
CHNDRAPUR केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आक्रमक झालेल्या शरद पवार गटाने चंद्रपुर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात काळ्या फिती लावून निवडणूक आयोगाचा निषेध नोंदविला.
यावेळी केंद्र सरकार व निवडणूक आयोगाबद्दल घोषणाबाजी करण्यात आली. सत्तारूढ भाजपच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग व इतर सर्वच शासकीय यंत्रणांकडून विरोधी पक्षांना लक्ष्य केले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाबाबतही निवडणूक आयोगाकडून अशाप्रकारचा निर्णय दिला जाईल, याची पूर्वकल्पना पक्षाला होती. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांची बी टीम असून सतत चुकीचे निर्णय आयोगाकडून दिले जात आहे, असा आरोप शरद पवार गटाने केला. या हुकूमशाहीचा, दडपशाहीचा निषेध व्यक्त करत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला.