सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर कोसळले

0

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (sushma-andhare) यांना महाड येथे घेण्यास आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. अपघात झाला त्यावेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या. केवळ पायलटच त्यामध्ये होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचे कारण अद्याप समजले नाही.

लोकसभा निवडणूक प्रचारासाठी राज्यभरात सुषमा अंधारे फिरत आहेत. त्यांची काल कोकणात सभा होती. त्यानंतर आज ते बारामतीकडे जाणार होत्या. त्यासाठी त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते. परंतु ते हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सुदैवाने सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले. परंतु सुषमा अंधारे यांनी आपण सुखरुप असल्याचे म्हटले आहे. या अपघातामध्ये पायलेट सुखरुप आहे.

तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशीनंतर अपघाताचे कारण समोर येणार आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे सकाळी सकाळी 9.30 वाजता महाडमधून बारामतीकडे हेलिकॉप्टरने जाणार होत्या. त्यासाठी त्या हेलिपॅडवर आल्या होत्या. परंतु त्यापूर्वी अपघात झाला. त्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले आहे.

——–

राहुल गांधी पोहोचले रायबरेलीत
अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना तिकीट

काँग्रेस नेते राहुल गांधी आई सोनिया यांच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. प्रियांका गांधी निवडणूक लढवणार नाहीत. तर अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने योगी सरकारचे मंत्री दिनेश प्रताप सिंह यांना रायबरेलीतून तिकीट दिले आहे, तर स्मृती इराणी अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. याआधी काँग्रेस नेत्यांनी राहुल अमेठीतून आणि प्रियांका रायबरेलीमधून लढणार असल्याचं बोललं होतं. मात्र, प्रियांका निवडणूक लढवण्यास तयार नव्हत्या. रायबरेली-अमेठी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ मे आहे. म्हणजेच राहुल गांधीही आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
——–
उदयनराजेंना भाजपकडून वाईट वागणूक
खासदार अमोल कोल्हेंचे विधान

सातारकरांना जिल्ह्यातून दोन-दोन खासदार देण्याची संधी चालून आली आहे अशी ऑफर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. तसेच शरद पवार हे सर्वसामान्य जनतेसाठी अस्वस्थ होत असतील तर त्यांचा आम्हाला अभिमान आहे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. महायुतीतीचे उमेदवार शशिकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कोल्हे साताऱ्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
————-
एकनाथ खडसे अजूनही राष्ट्रवादीत
भाजप कार्यालयात जाऊन घेतली प्रचाराची सूत्र

कधी काळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. त्यांनी स्वत: आपण पुन्हा स्वगृही भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु त्यांच्या भाजप प्रवेशाला अजून मुहूर्त मिळत नाही. एकीकडे सध्या लोकसभा निवडणूक प्रचार सुरु आहे. त्यांची सून रक्षा खडसे भाजपची उमेदवार आहे तर त्यांच्या सध्याच्या पक्षात श्रीराम पाटील उमेदवार आहेत. या सर्व परिस्थितीत एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी कार्यालयात जाण्याऐवजी भाजप कार्यालयात बसत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून भाजप कार्यालयातून त्यांनी प्रचाराची सूत्र हाती घेतली आहे. यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे. पक्षप्रवेशाविना खडसे भाजप कार्यालयात बैठका घेत असल्याने भाजपचे कार्यकर्ते गोंधळात पडले आहे.
—-

संजय निरुपम शिवसेनेत प्रवेश करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले संजय निरुपम आता शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. संजय निरुपम 3 मे रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर संजय निरुपम यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केला आहे. संजय निरुपम 20 वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी करणार आहे. 20 वर्षानंतर शिवसेनेत घरवापसी होत असल्याचं आनंद यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी 3 ते 4 वाजता शिवसेना पक्षात प्रवेश करणार, पुढील माहिती तुम्हाला पक्षाकडून भेटेल, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट आणि चर्चा झाल्यानंतर संजय निरुपम यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.
———–
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नोटीस

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक आयोगच्या नोटीसा देण्यात आल्या. खर्च कमी दाखवला असल्याने खर्चात तफावत आढळून आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावली आहे. सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या तपासणीत निवडणूक खर्चात 9 लाख 10 हजाराची तफावत आढळून आली आहे. सुप्रिया सुळे यांच्या खर्चात १ लाख ३ हजार रुपयाची तफावत आढळली. 48 तासात खुलासा करावा, अन्यथा उमेदवारांच्या खर्चात तफावत समाविष्ट केली जाईल. नोटीसीवर आक्षेप असल्यास जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे दाद मागण्याचा अधिकार आहे.

सुशीलकुमार शिंदे भाजपात जाणार?
राज्यातील बड्या नेत्याने केला गौप्यस्फोट
भाजपने यापूर्वी राज्यात काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. अनेक पट्टीचे नेते त्यांनी गळाला लावले आहे. अशोक चव्हाण नुकतेच भाजपवासी झाले आहेत. तर आता लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे पण भाजपमध्ये जाणार असल्याचा गौप्यस्फोट राज्यातील या बड्या नेत्याने केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरच्या सभेत एक मोठा दावा केला आहे. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे निवडणूक झाल्यानंतर भाजपात प्रवेश करतील असं त्यांनी म्हटलं आहे.