

भाग 3
विविध संदर्भावरून असा निष्कर्ष निघतो की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तमाम मराठेशाहीत महार बांधवांवर कुठल्याच प्रकारची सैन्य बंदी नव्हती, तर उलटपक्षी मराठेशाहीत महार समाजाला लष्करात प्रवेश होता. त्याचप्रमाणे महार सैनिक इंग्रजांच्या सैन्यात होते तसेच ते पेशव्यांसाठी देखील लढले असे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. पेशवे काळात लढाईमध्ये पराक्रम गाजवणाऱ्या व्यक्तीस ‘उडत रुमाल’ हा बहुमान दिला जात असे व कित्येक प्रसंगी हा बहुमान महार बांधवांनी पटकावल्याचे नमूद आहे. इंग्रज विरोधी लढाईत पेशव्यांच्या सैन्यात मांग, रामोशी, भिल्ल समाजाचे सैनिक होते अशी नोंद इंग्रजांनी केली आहे.
एल्गार परिषदेत खोटी,
अनैतिहासिक मांडणी
१ जानेवारी १८१८च्या कोरेगाव भीमा लढाईला २०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात शनिवार वाडा येथे ‘एल्गार परिषद’ कार्यक्रम आयोजित केला होता. ३१ डिसेंबर पूर्वी या एल्गार परिषदेचे काही आयोजक जयस्तंभ परिसर पाहणीकरिता आले असता, कॅप्टन बाळासाहेब आनंदराव जमादार माळवदकर (निवृत्त) यांना भेटले होते. कॅप्टन जमादार माळवदकर यांनी कोरेगाव भीमा लढाईत शौर्य गाजविणारे आणि पहिले जयस्तंभ इन-चार्ज जमादार खंडोजीबीन गजोजी माळवदकर यांची माहिती त्यांना दिली. मात्र एल्गार परिषदेनिमित्त ‘भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान’ने जे पत्रक व पुस्तिका प्रकाशित केली त्यात कुठेही खंडोजीबीन गजोजी माळवदकर यांचा उल्लेख सापडत नाही. उलटपक्षी कोरेगाव भीमा लढाईत ज्यांचा सहभागच नव्हता त्या सिदनाक महार यांचा उल्लेख मात्र ठळकपणे केला आहे. “उडवा ठिकऱ्या राई राई रं, गाडून टाका पेशवाई रं, गर्जना सिदनाकाची, आली नव्याने पेशवाई रं… गरज तिला ठोक्याची…” असे गीत एल्गार परिषदेत सादर केले गेले. या गीताचा मोठा प्रचार प्रसारही करण्यात आला. सिदनाक महार मराठ्यांचे शूर योद्धा होते. ते पेशव्यांच्या विरोधात लढल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे पेशवाई गाडायची ‘गर्जना सिदनाकची’ हा प्रचार खोटा आहे. जी लढाई जातीअंतासाठी लढली गेली नाही त्या कोरेगाव भीमाच्या लढाईला २०० वर्ष पूर्ण होताना, जणू आजची सर्व व्यवस्था लोकशाही नसून ‘नवी पेशवाई’ आहे आणि या नव्या पेशवाईला ठोकले पाहिजे, गाडले पाहिजे असे आव्हान सिदनाकाचे नाव वापरून केले गेले. हा प्रकार संशयास्पद आहे. दरम्यान एल्गार परिषद संबंधित दाखल गुन्ह्यात काही लोकांना प्रतिबंधित नक्षलवादी चळवळीतील सक्रिय सदस्य या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे.
इंग्रजांचा जातीवाद – महार सैनिक शूर होते आणि आहेत यात शंकाच
नाही. त्याचप्रमाणे तत्कालीन समाजात जातिभेदही अस्तित्वात होता. परंतु त्याचा इंग्रज-मराठा युद्धाशी काही संबंध नाही. १८१८च्या पूर्वी आणि नंतरही अनेक लढ्यांमध्ये इंग्रजांच्या सैन्यात महार सैनिक होते, अन्य जाती, धर्माचे सैनिक ही होते. ते सर्व इंग्रज सैन्यात नोकरीस होते. मात्र १८९२ नंतर महारांना, अस्पृश्यांना इंग्रजांनी लष्कर प्रवेश बंदी केली. इंग्रजांच्या या जातीवादी आणि विश्वासघातकी धोरणाविरोधात डॉ. आंबेडकर यांसह अनेकांनी चळवळ उभी केली. १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. आंबेडकरांची जयस्तंभ भेट याच ऐतिहासिक इंग्रज विरोधी चळवळीतील एक घटना आहे. कोरेगावची लढाई खरोखरच जातीअंताची असती तर १०९ वर्षांनी इंग्रज सत्तेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रजांच्या जातीभेद विरोधात जयस्तंभाला सभा बोलवावी लागली नसती. व्यापारासाठी आलेले इंग्रज सत्ता काबीज करू पाहत होते. इथल्या जातीभेदात वा त्याच्या निर्मूलनात त्यांना स्वारस्य नव्हते. उलटपक्षी त्यांनीही जातीवादी भूमिका घेऊन काम केल्याचे दाखले इतिहासात आहेत. कोरेगावच्या लढाईत इंग्रजांकडील पूना ऑक्सिलरी हॉर्स पलटणचे २५० घोडदळ सहभागी होते.
या पलटणीच्या नवनिर्मितीच्या वेळी इंग्रजांनी दिलेल्या जाहिरातीमध्ये ‘Men of low caste not to be admitted’, असे म्हटले होते. (संदर्भ “पूना हॉर्सेस” या पुस्तकात मिळतो.) अशाप्रकारे आपल्या सैन्याच्या एका तुकडीत “खालच्या जातीचे सैनिकांना प्रवेश नाही” त्याचप्रमाणे “जयस्तंभ इन विजयस्तंभाचा केलेला अपमान !’ या प्रकरणात “अलीकडच्या काळात ‘रोल ऑफ ऑनर’ या नावाखाली १९६५ व १९७१च्या युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांची त्यातही उच्चजातीय ब्राह्मण जातीच्या सैनिकांची नावे त्या शिलापटावर कोरण्यात आलेली आहे,” असे म्हटले आहे. याच पुस्तकात असे म्हटले आहे कि, “… अशा उपद्व्यापी कृत्यामुळे महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांच्या विरोधात दंगली सुद्धा पेटू शकतात.
भीमा कोरेगावच्या जयस्तंभाचे विकृतीकरण चालू असल्याने जनतेत असंतोष वाढत आहे याला पेशव्यांचे वर्तमान वारस जबाबदार आहेत. ५०० विरुद्ध २८००० ब्राह्मण असे जे युद्ध झाले ते युद्ध जगातील अद्वितीय युद्ध होय. त्या युद्धाला मिटविणे ब्राह्मणांना शक्य नाही पण मुळातच उलट्या काळजाचे असलेले ब्राह्मण त्या जयस्तंभाचे कशा पद्धतीने विकृतिकरण करतात याचा हा दाखला होय.” पुस्तकात असेही म्हटले आहे कि, “१ जानेवारी २०१८च्या आत या अशा विकृतीकरणाला पायबंद बसला नाही तर या पेशवाई बुडाल्याच्या २००व्या वर्षानिमित्त मोठा जनउद्रेक हा मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नक्कीच उफाळेल!” गंभीर बाब म्हणजे १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा परिसरात हिंसाचारही झाला. आपण लक्षात घेणे गरजेचे आहे कि १ जानेवारी १८१८ कोरेगावची लढाई काही स्वातंत्र्याचे बंड नव्हते. या लढाईत विविध जातीधर्माचे सैनिक होते. तसेच कोरेगाव जयस्तंभाचा कोणत्याही राजकीय पक्ष किंवा अन्य संघटनेशी काहीच संबंध नाही. तरीही ‘रोल ऑफ ऑनर’ शीलापटावरील हुतात्मा सैनिकांचा जातीवाचक उल्लेख करणे आणि त्या अनुषंगाने उद्रेक होईल अशी चिथावणी देणे चुकीचे आहे. जातीवादी मानसिकतेतून ‘रोल ऑफ ऑनर’ शीलापट काढून टाकण्याची मागणी काही संघटना करतात, त्यासाठी आंदोलन उपोषण करतात. त्यांनी कोरेगावच्या लढाईचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे.
या शीलापटामुळे कोणाचाही अपमान होत नाही. १९६५ आणि १९७१ च्या युद्धात भारतासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांकडून आपण प्रेरणा घ्यायला हवी. तरीदेखील याबद्दल आक्षेप असेलच तरीही जातीवाद करून उद्रेकाची भाषा करणे समाजाच्या हिताचे नाही. माहिती अधिकारात प्राप्त पोलिसांच्या अहवालानुसार तर १ जानेवारी २०१८ रोजी स्तंभाशेजारील आमच्या कुटुंबाच्या घरावर हल्ला करण्याचे नियोजन असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने तेथे संरक्षण देण्यात आले होते. एप्रिल २०१८ मध्ये पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना सादर केलेल्या या अहवालातील नोंद पुढीलप्रमाणे आहे:
“जयस्तंभास मानवंदना देण्याच्या या कार्यक्रमाचा सुरक्षा बंदोबस्त आखणी करताना या जयस्तंभाच्या देखभालीसाठी इंग्रजांनी परंपरागत नेमलेले श्री. माळवदकर व त्यांच्या कुटुंबियांच्या जयस्तंभ परिसरातील घरास दलित संघटनांचा असलेला विरोध व ते घर उध्वस्त करण्या संदर्भातील त्यांच्या निर्धाराची गोपनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती आणि जयस्तंभावर नव्याने बसवण्यात आलेली सन १९६५ व १९७१ च्या युद्धातील हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या नावांची वादग्रस्त पाटी काढून टाकली जाण्याची शक्यता दाट असल्याने श्री. माळवदकर यांच्या कुटुंबियांना व त्यांच्या घरास वर नमूद केल्याप्रमाणे पुरेसे संरक्षण दिलेले होते. तसेच मानवंदना देताना जयस्तंभाचे शेजारूनच जावे लागते असल्याने जयस्तंभासही पुरेसे व सशस्त्र संरक्षण दिलेले होते.”
जातीवादामुळे भारतीय सैन्याने जयस्तंभाला येणे बंद केले- भारतीय सैन्याने लावलेल्या या शिलापटामुळे निर्माण झालेल्या वादावर ‘द इंडियन एक्सप्रेस’ने ‘Controversy over ‘Roll of Honour’ tile put up by Army on Bhima Koregaon ‘Jaystambh’ अशी २२ डिसेंबर २०१७ रोजी बातमी दिली. यामध्ये भारतीय लष्करी अधिकाऱ्याची प्रतिक्रिया आहे. त्यानुसार जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी पूर्वीपासून भारतीय सैनिक आणि अधिकारी येत असत. पण एका लष्करी लढाईला जातीय रंग दिल्याने भारतीय सैन्याने जयस्तंभाला येणे बंद केले. (सदर बातमी वाचण्यासाठी क्यू आर कोड वर स्कॅन करा.). खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीही आपल्या ‘कोरेगावचा अपमान’ लेखात म्हटले आहे की “… कोरेगावचा स्तंभ १ जानेवारी हा सर्व फुटीरवादी, विभक्तवादी, व्यक्तिवादी दलालांचा राजकीय परवाने नूतनीकरण करण्याचा अड्डा झाला. त्याचे फलित असे की लष्कराने स्तंभाला मानवंदना देण्याच्या कार्यक्रमातूनच माघार घेतली. ही फुटीरवादी नेत्यांची, गटवादी नेत्यांच्या कामाची लष्कराला हुसकावून लावणे ही फलश्रुती आहे.”
छत्रपती संभाजी महाराजांची हत्या आणि कोरेगावच्या लढाईचा संबंध नाही – कोरेगाव भीमा लढाईच्या अनुषंगाने “संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला…! १ जानेवारी १८१८ चलो……. भीमा कोरेगाव” अशा स्वरूपाचा अपप्रचार देखील केला गेला. याच आशयाचे लेख, व्हिडिओही सोशल मीडियावर प्रसारित केले गेले. १६८९ साली कोरेगावच्या लढाईच्या आधी तब्ब्ल १२९ वर्षापूर्वी शेजारच्या वढू (बु) या गावी छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्युदंडानंतर, औरंगजेबाच्या आदेशानुसार त्यांच्या शरीराचे तुकडे करून सर्वत्र फेकले. त्या छिन्नविच्छिन्न देहाचा अंत्यविधी कोणी केला यासंदर्भात वादग्रस्त इतिहास पसरविल्याने दोन समूहांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. यामध्ये कोण चूक कोण बरोबर शोधणे हा या पुस्तिकेचा हेतू नाही. परंतु हेतू पुरस्सर खोटा इतिहास सांगून काही लोक छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा ओढूनताणून कोरेगाव भीमा लढाईशी संबंध जोडत आहेत. त्यामुळेच १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगांव भीमा येथे झालेली लढाई आणि छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने केलेली हत्या या दोन घटनांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही हे लिहिणे क्रमप्राप्त आहे.
कोरेगावच्या लढाईत ‘जय भीम’ घोषणा दिल्याचे पुरावे नाहीत- ‘टाईम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने दिलेल्या ‘Chronologically ‘Jai Bhim’ is older than ‘Jai Hind’: Experts’ या एप्रिल १८, २०१६ रोजी दिलेल्या बातमीनुसार दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात, समाजशास्त्र विभागात प्राचार्य असलेले विवेक कुमार यांनी कोरेगाव भीमा लढाईमध्ये सर्वप्रथम ‘जय भीम’ घोषणा वापरली असे म्हटले आहे. खोटा इतिहास आणि खोटा प्रचार याची ही परिसीमाच म्हणायला हवी. हे सर्वश्रुत आहे कि ‘जय भीम’ घोषणा बाबासाहेबांच्या ‘भीमराव’ या नावावरून त्यांच्या गौरवार्थ दिली जाते. विशेषतः आंबेडकरी चळवळीत एकमेकांना अभिवादन करतानाही या प्रेरणादायी घोषणेचा उच्चार केला जातो. डॉ आंबेडकरांच्या जन्माच्या अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या कोरेगावच्या लढाईत ही घोषणा दिली गेली असा दावा कोणी प्राध्यापक करत असेल तर नियोजनपूर्वक एक अपप्रचार चळवळ चालवली जात असल्याची शंका उत्पन्न होते. (सदर बातमी वाचण्यासाठी शेजारी दिलेला क्यू आर कोड वर स्कॅन करा.)
१ जानेवारी १८१८च्या घटनेनंतर अवघ्या सहा महिन्यांत शिवशाही संपुष्टात आली. मराठेशाहीत दुही निर्माण करुन इंग्रजांनी आपले सार्वभौमत्व गिळंकृत केले. काही शे इंग्रजांनी लाखो भारतीयांना गुलाम बनवले. ते स्वातंत्र्य मिळवायला पुढची १५० वर्षं खर्ची गेली. कोरेगाव भीमाच्या लढाईला जातीय वळण देऊन आज समाजात फूट पाडली जात आहे. लढाईत वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना जातीची लेबले चिटकवली गेली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी वेचले. त्यांचेच नाव घेऊन जातीवादाला खतपाणी मिळेल अशा पद्धतीने खोटा इतिहास सांगून सामाजिक सलोखा भंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
इतिहासातील महापुरुषांची आणि खुद्द इतिहासाची हेतू पुरस्सर जातीजातीत
विभागणी केली जात आहे. आपल्यात फूट पाडून समाज दुबळा करण्याचे हे प्रयत्न
आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या संवैधानिक लोकशाही मार्गाच्या आधारे
आपण, आपली एकी, बंधुत्व टिकवून ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा फुटीरतावादाची
आग आपल्या घरादारापर्यंत येणार हे निश्चित. समाजात विविध मतप्रवाह असतात
आणि लोकशाहीत हे अपेक्षितही असते. परंतु हे सर्व भिन्न विचारधारेचे मतप्रवाह
एकत्र घेऊन आपण शांततेत जीवन व्यतीत करू शकतो यावर आपला विश्वास हवा.
वास्तवाची कास धरून, कोणाचाही द्वेष न करता, आपण जागरूकपणे सुसंवाद
साधला पाहिजे.
या पुस्तिकेच्या निमित्ताने असत्याचा नाश होऊन बंधुत्वाचा,
समतेचा जागर होवो.. हीच सदिच्छा !
जय हिंद !