण्यात यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.