नवी दिल्ली: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर आता शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) हे नाव मिळालं आहे. शरद पवार गटाला (Sharad Pawar) केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नाव दिलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नाव देण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला (Election Commission Of India) काही पर्याय द्यायचे होते. त्यामध्ये शरद पवार गटाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार , नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार ही तीन नावं दिली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ म्हणजे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव त्यांना दिलं आहे.
शरद पवार यांच्या हातातून जो पक्ष गेला, त्यातील राष्ट्रवादी हे नाव, आणि नवीन नावात शरद पवारांचं स्वतःचं नाव हे मिश्रण या नवीन नावात दिसून येतंय. त्यामुळे या नावाचा पर्याय देताना हा मुद्दा लक्षात घेतला गेला असल्याची माहिती मिळत आहे.