

भाग -१
शिवाजी महाराजांनी Shivaji Maharaj १६४५ साली वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला व जुलमी सत्तेविरूद्ध रणशिंग फुंकले. गनिमी काव्यासारखे युद्धतंत्र, सुनियोजित मोहिमा व मुत्सद्दी धोरण अवलंबून त्यांनी मराठा साम्राज्याचा पाया रचला. असहिष्णू इस्लामी सत्तेविरुद्धच नव्हे, तर वसाहतवादी पोर्तुगीज, इंग्रज यांच्या विरोधातही लढा दिला. जनतेच्या आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक रक्षणासाठी त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. १६७४ मध्ये रयतेची कणव असलेल्या ह्या जाणत्या राजाचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर सहा वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. मराठेशाहीतील समकालीन संदर्भात वेळोवेळी झालेल्या उल्लेखांवरून, १६७४ ते १८१८ पर्यंतच्या मराठा साम्राज्याच्या ह्या संपूर्ण अस्तित्वाला ‘शिवशाही’ म्हटले गेले आहे.
१६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८१ मध्ये त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी अभिषिक्त झाले. १६८१ पासून १६८९ पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यविस्ताराचे धोरण स्वीकारले. ८ वर्षांच्या कारकिर्दीत छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीज, सिद्दी आणि मुघल अशा आघाड्यांवर यशस्वी तोंड देत राज्याची आणि प्रशासनाची घडी बसवली. त्यांना वेळप्रसंगी स्वकीयांशी देखील लढावे लागले. १६८९ साली छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत अडकले. औरंगजेबाच्या आदेशावरून, शरियानुसार सलग चाळीस दिवस अमानुष छळ करून छत्रपती संभाजी महाराजांची ११ मार्च १६८९ रोजी वढू (बुद्रुक) येथे क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबासमोर मान न झुकवता, धर्माभिमान स्मरून मरण यातना स्वीकारल्या आणि ते मृत्युंजय झाले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे कनिष्ठ बंधू राजाराम स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले. स्वराज्याच्या अतिशय प्रतिकूल काळात (१६८९ ते १७००) त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या साहाय्याने नेतृत्व केले. कारकिर्दीच्या मोठ्या कालखंडात त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथून स्वराज्याची धुरा सांभाळली. ३ मार्च, १७०० रोजी छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. निधनानंतर त्यांची विधवा पत्नी ताराराणी यांनी त्यांचा पुत्र शिवाजीच्या नावाने साम्राज्यावर नियंत्रण मिळवले. ताराराणी यांनी मुघलांच्या विरोधात शौर्याने मराठ्यांचे नेतृत्व केले. प्रचंड सैन्य आणि साधनसामुग्री घेऊन स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी दक्षिणेत आलेला औरंगजेब येथे असताना १७०६पर्यंत उत्तरेकडे कूच करत मराठ्यांनी नर्मदा नदी ओलांडली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मुत्यूनंतर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत औरंगजेबाशी सलग १८ वर्ष ज्याप्रकारे मराठ्यांनी झुंज दिली, असा कडवा प्रतिकार जगाच्या इतिहासात तुरळकच पाहायला मिळेल. हिंदवी स्वराज्य बळकाविण्यात औरंगजेब अखेर अपयशी ठरला व १७०७ साली महाराष्ट्रातच मरण पावला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांची पुढचा मोगल बादशाहा बहादूरशाहने मुक्तता केली. मुक्तता झाल्यानंतर शाहू (प्रथम) यांनी मराठा सिंहासनावर हक्क सांगितला आणि ताराराणी यांना आव्हान दिले. वारसा हक्काच्या वादातून १७०७ नंतर मराठा साम्राज्याची सातारा व कोल्हापूर अशी दोन सत्ताकेंद्रे तयार होत गेली. ज्यावर पुढे १७३१ च्या वारणा कराराने शिक्कामोर्तब झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अष्टप्रधान मंडळात पेशवा / पंतप्रधान हे पद अस्तित्वात होते. शामराज नीळकंठ रांझेकर हे पहिले पेशवा होत. त्यानंतर महाराजांनी पेशवा हे पद मोरोपंत पिंगळ्यांना दिले. मोरोपंत पिंगळे यांच्या मृत्यूनंतर पेशवा पद त्यांचे चिरंजीव नीळकंठ पिंगळे यांच्याकडे आले तर नीळकंठ पिंगळे यांच्या मृत्यूनंतर पेशवा पद त्यांचे बंधू बहिरोपंत पिंगळे यांच्याकडे आले. छत्रपती शाहू (प्रथम) आणि ताराराणी यांच्यात उद्भवलेल्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, ताराराणींशी एकनिष्ठ असलेल्या कान्होजी आंग्रे यांनी बहिरोपंत पिंगळे यांना कैद केले होते. त्यांना सोडविण्याची जबाबदारी शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट यांचेवर सोपविली. बाळाजी विश्वनाथ यांनी बहिरोपंत पिंगळे यांना यशस्वीरित्या, सुखरूप सोडवून आणल्यानंतर शाहू महाराजांनी पेशवा हे पद बाळाजी विश्वनाथ भट यांच्याकडे सोपविले.
१७१२ साली फर्रुखसियार याने स्वतःला मुघल बादशहा म्हणून घोषित केले होते. सत्ताग्रहण करण्यात त्याला सय्यद बंधूची मदत घ्यावी लागली. कालांतराने दोन्ही सय्यद बंधू आणि फर्रुखसियार यांच्यामध्ये वैर निर्माण झाले. स्वराज्याचे तत्कालीन पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी या संधीचा फायदा घेत सय्यद बंधूशी वाटाघाटी केल्या. यामुळे मराठ्यांना मुघल बादशाहाच्या विरोधात लढण्यासाठी नवी तरफ मिळाली. मराठा सैन्य आणि सय्यद बंधूच्या सैन्याने एकत्रित दिल्लीला कूच केले आणि फर्रुखसियारला मुघल बादशहा पदावरून बाजूला केले. या मदतीच्या बदल्यात, बाळाजी विश्वनाथ यांनी आधी झालेल्या वाटाघाटींप्रमाणे भरीव मोबदला घेतला. त्यानुसार शाहू महाराजांनी दक्षिणेत मुघलांशी सहकार्याचे धोरण स्वीकारले. त्या बदल्यात शाहू महाराजांना दक्षिणेतील भूभागावर स्वतंत्र मराठा साम्राज्य घोषित करणारी फर्माने दिली गेली. तसेच गुजरात, माळवा आणि दक्षिणेतील मुघलांच्या ताब्यात असलेल्या सहा प्रांतांचे चौथ आणि सरदेशमुखी वसुलीचे हक्क व अधिकार प्राप्त झाले. या करारानुसार शाहू महाराजांच्या मातोश्री व छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी, येसूबाई यांनाही मुघल कारागृहातून सोडण्यात आले. शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रोत्साहनाने जे जे मराठा सरदार पुढे आले त्यामध्ये नागपूरकर भोसल्यांचाही समावेश होता. नागपूरकर भोसल्यांनी पूर्व भारतामध्ये पराक्रम गाजवीत मराठ्यांचा दबदबा निर्माण केला आणि साम्राज्य विस्तारास हातभार लावला. एप्रिल १७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र बाजीराव यांची छत्रपती शाहू महाराजांनी पेशवा म्हणून नियुक्ती केली. अवघ्या विशीत त्यांनी पेशवेपदाची जबाबदारी स्वीकारली. बाजीराव पेशव्यांनी आपले बंधू चिमाजी अप्पा व राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, उदाजी पवार अशा मातब्बर सरदारांसोबत मराठा साम्राज्याचा विस्तार केला. वीस वर्षांच्या अभूतपूर्व कारकिर्दीत त्यांच्यानेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या एकाही लढाईत मराठा सैन्याला हार पत्करावी लागली नाही, पर्यायी मराठा साम्राज्याचा प्रदीर्घ विस्तार झाला. पहिले बाजीराव पेशवे यांच्या पश्चात, त्यांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांना शाहू महाराजांनी पेशवा
म्हणून नेमले. शाहू महाराजांचा १७४९ मध्ये मृत्यू झाला. १७५८-५९ दिल्लीच्या राजकारणात उद्भवलेल्या राजकीय पोकळीचा फायदा घेऊन, नानासाहेबांचे बंधू रघुनाथराव यांनी मराठा सैन्यासह पंजाबपर्यंत धडक मारली. १७६० मध्ये दक्षिणेत हैदराबादच्या निजामाचा पराभव केल्यानंतर, मराठा साम्राज्य भौगोलिकदृष्ट्या भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य करत होते. मात्र अफगाणी नेतृत्वाखालील तयार झालेल्या सैन्याने
(ज्यात रोहिले नजीब खान, शुजा-उद्-दौला यांचा समावेश होता)
१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठा सैन्याचा निर्णायकरित्या पराभव झाला. पानिपतच्या पराभवामुळे मराठा साम्राज्य विस्तार रोखला गेला आणि पर्यायाने अंतर्गत दुफळीमधून साम्राज्याचे नियंत्रण मातब्बर सरदारांमध्ये विभागले गेले. या युद्धानंतर मराठा साम्राज्यातील सरदार परत कधीही एकत्र लढले नाहीत. दिल्ली/आग्र्याचे नियंत्रण ग्वाल्हेरहून महादजी शिंदे यांनी केले. मध्य भारताचे नियंत्रण इंदूर येथील होळकरांनी तर पश्चिम भारतातील भागाचे नियंत्रण सरदार गायकवाड यांच्याकडे होते. १७६१ नंतर, माधवराव पेशवे यांनी साम्राज्याचे पुनर्निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मोठ्या साम्राज्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने, सरदारांना अर्ध-स्वायत्तता देण्यात आली.
मुंबईमध्ये जम बसविलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १७७५ मध्ये, रघुनाथरावांच्या वतीने पुण्यात पेशव्यांमध्ये वारसाहक्कावरून उद्भविलेल्या संघर्षात हस्तक्षेप केला ज्याचे परिवर्तन पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात झाले. पेशवे पदाच्या शर्यतीत, युद्धपूर्व स्थितीला मान्यता मिळून पहिले इंग्रज-मराठा युद्ध १७८२ साली निकालात निघाले. अशाच प्रकारे १८०२ मध्ये बडोदा घराण्यात उद्भवलेल्या अंतर्गत वादात मध्यस्थी करून कंपनी सरकारने पुन्हा एकदा हस्तक्षेप केला.
घराण्याच्या नवनेतृत्वाशी वाटाघाटी करून बडोद्याला स्वतंत्र संस्थानाचा दर्जा देत कंपनी सरकारचे मांडलिक बनविले. ३१ डिसेंबर १८०२ रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रज कंपनी सरकार यांच्यात वसईचा तह झाला. यानुसार पेशव्यांबरोबर ६००० इंग्रजी फौज कायमस्वरूपी पुण्यात तैनात करण्यात आली. त्याचप्रमाणे, कुठलाही तह आणि युद्ध इंग्रजांच्या सल्ल्याशिवाय करू नये, पेशव्यांनी सुरत आणि बडोद्यावरील हक्क सोडून द्यावा अशा स्वरूपाच्या पेशव्यांच्या राजकारणावर नियंत्रण मिळविणाऱ्या अन्य अटींचा या तहात अंतर्भाव होता. या तहाची परिणती दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात (१८०३-१८०५) झाली.
दक्षिणेतील भूभागावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने निर्णायकरित्या झालेल्या तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (१८१७-१८१८) हार पदरी पडून मराठा साम्राज्य लोप पावले. विविध लढायांची मालिका असलेल्या तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धातील कोरेगाव भीमा येथे झालेली लढाई ही अनिर्णायक लढाई होती. या लढाईचा सविस्तर परामर्श पुढील भागात घेतला आहे.
शिवशाहीच्या मध्य-उत्तरार्धात छत्रपतींच्या अधिपत्याखाली राज्याचे प्रमुख प्रधान किंवा ‘पेशवा’ यांनी राज्यकारभार केला. पेशवे सार्वभौम राजे कदापि नव्हते. त्यांनी छत्रपतींच्या अधिपत्याखाली शिवशाहीचा राज्यकारभार चालविला असा उल्लेख त्यांच्या मुद्रेमध्ये केला आहे. त्यापैकी पहिले बाजीराव पेशवे यांच्या मुद्रेमध्ये ‘श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान बाजीराव बळाळ मुख्य प्रधान’ असा मायना आहे.