कोरेगाव भीमा लढाईचा पूर्वेतिहास
१८व्या शतकाच्या उत्तरार्धात पेशवे – जहागीरदारांच्या संघर्षाचे प्रश्न पुढे येण्यास सुरुवात झाली. यामध्ये पटवर्धन, पानसे, रास्ते, गोखले, निपाणीकर देसाई, कित्तूरकर देसाई आदी जहागीरदारांचा समावेश होता. या संघर्षातूनच पुढे पंढरपूरचा तह घडून आला.
१८११ साली पुण्यात इंग्रजांचा रेसिडेंट म्हणून माऊंटस्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन रुजू झाला. दीर्घ प्रलंबित राहिलेला पेशवे जहागीरदारांचा प्रश्न सैन्याने सोडवल्याशिवाय इंग्रजांना यश मिळणार नाही, अशी एल्फिन्स्टनची धारणा होती. पेशव्यांनी त्रिंबकजी डेंगळे याला सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी डेंगळ्यांच्या साहाय्याने आपले स्थान बळकट करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर इंग्रजांनी तटस्थ राहणे योग्य नाही, हे एल्फिन्स्टनने ओळखले व कलकत्त्यामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पेशवे – जहागीरदार संबंधांत हस्तक्षेप केला.
एल्फिन्स्टनने आपल्या प्रतिनिधीच्या मार्फत सर्व जहागीरदारांना पंढरपूरला एकत्र येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार ११ जुलै १८१२ रोजी पंढरपूरचा तह करण्यात आला. तहातील अटींवरून, मराठा सरदार आणि पेशवे यांच्यात फूट पडून मराठ्यांची ताकद कमकुवत होईल याकडे अग्रक्रमाने लक्ष देण्यात आले. ज्यामध्ये पेशवे-जहागीरदार वाद उत्पन्न झाल्यास दोघांनी इंग्रजांचा निवाडा मान्य करावा, इंग्रजांना कोणत्याही जहागीरदाराशी स्वतंत्रपणे करार करण्याचा अधिकार असावा अशा प्रकारच्या अटी घालण्यात आल्या.
याप्रकारे पंढरपूरचा तह करून मराठा साम्राज्यात अनेक छोटी संस्थाने निर्माण करून साम्राज्याची ताकद खिळखिळी करण्याचा इंग्रजांचा प्रयत्न एकाअर्थी यशस्वी झाला. याविरुद्ध पेशव्यांनी साम्राज्यावरील पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवले. यातूनच मराठा सैन्याच्या अनेक छोट्या मोठ्या लढाया इंग्रज सरकारच्या सैन्याशी झाल्या. ज्यात तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धातील खडकीची लढाई, येरवड्याची लढाई, कोरेगाव भीमाची लढाई, अष्टीची लढाई अशा लढायांची मालिका आहे.
कोरेगाव भीमा येथे झालेली लढाई याच मालिकेतील एक अनिर्णायक लढाई आहे. या सर्व लढायांचा थेट संदर्भ तत्कालीन सत्ताकारणाशी आहे. इंग्रजांना येथील भूभागावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून सत्ता हस्तगत करायची होती तर पेशव्यांना शक्य ते राजकारण करून स्वकियांच्या मदतीने इंग्रजांना विरोध करत मराठा साम्राज्य टिकवून ठेवायचे होते. या सर्व लढायांमध्ये जातीअंताच्या लढाईचा काहीही संबंध नाही.
१८१५ मध्ये घडलेल्या एका घटनेचा दुवा साधून इंग्रजांनी मराठ्यांच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करून ‘फोडा आणि राज्य करा’ नीतीचा अवलंब चालू ठेवला. पेशवे आणि बडोद्याचे गायकवाड ह्यांच्यात महसूल गोळा करण्यावरून आर्थिक वाद प्रकोपाला गेला होता. हे आर्थिक वाद मिटवण्यासाठी गायकवाडांनी गंगाधर शास्त्री पटवर्धन ह्यांस इंग्रजांच्या हमीवर, पेशव्यांकडे पाठविले. परंतु फिस्कटलेल्या चर्चेनंतर १४ जुलै १८१५ला गंगाधर शास्त्रींचा पंढरपूर येथे खून झाला. इंग्रजांच्या हमीपत्रावर आलेल्या व्यक्तीचा खून केल्याचा आरोप ठेवून त्रिंबक डेंगळेला इंग्रजांनी अटक केली आणि त्यांना ठाण्याच्या कारागृहात ठेवण्यात आले.
पेशव्यांनी मराठा साम्राज्यातील सर्व सरदार एकत्र आणण्याचे प्रयत्न विविध मार्गांनी चालूच ठेवले, ज्या संदर्भातील अनेक पत्रे, दूत इंग्रजांकडून पकडले गेले. मराठेशाहीचे एकीकरण टाळण्यासाठी म्हणून इंग्रजांच्या मध्यस्थीशिवाय इतर सरदारांशी संपर्क करू नये अशी सक्ती पेशव्यांवर लादण्यात आली.
सप्टेंबर १८१६ मध्ये त्रिंबक डेंगळेनी इंग्रजांच्या कैदेतून विस्मयकारकरित्या पलायन केले. मांग, भिल्ल, रामोशी व इतर अनेक जातीजमातीतील लोकांना एकत्र करून डेंगळेंनी मराठ्यांसाठी मोठे सैन्य उभारले. ज्याची नोंद ब्रिटिशांच्या कागदपत्रात आहे. पेशव्यांच्या सैन्याचे सरसेनापती बापू गोखले यांनी इंग्रजांविरुद्ध निर्णायक युद्धाचे नियोजन सुरू केले. परंतु अशा व्यापक आघाडीबाबत इंग्रज सजग होते.
डेंगळेंचे निमित्त साधून इंग्रजांनी दि. ८ मे १८१७ रोजी पुण्याला वेढा दिला. १३ जून १८१७ रोजी दुसरे बाजीराव पेशवे व इंग्रजांमध्ये ‘पुण्याचा तह’ झाला. मराठा साम्राज्याचा बराचसा भूभाग, गडकिल्ले इंग्रजांनी ताब्यात घेतले व १८ जाचक अटी मराठा साम्राज्यावर लादल्या. पेशव्यांचे सैन्यबळ पूर्णपणे कमी करून काही नाममात्र सैनिक ठेवण्याची मुभा त्यांना देण्यात आली. इंग्रजांविरुद्ध लढण्यास अथवा प्रतिकार करण्यास पुरेसे सैन्यबळ नसल्याने पेशव्यांना ह्या अटी मान्य कराव्या लागल्या. मात्र स्वरक्षणाचा बहाणा करून, त्यांनी पुण्यात घोडदळ आणि ७००० अरब पायदळ तयार केले. पुण्याच्या तहानंतर जून ते नोव्हेंबर १८१७, ह्या सहा महिन्यात पेशव्यांनी आपली पूर्ण शक्ती आणि प्रभाव वापरून जवळपास २८,००० संख्येचे मराठा सैन्य उभे केले. पेशव्यांच्या ह्या मराठा सैन्यात त्रिंबक डेंगळे यांनी एकत्र केलेले रामोशी, भिल्ल व इतर जातीजमातीतील सैनिकांचा समावेश होता.
पेशव्यांच्या ह्या सैन्यजमावाची बातमी इंग्रजांना लागली. “पेशव्यांनी पिंडारीविरुद्ध इंग्रजांना मदत केली नाही” ही सबब पुढे करून पुण्याचा रेसिडेंट एल्फिन्स्टन याने जनरल स्मिथला त्याच्या सैन्यासह पुण्यात बोलवून घेतले. युद्धाचे पडघम लक्षात घेऊन इंग्रजांनी ‘पूना ऑक्सिलरी हॉर्सेस’ ही नवी पलटण उभारली. इंग्रजांच्या सैन्यभरतीच्या जाहिरातीत ‘सदर सैनिक सुन्नी, शेख, मुघल, पठाण, सिंधी, बलुची, ब्राह्मण, राजपूत आणि मराठा भालदार या समुहाचे असावेत. खालच्या जातीच्या सैनिकांना यात प्रवेश नाही.’ असे स्पष्ट म्हटले होते. यातून इंग्रज कसा जातीभेद करत हे दिसून येते. ह्याच पूना ऑक्सिलरी होर्सेस दलातील २५० घोडदळ कोरेगाव भीमा लढाईत सहभागी होते.
१८१७च्या दसऱ्याला पेशव्यांनी एकत्रित सैन्याचे भव्य शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर तिसरे इंग्रज-मराठा युद्ध अटळ होते. ५ नोव्हेंबर १८१७ रोजी खडकी येथे पेशवे आणि इंग्रजांमध्ये अनिर्णायक लढाई झाली. वाढता युद्धज्वर लक्षात घेऊन एलफिन्स्टनने पुण्यात अजून मोठ्या संख्येने सैन्य गोळा करण्याचे आदेश धाडले.
खडकी लढाईमध्ये इंग्रजांचे जवळपास ८० हजाराचे आर्थिक नुकसान झाले. यात इंग्रज व मराठ्यांचे अनुक्रमे एकूण ८६ आणि ५०० सैनिक जखमी व मृत्युमुखी पडले. खडकीच्या लढाईनंतर पुढे काही दिवसातच म्हणजे दि. १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी दुसरी लढाई येरवडा येथे झाली. ही लढाई देखील खडकी लढाई सारखीच अनिर्णायक होती. येरवड्याच्या लढाईमध्ये इंग्रज व मराठ्यांचे अनुक्रमे एकूण १०३ आणि ५०० सैनिक जखमी व मृत्युमुखी पडले. खुल्या मैदानात इंग्रजांच्या सैन्याशी लढण्याची कमकुवत बाजू लक्षात घेऊन पेशव्यांनी २८,००० संख्येचे सैन्य साताऱ्याजवळ माहुलीकडे हलविण्यास सुरुवात केली. पुढे गोदावरीपाशी शिंदे, होळकर आणि पेशवे यांच्या सैन्याने एकत्र मिळून इंग्रजांच्या सैन्याचा सामना करावा असा प्राथमिक मनसुबा होता. तत्पूर्वी बाजीराव पेशवे यांनी आपले कुटुंब सुरक्षित ठिकाणी म्हणून रायगडावर हलविले आणि छत्रपती प्रतापसिंह यांच्या रक्षणासाठी त्यांनी मराठा सैन्यासह असावे या हेतूने त्यांना आणण्यासाठी म्हणून सरदार नारोपंत आपटे यांना पाठविले. तर दुसरीकडे एलफिन्स्टनने जनरल स्मिथला फौजेनिशी पेशव्यांच्या मागावर पाठविले.
येरवड्याच्या लढाई नंतर दि. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी दुसरे बाजीराव पेशवे यांनी सैन्यासह साताऱ्याच्या दिशेने कूच केले. छत्रपती व दुसरे बाजीराव यांची भेट होण्याआधीच कंपनी सरकारचा अधिकारी जनरल स्मिथ सैन्यासह त्यांच्या मागावर असण्याची शक्यता लक्षात घेऊन छत्रपती प्रतापसिंह यांच्या भेटीची प्रतीक्षा न करता बाजीराव पेशवे पुरंदरला निघून गेले. पुढे जवळपास महिनाभर बाजीराव पेशवे इंग्रजांना हुलकावण्या देत गनिमीकावा करत होते. १५ डिसेंबर १८१७ नंतर छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची बाजीराव पेशवे, इतर मराठा सरदार व सैन्य यांच्याशी ब्राह्मणवाडी येथे भेट झाली. मराठ्यांचा हा सर्व लवजमा पुढे चाकणला पोहोचताच जाणीवपूर्वक ‘मराठा सैन्य छत्रपतींच्या सोबत कोकणच्या दिशेने जाणार आहे’ अशी अफवा पसरविण्यात आली.
कोरेगाव भीमा लढाई
यादरम्यान बाजीराव पेशवे (यापुढे पुस्तिकेत ‘दुसरे बाजीराव पेशवे’ यांचा उल्लेख ‘बाजीराव पेशवे’ असा केला आहे. वाचकांनी याची नोंद घ्यावी.) यांनी पुणे सोडल्यावर इंग्रजांनी शनिवार वाडा ताब्यात घेऊन त्यावर आपला युनियन जॅक फडकवला. डिसेंबर अखेरीस पुण्याचा प्रमुख अधिकारी म्हणून कर्नल बर्र ची नियुक्ती करण्यात आली.
“मराठा सैन्य कोकणच्या दिशेने वाटचाल करत आहे” अशी अफवा कर्नल बर्रपर्यंत पोहोचली. कर्नल बर्रने तातडीने दुसऱ्या बटालियनच्या ६व्या रेजिमेंटच्या सैनिकांना तयार राहायचे आदेश दिले. त्याचप्रमाणे लेफ्ट कर्नल प्रॉथरला अधिक कुमक पुण्यात पाठवून देण्याचे आदेश पाठविले. प्रत्यक्षात मात्र बाजीराव पेशवे मराठा सैन्यासह कोकणच्या दिशेने न जाता पुण्याच्या दिशेने वाटचाल करत होते. बाजीराव पेशवे आणि मराठा सैन्य, इंग्रजांना गाफील ठेवत फिरून पुण्याच्या अगदी जवळ पोहोचले. पेशव्यांच्या मागावर असलेल्या जनरल स्मिथचा पाठलाग अयशस्वी ठरला. अवघ्या काही मैलांवर येऊन थांबलेल्या मराठा सैन्याच्या बातमीने, कर्नल बर्र धास्तावला होता. छत्रपती, पेशवे आणि मराठा सैन्य पुण्यापासून अवघ्या ४० मैल दूर असलेल्या ‘फुलशहर’ मध्ये पोहोचले होते. कर्नल बर्र याने शिरूर येथे असलेल्या कॅप्टन स्टाँटन या इंग्रज अधिकाऱ्याला मदतीसाठी तातडीचे पत्र पाठवले.
३१ डिसेंबर १८१७ रोजी छत्रपती प्रतापसिंह, बाजीराव पेशवे व त्यांचे जवळपास २८,००० सैन्य (२०,००० घोडेस्वार आणि ८,००० पायदळ) फुलशहर (सध्याचे फुलगाव) येथेच मुक्कामी होते. त्याच दिवशी शिरूर येथे कॅप्टन स्टाँटनला ‘मदतीसाठी सैन्यासह पुण्याला निघावे’ असे कर्नल बर्रचे पत्र मिळताच, तो शिरूर येथील छावणी मधून रात्री ८ वाजता सैन्यासह पुण्याच्या दिशेने निघाला.
कॅप्टन स्टाँटन सोबतच्या सैन्यामध्ये ‘बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री’चे ५०० पायदळ सैनिक (मराठा, महार, गुजर, मुस्लिम, मीना, अहिर, शीख इत्यादी सैनिक या पायदळात होते), ‘दि पूना ऑक्सिलरी हॉर्स’चे २५० घोडेस्वार सैनिक (सुन्नी, मुस्लिम, पठाण, बलोचि, ब्राह्मण, राजपूत आणि मराठा या समुहांचे घोडेस्वार) आणि मद्रास आर्टिलरी च्या दोन ६ पाउंडर तोफा व त्यावरील २५ युरोपियन सैनिक आणि काही निवडक प्रायव्हेट सैनिक अशा जवळपास ७७५ सैनिकांचा समावेश होता.
(या युद्धात सहभागी असलेल्या असिस्टंट सर्जन वायली याने लिहून ठेवल्याप्रमाणे या पलटणीत एकूण संख्या ८६५ होती. तर मुंबई गॅझेट या वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार ही संख्या ८३४ होती. लढाईनंतर इंग्रजांकडून बांधल्या गेलेल्या लष्करी स्तंभावर ही संख्या ७७५ इतकी नोंदविली आहे.) रात्रभर प्रवास करून १ जानेवारी १८१८ रोजी ही पलटण सकाळी सुमारे १० वाजता कोरेगाव पासून २ मैलावर तळेगाव ढमढेरे जवळ येऊन पोहोचली तेव्हा अनपेक्षितरित्या भीमा नदीपलीकडून फुलगावच्या बाजूने मराठ्यांचे अफाट सैन्य चालत पुढे येत असल्याचे त्यांना कळून आले.
भीमा नदीच्या काठावर वसलेले कोरेगाव म्हणून त्याचा कोरेगाव भीमा असा देखील उल्लेख होतो. (या अनुषंगाने माध्यमांमधून सध्या या गावाचा उल्लेख ‘भीमा कोरेगाव’ असा चुकीच्या पद्धतीने केला जातो). पश्चिमेला नदीच्या बाजूने एक मजबूत तटरक्षक भिंत होती, ज्याचे अवशेष आजही तेथे आढळून येतात. या तटरक्षक भिंतीचा फायदा कॅप्टन स्टाँटनने पुढे घेतला. मराठ्यांच्या मोठ्या सैन्याशी खुल्या मैदानात निभाव लागू शकत नाही याचा अंदाज घेत कॅप्टन स्टाँटनने आत्मरक्षणासाठी कोरेगाववर ताबा घेण्याचा आदेश सैन्याला दिला.
काही घोडेस्वार सैनिकांना मागेच थांबायचे आदेश देऊन सकाळी सुमारे ११ वाजता कॅप्टन स्टाँटन उर्वरित सैन्यासह कोरेगाव भीमात दाखल झाला. मराठ्यांचे सैन्य इंग्रजांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. मराठा सैन्यातील सर्वात पुढे असलेली अरब, गोसावी व इतर काही निवडक सैनिकांची अंदाजे ३००० संख्येची एक तुकडी इंग्रज सैन्याच्या हालचाली बघून कोरेगावच्या दिशेने वाटचाल करू लागली. शत्रू सैन्याची ही चाल लक्षात येताच कॅप्टन स्टाँटनने आपल्या सैनिकांना कोरेगावात मोक्याची ठिकाणे ताब्यात घेण्याचे आदेश दिले. मराठा सैनिकांनी कोरेगावात घुसखोरी करण्यापूर्वीच त्यांना नदीपलीकडे रोखण्याचा प्रयत्न करावा हा त्याचा मनसुबा होता. मराठा सैन्याची अंदाजे ३००० ची तुकडी भीमा नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू लागताच कॅप्टन स्टाँटनने मद्रास आर्टिलरीच्या २५ सैनिकांना दोन तोफा घेऊन हल्ल्याच्या तयारीत राहाण्याचे आदेश दिले. कॅप्टन स्टाँटनने यापैकी एक तोफ गावाच्या पश्चिमेला ठेवली जेणेकरून भीमा नदीच्या किनाऱ्यावर लक्ष ठेवून नदी पात्रातून येणाऱ्या मराठा सैन्याला रोखता येईल तर दुसरी तोफ गावाच्या मध्यवर्ती भागात ठेवून शिरूरकडून येणाऱ्या रस्त्यावर टेहळणी करता येईल. २५० घोडेस्वारांना कोरेगावच्या उत्तर आणि ईशान्य दिशेला टेहळणी करण्याचा आदेश होता.
जनरल स्मिथ व इंग्रजी सैन्य मराठा सैन्याचा पाठलाग करत आहेत याची कल्पना बाजीराव पेशव्यांना होती त्यामुळे या अचानक उद्भवलेल्या चकमकीमध्ये फार वेळ दवडणे जोखमीचे ठरले असते. परंतु छत्रपती प्रतापसिंह बरोबर असल्याने स्टाँटनच्या सैन्याला सामोरे जाणे क्रमप्राप्त होते. कोरेगाव भीमा येथे घडलेल्या लढाईची पाहणी छत्रपती प्रतापसिंह व बाजीराव पेशवे यांनी नदीपलीकडच्या टेकडीवरील छावणीतून केली.
मराठा सैन्याचे सेनापती बापू गोखले, सरदार रास्ते आणि निपाणीकर देसाई हे तिन्ही सरदार सैन्यासह कोरेगाववर चालून जाण्यास सज्ज झाले. मराठा सैन्याच्या तुकडीतील घोडेस्वारांना कोरेगावला वेढा द्यायचे हुकूम देण्यात आले व त्यांच्यासोबत एक तोफ पाठविण्यात आली. कॅप्टन स्टाँटनच्या आदेशानुसार कोरेगावच्या मधोमध ठेवण्यात आलेली तोफ पाहून मराठ्यांच्या सैन्यातील पुढे सरसावलेल्या अरब, गोसावी व इतर निवडक सैनिकांच्या प्रत्येकी १००० च्या तीन तुकड्या बनवण्यात आल्या.
नदीपात्र ओलांडून बऱ्याच मराठा सैनिकांनी कोरेगावला वेढा दिला. तर, त्या तुकडीतील उर्वरित सैन्य तोफेजवळच थांबले. कोरेगावची पूर्व बाजू पूर्ण खुली होती, ज्याबाजुने मंदिर होते. कॅप्टन स्टाँटनने त्याचे काही सैनिक शिरूरच्या मार्गावर उभे केले तर काही सैनिक नदीच्या दिशेने उभे केले होते. मराठा सैनिकांनी एकाच वेळेस तीन वेगवेगळ्या दिशेने इंग्रज सैन्यावर हल्ला चढवला. त्यापैकी १००० संख्येच्या एका तुकडीने खुल्या असलेल्या पूर्वेच्या बाजुकडून हल्ला करून गावामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. या तुकडीच्या संरक्षणासाठी नदीपलीकडून एक तोफ माऱ्यासाठी सज्ज होती. या तुकडीचा हल्ला होताच कॅप्टन स्टाँटनच्या सैन्याने तोफगोळ्यांचा मारा करून प्रतिकार केला. मराठा सैन्याच्या तोफेची जागा अडचणीची असल्यामुळे त्याचा मारा स्टाँटनच्या सैन्यापर्यंत पोहोचत नव्हता. ही बाब लक्षात येताच मराठा सैनिकांनी तोफमारा बंद करून तेथे असलेल्या उर्वरित सैन्याने देखील कोरेगाववर हल्ला चढविला. स्टाँटनकडे दोन तोफा होत्या परंतु गावात योग्य जागा न मिळाल्याने त्यांचा मारा कुचकामी ठरत होता. मराठ्यांचे सैन्य संधी साधून गावात शिरत होते तर त्यांच्यावर प्रतिहल्ला करून स्टाँटनचे सैन्य त्यांना हुसकावून लावत होते. तोफांच्या माऱ्यामुळे गावात बरीच जाळपोळ आणि नुकसान झाले होते. गावातील नागरी वस्तीला हानी पोहोचू नये याचा विचार करून मराठा सैनिक मागे फिरत. परंतु स्टाँटनच्या सैन्यावर हल्ला करण्याची एकही नामी संधी मराठा सैन्याने गमावली नाही.
कॅप्टन स्टाँटनच्या सैनिकांनी ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून जवळपास १८ तास एकसलग अन्न पाण्याशिवाय काढले होते. त्यामुळे शत्रूसैन्यावर त्यांचा प्रतिहल्ला दुबळा ठरत होता. नदीच्या बाजूने मराठ्यांच्या सैन्याने स्टाँटनच्या सैनिकांचा पाणी पुरवठा देखील पूर्णतः तोडल्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्याची वानवा होती. लढाई सुरु झाल्यानंतर काही तासांतच स्टाँटनच्या सैन्याचे अन्नपाण्याविना हालहाल होऊ लागले. बरेच जखमी सैनिक जिवाच्या आकांताने पाण्यासाठी मागणी करत होते. ज्यामध्ये मद्रास आर्टिलरीचा विंगेट नावाचा अधिकारी देखील होता.
मराठा सैनिक मंदिरांवर हल्ला करणार नाहीत या खात्रीने इंग्रजांचे जखमी सैनिक व अधिकारी मंदिरामध्ये आसरा घेण्यासाठी थांबले होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मराठा सैनिकांनी मंदिरावर हल्ला केला नाही परंतु जखमी इंग्रजी सैनिक व अधिकारी बाहेर येतील याची प्रतीक्षा करत काही मराठा सैनिक मंदिराबाहेर वाट रोखून होते. परिस्थिती आजमावण्यासाठी जखमी विंगेट मंदिराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. तिथेच लपलेल्या काही अरबी सैनिकांनी विंगेटला पकडून ठार केले. मंदिरातील इतर जखमी सैनिक मराठा सैनिकांच्या दराऱ्यामुळे विंगेटच्या मदतीला गेले नाहीत. विंगेटच्या क्रूर हत्येची धास्ती इंग्रज सैनिकांनी घेतली. कॅप्टन स्वान्स्टन लढाईत दोन वेळा जखमी झाला होता. मंदिराबाहेर असलेल्या अरबी सैनिकांना हुसकावून लावण्याचा आदेश त्याच्याबरोबर असलेल्या सैनिकांना दिला. लेफ्टनंट जोन्स, असिस्टंट सर्जन वायली व काही हत्यारबंद सैनिक त्यांच्या मदतीसाठी आले आणि अरबी सैनिकांना मंदिरापासून माघारी पळवले. स्टाँटनच्या सैन्याने मंदिरावर ताबा मिळविला. मंदिरातील इतर जखमी सैनिकांना व अधिकाऱ्यांना गावातील कमी जोखमीच्या ठिकाणी हलविण्यात आले. मंदिर व आजूबाजूचा परिसर ताब्यात येताच इंग्रजी सैनिकांना हुरूप चढला. या कामात इंग्रजांच्या काही सैनिकांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तरी देखील त्यांच्या सैन्याचा मराठा सैन्याच्या तुकड्यांसमोर दीर्घ काळ टिकाव लागणार नाही या परीस्थितीची इंग्रज सैनिकांना कल्पना होती. त्याप्रमाणे अनेक सैनिक शरण जाण्याचा सल्ला कॅप्टन स्टाँटनला देत होते. तर याविरोधात कॅप्टन स्टाँटन सैन्याचे मनोबल राखण्याचा हरप्रकारे प्रयत्न करीत होता. शरण जाताच मराठा सैन्य कुणालाही जिवंत सोडणार नाही याची पुरेपूर कल्पना त्याला होती.
मराठ्यांच्या वतीने लढणाऱ्या अरब सैनिकांच्या तुकडीने इंग्रजांवर पुन्हा मोठा
हल्ला केला व मद्रास आर्टिलरीच्या चिशोम नामक अधिकाऱ्याला डोक्यात गोळी
घालून ठार करण्यात आले. या अरबी सैनिकांनी बक्षिसाच्या आशेने चिशोमचे
शिर धडापासून वेगळे करून पेशव्यांकडे पाठवून दिले. यादरम्यान काही इतर अरब
सैनिकांनी बरेच युरोपियन अधिकारी जायबंदी केले. चिशोम मेल्यावर मराठ्यांनी
इंग्रजांच्या एका तोफेवर विजय मिळवला. त्या तोफेच्या मदतीनेच अरबी सैनिकांनी
इंग्रजांवर हल्ला चढविला. तोफेजवळच कॅप्टन स्टाँटनच्या सैन्यातील लेफ्टनंट
पॅटिन्सन नावाचा अधिकारी गोळी लागून जायबंदी होऊन पडलेला होता. इंग्रज
सैन्याची तोफ अरबी सैनिकांच्या ताब्यात गेलेली बघून पॅटिन्सन जखमी अवस्थेत
काही सैनिकांच्या मदतीने अरबी सैनिकांशी लढू लागला. पॅटिन्सन व सैनिकांनी
अरब सैनिकांवर चढवलेला प्रतिहल्ला पाहून इंग्रजी सैन्याला चेव चढला. त्यातच
त्यांनी गमावलेली तोफ पुन्हा जिंकून घेतली. पॅटिन्सनचा प्रतिकार बघून स्टाँटनने
त्याच्या इतर सर्व सैनिकांना धैर्याने लढण्यासाठी प्रोत्साहित केले.
मराठा सैन्याचे अरबी, गोसावी आणि इतर निवडक सैनिक, गावातल्या काही पडलेल्या घरांमध्ये आणि तिथे असलेल्या एका गढीमध्ये दबा धरून बसले होते. चिशोमच्या शिर कापलेल्या धडाकडे नजर रोखून बोलताना स्टाँटन त्याच्या सैनिकांना उद्देशून म्हणाला, “जर असा हालहाल होऊन तुम्हाला मृत्यू नको असेल तर मराठ्यांविरुद्ध लढा देण्याची हीच वेळ आहे, त्यामुळे स्वतःचे रक्षण करा.” कॅप्टन स्टाँटनचे हे वाक्य पुढे ऐतिहासिक ठरले कारण याच प्रोत्साहनाच्या जोरावर गलितगात्र झालेल्या सैन्यामध्ये नवीन धडाडी निर्माण झाली. मराठा सैन्य तुकडीवर इंग्रज सैनिकांनी जोरदार प्रतिहल्ले सुरू केले. एकाएकी नव्या दमाने सुरू झालेल्या इंग्रजांच्या हल्ल्यामुळे बरेच मराठा सैनिक मागे सरले होते.
याप्रकारे रात्री ८वाजेपर्यंत लढाई चालली. चढ्या प्रतिकारासमोर काही वेळ किरकोळ हल्ले करण्याचा प्रयत्न मराठा सैनिक करत होते परंतु इंग्रज सैनिक या दारुण अवस्थेत आपल्या मागावर येणार नाहीत हे हेरून मराठा सैनिकांचे हल्ले थांबल्यानंतर रात्री ९ वाजता कोरेगाव भीमाची लढाई थांबली. उशिरापर्यंत चाललेल्या लढाईमध्ये कॅप्टन स्टाँटनच्या सर्वच सैनिकांचा दम निघून गेला होता. इंग्रजांशी अजून सलग लढून वेळ काढण्यात अर्थ नव्हता हे पाहून कोरेगावला वेढा घालून असलेल्या इतर मराठा सैनिकांनी मागे फिरायचा निर्णय घेतला.
अचानक उद्भवलेल्या या लढाईत आक्रमक हल्ले करताना मराठ्यांचा दुहेरी हेतू होता. एक, छत्रपती प्रतापसिंह आणि बाजीराव पेशवे यांना साताऱ्याच्या दिशेने प्रयाण करण्यासाठी म्हणून सुरक्षित मोकळी वाट करून देणे आणि स्टाँटनच्या सैन्याला पुण्याच्या दिशेने वाटचाल करण्यापासून रोखणे. मराठ्यांचे हे दोन्ही हेतू बव्हंशी साध्य झाले.
कॅप्टन स्टाँटनच्या सैन्याने ३१ डिसेंबरची पूर्ण रात्र अन्नपाण्याशिवाय प्रवास केला होता आणि १ जानेवारी रोजी संपूर्ण दिवस ते कोरेगावमधल्या लढाईत अडकून पडले होते. स्टाँटनचे सैनिक उपाशी तर होतेच परंतु त्यांचा पाणीपुरवठा देखील मराठा सैनिकांनी तोडून टाकला होता. अशा कठीण परिस्थितीत इंग्रजी सैन्याने कोरेगावची लढाई केली आणि स्वतःला मरणापासून वाचवले. इंग्रजी अधिकाऱ्यांपैकी फक्त कॅप्टन स्टाँटन, लेफ्टनंट जोन्स आणि असिस्टंट सर्जन वायली या अधिकाऱ्यांशिवाय उरलेले बाकी सर्व युरोपियन अधिकारी लढण्याच्या परिस्थिती मध्ये नव्हते. रात्री लढाई संपेपर्यंत कॅप्टन स्टाँटनच्या ७७५ सैनिकांपैकी १७५ मृत व जखमी झाले तर मराठ्यांचे अंदाजे ५०० ते ६०० सैनिक मृत व जखमी झाले. (या संख्येमध्ये ‘पूना ऑक्सिलरी हॉर्स’ या पलटणीतील जखमी व मृतांची संख्या अंतर्भूत नाही.)
या लढाईला इंग्रजांनी ‘डिफेन्स ऑफ कोरेगाव’ असे संबोधले. नंतर उभारल्या गेलेल्या स्तंभावर देखील ‘डिफेन्स ऑफ कोरेगाव’ असा उल्लेख केलेला आहे.
कोरेगाव भीमा लढाईच्या रात्री ९ वाजेपर्यंतच्या घडामोडींवरून ही लढाई अनिर्णायक पद्धतीने थांबली असा निष्कर्ष निघतो. पुण्याकडे निर्णायक युद्धासाठी कूच करण्याऱ्या मराठ्यांना अचानक समोर उभ्या राहिलेल्या स्टाँटनच्या छोट्याशा सैन्यावर विजय मिळवून फारसे काही साध्य होणार नव्हते. तर प्रत्यक्षात स्टाँटनच्या मदतीसाठी कोणतीही पुढची इंग्रजी कुमक येण्यापूर्वीच छत्रपती प्रतापसिंह आणि
बाजीराव पेशवे यांना सुखरूप पुढच्या मुक्कामी पोहोचवणे हा मराठा सैन्याचा मुख्य हेतू होता. त्यामुळे कोरेगावचा वेढा फारसा ताणण्यात त्यांना काही स्वारस्य नव्हते. १ जानेवारीच्या रात्री अंदाजे ९ वाजता लढाई संपल्यानंतर मराठ्यांच्या फौजा हळूहळू मागे फिरून छत्रपती प्रतापसिंह व बाजीराव पेशवे यांच्या दिशेने निघू लागल्या. नदीच्या पलीकडे असणारे बाजीराव पेशवे स्वतः छत्रपतींच्यासह तिथून पुढे राजेवाडीच्या दिशेने निघाले व त्या रात्री त्यांनी तिथेच मुक्काम केला.
या अनुषंगाने एका संदर्भाचा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासन प्रकाशित (२००३) ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्ज अँड स्पिचेस’ या ग्रंथ संग्रहातील १७ व्या खंडात भाग ३ मध्ये पहिल्या प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभाला भेट दिल्याचा संदर्भ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे केलेल्या भाषणाचा उल्लेख त्यात केला आहे. या प्रकरणात पृष्ठ क्रमांक ५वर पुढील वाक्य आहे. “रात्री ९ वाजता, निर्णायक यश टप्प्यात असताना देखील पेशव्यांच्या सैन्याने हल्ला थांबवत माघार का घेतली हे सांगणे अवघड आहे.”
कोरेगावच्या लढाईत इंग्रजी सैन्याचे बरेच नुकसान झाले त्याचप्रमाणे मराठ्यांचे देखील बरेच सैनिक मारले गेले. इंग्रजांनी केलेल्या या बचावात्मक लढाईमध्ये मद्रास आर्टिलरीच्या २५ युरोपिअन सैनिकांपैकी २० सैनिक/अधिकारी मृत व जखमी झाले. कॅप्टन स्टाँटनच्या आदेशानुसार हलाखीच्या परिस्थितीत शरण न जाता त्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इंग्रजी सैन्य लढत राहिले. बाजीराव पेशवे यांच्या मागावर असलेला जनरल स्मिथ आणि पुण्यातील अधिकारी कर्नल बर्र यापैकी किमान एक अधिकारी लढाई चालू असेपर्यंत पुरेशी कुमक घेऊन कोरेगाव भीमा येथे पोहचतील अशी आशा कॅप्टन स्टाँटनला होती. १ जानेवारी १८१८ रोजी जनरल स्मिथ पेशव्यांचा पाठलाग करता करता ओझरच्या घाटात पोहोचल्यावर त्रिंबक डेंगळे यांनी तयार केलेल्या रामोशी सैनिकांच्या एका तुकडीने त्याला इतके सतावून सोडले कि तो २ जानेवारीला महत्प्रयासाने चाकणला येऊन पोचला. २ जानेवारीला मराठ्यांनी नव्या दमाने कोरेगावावर हल्ला केला तर उर्वरित इंग्रज सैनिक जनरल स्मिथ आणि कर्नल बर्र यांच्या मदतीशिवाय यशस्वी लढ्याच्या परिस्थितीत नसतील याचा कॅप्टन स्टाँटनला अंदाज होता. त्यामुळे वेळ न दवडता १ जानेवारीच्या रात्री उसंत मिळताच तातडीच्या मदतीसाठी त्याने एक पत्र लिहून काही घोडेस्वार सैनिकांद्वारे वरिष्ठांकडे रवाना केले. त्या पत्रातील संदर्भ पुढीलप्रमाणे: “आम्हाला पेशव्याच्या सैन्याने संपूर्ण घेरलेलं आहे आणि आम्ही आज रात्रीपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. आमचे बरेच सैनिक आणि अधिकारी मारले गेले आहेत. आम्हाला लवकर मदत पाठवा नाहीतर हे उद्यापर्यंत आम्हाला मारून टाकतील.”
स्टाँटनने पाठविलेल्या या पत्रातून इंग्रज सैन्याची हलाखीची स्थिती समजते. याशिवाय दोन्ही सैन्याचे तुलनात्मक संख्याबळ लक्षात घेता मराठा सैन्याला स्टाँटनच्या सैन्याचा पूर्ण पराभव शक्य होता पण दुरान्वये त्यांना लढाईत अधिक वेळ घालवणे फायद्याचे नव्हते. मराठ्यांच्या दृष्टीने कोरेगाव भीमा येथील लढाईतील जय पराजय यापेक्षा छत्रपतींची सुरक्षा अग्रक्रमाची होती. (संदर्भ-मराठा रियासत) स्टाँटनने मदतीसाठी पाठविलेल्या पत्रानंतर त्याने रात्रभर मदतीची निष्फळ वाट पहिली. स्टाँटनचे सैन्य रात्रभर कोरेगावातच तळ ठोकून थांबले. पुढच्या दिवशी म्हणजे २ जानेवारी १८१८ रोजी सकाळी देखील सैन्य तहानलेले होते.
संधी मिळताच जवळ असलेल्या नदीचे पाणी पिण्यासाठी तुकडी तुकडीने सैनिक गेले. गावात जखमी पडलेल्या सैनिकांसाठी देखील पाणी नेण्याची सोय करण्यात आली. या सर्व हालचालींवर मराठा सैन्य नजर ठेवून होते. स्टाँटनला ३१ डिसेंबर रोजीच आपल्या सैन्यासह पुण्यात पोहोचण्याचा स्पष्ट आदेश होता परंतु कोरेगाव लढाईचा प्रसंग अचानक उद्भवल्यामुळे त्याला शिरूरकडून पुण्याकडे येताना मध्ये थांबावे लागले. यानंतरसुद्धा मूळ आदेशानुसार उर्वरित सैन्य घेऊन पुण्याच्या दिशेने मदतीसाठी जाता येईल का याची त्याने चाचपणी केली. परंतु मराठ्यांचे बरेच घोडेस्वार सैनिक इंग्रज सैन्यावर पाळत ठेवून होते तर इतर बरेच सैनिक कोरेगाव व पुण्याच्या मार्गावर मध्य भागावर होते. अशा परिस्थितीत दमलेल्या सैनिकांसह पुण्याकडे कूच करण्याचे धाडस करणे त्याला रास्त वाटले नाही. म्हणूनच उर्वरित सैनिकांसह पुण्याच्या दिशेने न जाता शिरूरच्या दिशेने परतावे असा निर्णय त्याने घेतला. बऱ्याच जखमी सैनिकांना बैलगाडीत ठेवून तर काही गंभीर जखमी झालेल्या सैनिकांना व अधिकाऱ्यांना गोधडीत गुंडाळून इतर सैनिकांच्या खांद्यावर टाकून शिरूरकडे निघाले. ३ जानेवारी १८१८ रोजी कॅप्टन स्टाँटन सैन्यासह सकाळी शिरूरला पोहोचला. पॅटिन्सन लढाईमध्ये जबर जखमी झाला होता. लढाई नंतर त्याची अवस्था खूप खालावली होती. त्याला जखमी अवस्थेत शिरूरपर्यंत आणले परंतु तिथे पोचताच काही वेळाने त्याने प्राण सोडले.
३ जानेवारीला कॅप्टन स्टाँटन सैन्याला घेऊन शिरूरला पोचल्यावर त्याच्या कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल फिट्झीमानला लिहिलेल्या पत्रामध्ये त्याने ३१ डिसेंबर १८१७ पासून ते शिरूरला पोहचेपर्यंतचा सविस्तर अहवाल लिहून पाठविला. अहवाल खालीलप्रमाणे:
“मी आपणास कळवू इच्छितो कि आपल्या आदेशानुसार, आम्ही ३१ डिसेंबरला शिरूरवरून रात्री ८.३० वाजता निघालो, यावेळेस सोबत दुसऱ्या तुकडीच्या पहिल्या रेजिमेंटचे ५०० पायदळ, २ (६ पाउंड) तोफा आणि स्वान्स्टनच्या नेतृत्वाखाली २५० घोडेस्वार एवढे सैन्य होते. १ जानेवारीला सकाळी १० वाजता कोरेगाव येथे पोहोचलो असता मिळालेल्या
माहितीनुसार तेथे पेशव्यांचे जवळपास २०,००० घोडेस्वार आणि ८,००० पायदळ व सोबत दोन तोफा असे अफाट सैन्य उपस्थित होते. भीमा नदीच्या पलीकडे असलेल्या या सैन्याचा आमच्यावर हल्ला करायचा मनसुबा होता. पुण्याच्या दिशेने येताना आम्ही कोरेगाव येथे पोहोचेपर्यंत मार्गक्रमण चालू ठेवले होते परंतु शत्रूसैन्य इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ल्याच्या तयारीत असताना तोफांसाठी योग्य ती जागा निवडून प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला. माझ्या पवित्र्याची शत्रूला कल्पना येताच, त्यांच्याकडून अरब फौजेच्या ३ तुकड्या ज्यात प्रत्येकी १००० सैनिक होते त्याचप्रमाणे एक तोफ आणि बरेच घोडेस्वार असे सैन्य आमच्यावर हल्ला करण्यासाठी निघाले.
लढाईचे पुढील वृत्त कळविण्यास खेद होतो की, शहराची त्यांना जास्त चांगली माहिती असल्यामुळे, शत्रुसैन्याने आधीच तेथे मोक्याच्या ठिकाणी कब्जा मिळविला होता. अशा मोक्याच्या ठिकाणाहून त्यांना हुसकावून लावण्यात आम्हाला दिवसभरात यश मिळाले नाही. हा निकराचा लढा आम्ही त्या दिवशी रात्री ९ वाजेपर्यंत चालू ठेवला. आणि यानंतर शत्रुसैन्याला पिछाडीवर ढकलण्यात आम्हाला यश मिळाले. २ जानेवारी रोजी सकाळी शत्रूने काबीज केलेल्या जागा आम्ही हस्तगत केल्या पण त्यांनी कोणताही प्रतिकार केला नाही. २ जानेवारीच्या संध्याकाळी आमचा पुण्याला जायचा मार्ग मोकळा झाला होता पण गेले ४८ तास माझ्या सैन्याला अन्न व पाणी देखील मिळाले नव्हते आणि पुढे कुठे त्याची सोय होईल याची खात्री नसल्याने मी पुण्याच्या दिशेने कूच न करता पुन्हा शिरूरला माघारी वळण्याचा निर्णय घेतला. सगळे जखमी शिपाई, दोन तोफा व एक सामान गाडी घेऊन आम्ही संध्याकाळी ७ वाजता शिरूरकडे परतीचा प्रवास सुरु केला यामध्ये नाईलाजाने एक रिकामी सामानगाडी निकामी करण्याचा आणि तंबू सामान तेथेच सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. लढाईच्या या वर्णनावरून मी घेतलेले निर्णय न्याय्य आहेत यावर आपला विश्वास बसेल अशी अशा करतो. आपले खूप जास्त नुकसान झाले हे सत्य आहे पण त्या विशिष्ट परिस्थितीचा विचार केल्यास त्यासमोर हे नुकसान नगण्यच म्हणावे लागेल.
नुकसान
खालीलप्रमाणेः
मृत्यू – लेफ्टनंट चिशोम (तोफखाना)
असिस्टन्ट सर्जन विंगेट (दुसरी तुकडी पहिली बटालियन )
जखमी – लेफ्टनंट पॅटीन्सन (जबरी जखमी )
कॉनलेन (जखमी )
स्वान्स्टन (जखमी )
मृत्यू – सैनिक ५० (दुसरी तुकडी पहिली बटालियन) तोफखाना गोलंदाज १२ (तोफखाना )
मृत्यू एकूण ६२ (यात ऑक्सिलरी घोडदळातील संख्या नाही)
जखमी १०५ सैनिक ( दुसरी तुकडी पहिली बटालियन) ८ तोफखाना गोलंदाज (तोफखाना)
एकूण जखमी ११३
एकूण जखमी व मृत्युमुखी संख्या १७५ सैनिक (यात ऑक्सिलरी घोडदळातील संख्या नाही.)
या माझ्या अहवालांमधून मी अवश्य नमूद करू इच्छितो कि, युरोपियन अधिकारी व सैनिक, तसेच लष्करी सेवेतील व लष्करी सेवेच्या बाहेरील भारतीय अधिकारी आणि सैनिक यांच्या गुणवत्ता आणि शौर्याला योग्य तो न्याय देणे माझ्याकडून शक्य नाही. या कठीण प्रसंगात या सर्वांचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली हा माझा सन्मान समजतो.
शिरूर ३ जानेवारी १८१८.
(सही) कॅप्टन एफ एफ स्टाँटन कॅप्टन स्टाँटनचा हा अहवाल दिनांक ९ जून १८१८ रोजी लंडन गॅझेट या इंग्लंडमधील वृत्तपत्रात छापून आला होता, तसेच जॉन वायलीच्या “स्केच
ऑफ द कॉलम ऍट कोरिगम, विथ ए प्लॅन ऑफ व्हिलेज, सम लेटर्स प्रायव्हेट अँड पब्लिक, द जनरल ऑर्डर्स अँड द डिस्पॅच रीलेटिंग टू अॅक्शन ऑन द १ जानेवारी १८१८” या पुस्तकात देखील आहे. बॉम्बे कुरिअर न्यूजपेपर, भारत सरकार पुराभिलेखागार, इतर समकालीन इंग्रजी पुस्तके अशा अनेक ठिकाणी या अहवालाचा संदर्भ मिळतो.
३ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज अधिकारी एल्फिन्स्टन याने कोरेगावच्या लढाईबाबत दोन पत्र लिहिली आहेत. यापैकी एक पत्र प्रत्यक्ष लढाईच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर लिहिले आहे. या दोन्ही पत्रातील मजकुरावरून कोरेगावच्या लढाईत इंग्रजांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. दोन्ही पत्रांमध्ये कोणत्याही जातींचा उल्लेख नाही किंवा ही जातीअंताची लढाई होती असेही म्हटलेले नाही.
इंग्रजांचा इतर सर्व समकालीन पत्र व्यवहार वाचला तर कोरेगावच्या लढाईचा उल्लेख ‘डिफेन्स वॉर’ म्हणजेच ‘बचावात्मक लढाई’ म्हणून केला आहे. यावरून समजते कि, १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमा येथे झालेली लढाई इंग्रजांच्या दृष्टीने बचावात्मक लढाई होती तर मराठा सैन्य आणि पेशव्यांच्या दृष्टीने तो मार्गक्रमण करताना आलेला अनावश्यक अडथळा होता.
कोरेगावच्या लढाईमध्ये इंग्रजांच्या बाजूने एकूण तीन लष्करी तुकड्या होत्या; त्या खालीलप्रमाणे-
१. ‘सेकंड बटालियन फर्स्ट रेजिमेंट ऑफ बॉम्बे नेटिव्ह इन्फन्ट्री’ जी आज भारतीय लष्करामध्ये ‘२ ग्रेनेडिअर’ या नावाने कार्यरत आहे.
२. ‘द पूना ऑक्सिलरी हॉर्स’ जी आज भारतीय लष्करामध्ये ‘द १७ पूना हॉर्स’ या नावाने कार्यरत आहे.
३. ‘मद्रास आर्टिलरी” यात बहुतांशी युरोपियन सैनिक होते व ती एक सहाय्यक तुकडी होती.
हा समकालीन पत्रव्यवहार किंवा पुस्तके यात ‘ही लढाई तत्कालीन भारतीय समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी झालेली लढाई होती’ अशा आशयाचा कुठलाही संदर्भ मिळत नाही. या लढाईच्या अनुषंगाने सध्या प्रचलित असलेल्या ‘५०० महार, महार समाजावर अन्याय, सिदनाक महार, पेशवाईचा अंत, २८,०००
यातील काही रोख चोरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पेशव्यांना केवळ तीस लाख रुपये इतकी रोख रक्कम मिळू शकली. यापश्चात बाजीराव पेशवे यांनी दक्षिणेस निपाणीकडे जाण्याची योजना आखली, परंतु इंग्रजी सैन्याने त्यांचा मार्ग अडवला. त्यामुळे मार्ग वळवून ते पंढरपूरच्या दिशेने गेले आणि वाटेत १९ फेब्रुवारी १८१८ रोजी आष्टी येथे तळ ठोकला. येथे इंग्रज-मराठा तिसऱ्या युद्धाची अंतिम लढाई लढली गेली. जनरल स्मिथने पेशव्यांच्या मागावर भीमा नदीवर आष्टीच्या दिशेने कूच केले. २० फेब्रुवारी १८१८ रोजी सकाळी त्या परिसरात एका टेकडी पलीकडच्या बाजूला, त्याने पेशवे छावणी निघाल्याचे दर्शवणारे नगारे ऐकले. इंग्रज सैन्याच्या उपस्थितीची बातमी समजताच मराठ्यांचे सेनापती बापू गोखलेंनी पेशव्यांना पुढे जाण्यास सांगितले.
लढाईची संपूर्ण जबाबदारी बापू गोखलेंनी घेतली. निपाणीकर सरदारांनी, गोखले आणि सैन्याला मदत करावी असा आदेश देऊन बाजीराव पेशव्यांनी उर्वरित सैन्यासह आष्टीपासून पुढे कूच केली. निपाणीकर सरदारांनी बापू गोखले यांना गरजेला मदत केली नाही. बापू गोखले यांच्याबरोबर जेमतेम पाचशे माणसे शिल्लक राहिली आणि त्यापैकी फक्त तीनशे सैनिक घेऊन त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला. या लढाईत बापू गोखले आणि सैन्याचा पराभव झाला. ‘मराठा साम्राज्याची तलवार’ म्हणून ओळखले जाणारे बापू गोखले लढाईत मरण पावले. गोविंद राव घोरपडे आणि आनंदराव बाबर हे दोन प्रमुख सरदारही आष्टी येथील युद्धात मारले गेले.
आष्टीहून कूच करताना पेशव्यांच्या बरोबर छत्रपती प्रतापसिंह निघू शकले नाहीत आणि लवकरच इंग्रजांच्या ताब्यात आले. जनरल स्मिथने लिहिलेल्या २१ फेब्रुवारीच्या पत्रात म्हटले की, “सातारचे छत्रपती, त्यांचा भाऊ आणि मातोश्री यांची पेशव्यांपासून सुटका करून छावणीत सुरक्षित आणण्यात आल्याचे कळविताना मला अत्यंत समाधान आहे”. प्रताप सिंह यांची छत्रपती म्हणून सातारा येथे पुनर्स्थापना करण्यात आली आणि १० एप्रिल १८१८ रोजी त्यांनी छत्रपतींच्या मांडलिकत्वाची घोषणा केली. यानंतर दुसरे बाजीराव पेशवे यांची पेशवा म्हणून नियुक्ती रद्दबातल ठरविण्यात आली.
मे १८१८ पर्यंत रायगडसह सर्व मराठा किल्ले इंग्रजांनी काबीज केले होते. अपेक्षित दीर्घ संघर्षासाठी मराठ्यांनी काळजीपूर्वक जमा केलेला संपूर्ण खजिना इंग्रजांच्या हातात पडला. इंग्रजांपासून पळून गेल्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस
बाजीराव पेशव्यांबरोबर सहा हजार माणसे राहिली होती. यानंतर ते ‘पेशवा’न राहता इंग्रजांनी घोषित केल्याप्रमाणे ‘बंडखोर’ म्हणून गणले गेले. अशा हलाखीच्या परिस्थितीत बाजीराव पेशव्यांनी त्यांचा इंग्रज मित्र जॉन माल्कमशी संवाद साधला. माल्कम आणि बाजीराव यांच्यात शरणागतीच्या वाटाघाटी सुरू झाल्या. २ जून १८१८ रोजी दोघे खैरी येथे भेटले जेथे माल्कमने बाजीराव पेशवे यांना वर्षाला आठ लाख पेन्शन देण्याचे आश्वासन दिले परंतु पेशवा म्हणून त्यांना पूर्वपदावर कामकाज करता येणार नाही अशी ताकीद दिली. बाजीराव पेशव्यांनी उत्तरेत आपल्या पसंतीच्या ठिकाणी जाऊन राहायची इच्छा व्यक्त केली ज्याला इंग्रजांनी परवानगी दिली. ३ जून १८१८ रोजी माल्कमने पेशव्यांच्या आत्मसमर्पण आणि तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धाच्या विजयी समाप्तीची बातमी संबंधितांना दिली. कुटुंब आणि निवडक सैन्यासह बाजीराव पेशवे कानपूरजवळील बिधूर शहरात हद्दपार झाले. तिथेच २८ जानेवारी १८५१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
जयस्तंभ
१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाई नंतर १८२२ साली मौजे पेरणे येथे इंग्रजांकडून जयस्तंभ उभारण्यात आला. येथे प्रथमतः हे नमूद करणे गरजेचे आहे की, ही लढाई अनिर्णायक रित्या थांबली. हे इंग्रजांची समकालीन कागदपत्रे आणि इतर संदर्भ यावरून स्पष्ट होते. म्हणजेच या लढाईत इंग्रज अथवा मराठा सैन्य यांच्यापैकी कुणाचाही विजय झाला असे म्हणता येत नाही. तथापि स्तंभावर इंग्रजांकडून स्थापन केल्या गेलेल्या मराठी पाटीवर त्याचा उल्लेख ‘जयस्तंभ’ असा केला आहे. सदर स्तंभ इंग्रजांच्या पुढाकाराने ‘मिलिटरी मॉन्युमेंट (लष्करी स्मारक)’ म्हणून उभारण्यात आला. विशिष्ट लढाईत शौर्य गाजविलेल्या सैनिकांप्रति आदर म्हणून असे स्तंभ जगभरातून विविध ठिकाणी उभारले जातात. सदर स्तंभ सध्या प्रचलित प्रचाराप्रमाणे महार बांधवांनी केलेल्या जातीअंताच्या लढाईचे स्मारक देखील नाही. माऊंट एल्फिन्सटन या अधिकाऱ्याने पुढाकार घेऊन २६ जून १८१८ रोजी वरिष्ठ अधिकाऱ्याला स्तंभाच्या उभारणीसाठी पत्र लिहून याबाबत सूचना केली. पत्रात तो लिहितो
(मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी पत्र-वाचा परिशिष्ट ४) मी आपणास सुचवू इच्छितो कि, सन्माननीय गव्हर्नर जनरल यांनी कोरेगावच्या लढाईत जे सैनिक आणि अधिकारी जखमी अथवा मृत झाले त्यांच्या स्मृती कायम राहाव्या यासाठी एक स्मारक उभे करावे. खरे तर याआधी मी स्वतः गव्हर्नर जनरल यांना शिफारस करणार होतो मात्र आत्तापर्यंत आपली लढाई सुरूच होती त्यामुळे मी अशी शिफारस करू शकलो नाही. माझ्या अखत्यारीत मी अशी शिफारस करू शकतो परंतु, ही ऑर्डर गव्हर्नर जनरल यांच्या सहीनेच व्हावी असे माझे मत आहे
कारण त्यांनी केलेल्या शिफारशीमुळे सैनिकांच्या पराक्रमाचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल. आणखी विशेष बाब म्हणजे हे स्मारक उभारण्याचा सर्व खर्च सार्वजनिक खर्चातून केला जावा असे देखील मला वाटते. हे स्मारक बांधतांना मी एक सूचना अवश्य करू इच्छितो की, या लढाईत सहभागी प्रत्येक सैनिकांचे नाव हे इंग्लिश, पर्शियन आणि मराठी भाषेत कोरले जावे.
माऊंट एल्फिन्सटनने केलेल्या शिफारशीवर दि. १९ सप्टेंबर १८१८ रोजी चीफ सेक्रेटरी ऑफ गव्हर्मेंट, जे. अॅडम याने खालीलप्रमाणे उत्तर दिले.
आदरणीय माऊंट एल्फिन्सटन यांस,२६ जून रोजी तुम्ही पाठवलेल्या शिफारशीच्या पत्रानुसार कौन्सिलच्या गव्हर्नर जनरल यांनी मला निर्देश दिले आहेत की, तुम्ही पाठवलेल्या शिफारशींना गव्हर्नर जनरल यांचा पाठिंबा असून १ जानेवारी रोजी कोरेगाव येथे झालेल्या लढाईतील शौर्याचे प्रतीक म्हणून सार्वजनिक खर्चातून स्मारक बांधण्याची तुमची संकल्पना त्यांना आवडली आहे.
२९ सप्टेंबर १८१९ रोजी माऊंट एल्फिन्सटन ह्या अधिकाऱ्याला शिरूर छावणीतून पत्र लिहिले गेले ज्यामध्ये स्तंभाच्या उभारणीचा अंदाजे खर्च दिला होता.
हे स्मारक कोणत्याही विलंबाशिवाय लवकरात लवकर पूर्ण करावे असा संदेश गव्हर्नर जनरल यांनी दिला आहे. त्यासाठी स्मारकाचा आराखडा, स्मारकाचे ठिकाण आणि स्मारकाच्या उभारणीसाठी येणारा अंदाजे खर्च किती असेल, याचा तपशील कळवण्यास सांगितले आहे.
स्मारकावर जखमी आणि मृत सैनिकांची नावे इंग्लिश, पर्शियन आणि मराठी ह्या भाषेत करण्यास मान्यता दिली आहे. (सही) जे. अॅडम
कोरेगावच्या लढाईत इंग्रज सैन्याने जो पराक्रम केला त्याची आठवण कायम राहावी म्हणून ‘जयस्तंभ’ उभारणीला परवानगी देण्यात आली आणि बांधणीसाठी अंदाजे किती खर्च येईल ह्याचा हिशोब काढायला सांगितले.
५० फुटी स्तंभासाठी लागणारा खर्च होता ६५ फुटी स्तंभासाठी लागणारा खर्च होता २४,८४५ रुपये ३४,१५१ रुपये हा सर्व खर्चाचा अंदाज आणि आराखडा पुण्याचा इंजिनियर कॅप्टन नट ह्या अधिकाऱ्याने काढलेला होता. या आराखड्यांपैकी ६५ फुटी स्तंभाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला, ज्याला अंदाजे ५०,७८६ रुपये इतका खर्च आला.
दि. २२ मार्च १८२१ रोजीच्या पत्रामध्ये स्तंभाच्या पायाभरणीच्या संदर्भात नियोजनाचा खुलासा केला गेला.
पुणे कमिशनर विल्यम चॅप्लिन यांस,
कॅप्टन नट यांनी कोरेगाव येथे उभारण्यात येणाऱ्या लष्करी स्तंभाचा पायाभरणी कार्यक्रम या महिन्यातल्या २६ तारखेला करण्याची तयारी केली आहे.या कार्यक्रमाला पायाभरणीसाठी उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळणार आहे. यासाठी मी सशस्त्र दलाची एक तुकडी आणि १ ग्रेनेडिअर बटालियनच्या पहिल्या रेजिमेंटच्या २०० सैनिकांना कोरेगाव येथे उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
हेड क्वार्टर पुणे
आर्मी डिव्हिजन
शिरूर कॅम्प, २२ मार्च १८२१
सहीसोमवार, दि. २६ मार्च १८२१ रोजी लष्करी स्तंभाच्या पायाभरणीचा समारंभ मोठ्या उत्साहाने पार पडला. कोरेगाव भीमा स्तंभ उभारणी समारंभाच्या वेळेस तिथे मेजर जनरल स्मिथ हे मोठे आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत म्हणून त्यांच्या वतीने कर्नल हस्कीनसन उपस्थित होते. कर्नल हस्कीनसन यांच्या हस्ते या मिलिटरी जयस्तंभाचा पाया भरला गेला. या समारंभासाठी प्रांतातील बहुतांशी सर्व लष्करी अधिकारी उपस्थित होते. समारंभ सायंकाळी ५.३० वाजता पार पडला. या ठिकाणी लष्कराचा भव्य शामियाना उभारण्यात आला. सर्व परिसरात हर्षोल्हासाचे वातावरण होते. यावेळी निमंत्रित अधिकाऱ्यांनी ‘हिज मॅजेस्टी ४७ रेजिमेंट बँड’च्या तालावर ‘धीरेचाल’ केले. समारंभास्थळी पाहुण्यांच्या स्वागतासाठी ‘मद्रास आर्टिलरी’ची एक तुकडी आणि ‘कोरेगाव रेजिमेंट ग्रेनेडियर’च्या दोन पलटणींकडून मानवंदना दिली गेली. या नंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्तंभाच्या पायाभरणीचा समारंभ हा आगळावेगळा होता. पायाभरणी करतांना दगडाखाली एक पितळी प्लेट घालण्यात आली. या पितळी प्लेटच्या सोबत काही ब्रिटीश नाणी आणि एक चर्मपत्र लावण्यात आले. त्यावर उपस्थित मान्यवरांची नावे लिहिण्यात आली. पाटी खालीलप्रमाणे –
THIS FOUNDATION STONE WAS LAID Anno Domini 1821 The Most Noble The Marquis of Hastings, Governor General of India.
AND The Honourable Mountstuart Elphinstone, Governor of Bombay.
या कार्यक्रमानंतर कर्नल हस्कीनसन यांनी स्तंभाच्या पायाभरणीच्या कामाची पाहणी केली. पुढे मद्रास आर्टिलरीच्या तुकडीने हवेत तीन फैरी झाडून शाही सलामी दिली. या संपूर्ण सोहळ्याची जबाबदारी कॅप्टन नट कडेच होती. त्यांनी उपस्थितांना संबोधित करून सोहोळ्याची सुरुवात केली. ते या भाषणात म्हणाले- “उपस्थित मान्यवर हो… या किंवा इतर कोणत्याही देशाच्या इतिहासात सर्वात चमकदार लष्करी कामगिरीपैकी एक असलेल्या कोरेगावच्या घटनेच्या स्मराणार्थ आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. ही कामगिरी पूर्वेकडील राष्ट्रांतील सर्वात मोठी कामगिरी असेल आणि भविष्यकाळात इतिहासकार या घटनेची नोंद घेतील या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. कोरेगावच्या या ऐतिहासिक कामगिरीच्या आठवणी चिरंतन राहाव्यात यासाठी जो कोनशिला समारंभ आज आयोजित केला गेला आहे, त्यासाठी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर, ज्यांनी या लढ्यात भावनिकदृष्ट्या समरस होऊन मोठे योगदान दिले तसेच सध्याच्या ईस्ट कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी स्तंभाच्या उभारणीला मान्यता दिली, त्यांच्याच आज्ञेवरून मान्यता दिलेला हा कोनशिला समारंभ माझ्या डाव्या बाजूला बसलेला शूर कर्नल हस्कीनसन यांच्या शुभहस्ते पार पडत आहे.
सभ्य गृहस्थहो, मला असे वाटते की, हा दिवस त्या लढाईत लढलेल्या सर्व शूर योद्ध्यांमुळे पाहू शकलो; आणि त्याचा यथायोग्य सन्मान कुठल्या सरकारने करायचा ठरवला तर तो याच पद्धतीने केला जाऊ शकतो, जो आपण इथे आज करत आहोत. येथे ज्या शूर सैनिकांची नावे कोरली गेली आहेत त्यांची केवळ वैयक्तिक अभिमानाची गाथा इथे विशद केली जात आहे असे नाही, तर त्यांनी या निकराच्या लढाईत आपल्या सरकारला स्थैर्य मिळवून देण्यात यश प्राप्त केले आहे हे देखील अवश्य नमूद करावे लागेल. आपल्या सैन्य तुकडीच्या पराक्रमी इतिहासात, आपल्या बलिदानाने आणि सहभागाने मानाचा तुरा रोवण्यात देखील त्यांचे योगदान आहे.
हा संघर्ष साधासुधा अजिबातच नव्हता तर तो रोम आणि ग्रीक साम्राज्याच्या लढ्याच्या तोडीचा होता. कमी संख्येने सैनिक असतांना बलाढ्य आणि आक्रमक फौजा ३६ तास सतत आक्रमक होत्या, अशावेळी आपल्या लढवय्या तुकड्या इमान, साहस आणि चिकाटीने लढल्या. त्याच्या कहाण्या इथल्या गावागावात आम्ही सर्वेक्षण करून गोळा केल्या आहेत, यामुळेच ग्रेट ब्रिटेनच्या युद्धाच्या इतिहासात कोरेगावचा हा लढा अजरामर आहे. ग्रीक आणि रोमन लढ्याइतकाच तो रोमांचकारी आहे. आपल्या ब्रिटनमधील सर्व विद्यापीठांमध्ये, राष्ट्रीय सैनिकी शाळांमध्ये या लढ्याचा अध्याय आपल्या विद्यार्थ्यांना सांगावा इतका महत्त्वाचा हा लढा आहे.”
भाषणानंतर कॅप्टन नट मद्याचा एक प्याला उंचावून सर्वांना ‘टोस्ट’ सादर करत म्हणाले, “कोरेगावच्या संस्मरणीय लढ्यात कामी आलेल्या शुरांच्या आत्म्यास शांती लाभो.” यानंतर धीरेचाल माचिंगची धून सुरू झाली आणि लष्करी बँडच्या सुरांनी आसमंत व्यापून गेला. या समारंभात झालेल्या अतिरंजित भाषणामध्ये केवळ इंग्रज अधिकारी आणि सैनिक यांचा उल्लेख होता ही बाब विशेष नोंद घेण्यासारखी आहे. दि. २६ मार्च १८२१ चा हा सर्व कार्यक्रम पार पडला. यानंतर जयस्तंभाची बांधणी १८२२ मध्ये पूर्ण झाली.
स्तंभावरील पाट्या खालीलप्रमाणे,
* स्तंभाच्या पश्चिमेची बाजू – वाचा परिशिष्ट ७
स्तंभाची उत्तरेकडची बाजू
१ मौजे कोरेगांव येथे इंग्रेजी लोक लढाइत जय मेळऊन पडले व जखमी जालेल्याची नावे
१ मद्रासि तोफ खान्याची २५ मनुष्यांची तुकडी १ त्यात तोफा २ त्यात १लेफतनेंत उलीम चीसम सरदार पडला १ डॉक्टर जान वायली १ मुंबई सर्कार्यो पायदळ लोक पहिले ग्रेनादीररिजमेंट पळटण दुसरेव्यात १ कप्तान स्थान्नन साहेब मुख्य सरदार १ लेफटनेंत टामस पाटीन्सन पडला १ लेफटनेंत ज्यान कॉर्नलन जखमी १ लेफटनेंत जोसिफजोन्स १ डॉक्टर विइनगेट पडला.
१ इंग्रेजी सर्काों पुणे पैकी सिलेदारी स्वार २५० त्यात सरदारच्या लिसस्वानस्थन जखमी
१ तोफ खान्यापैकी पडले १ जमालतांडेल दुइम १ गोविंद लस्कर १ शेख आमद लस्कर १ राम स्वामी लस्कर १ दिसान लस्कर ||पैकी जखमी || फत्ते महंमद सारग
१ इमाम सायब लस्कर १विलीयादन लस्कर १रामरु लस्कर १ वेंकटचिलिम लस्कर १ वेंकटस्वामी
१ मुंबई सर्कार्यो पायदळ लोक ग्रेनादी ररिजमेंट पळटण दुसरे ||पैकी
पडले || बापूसिंदा जमातदार १ गणोजी गोरे जमातदार १ कानसिंग हवालदार, १ एटमेतरबाळमेतर नाईक १ सोननाक कमळनाक नाईक १ रामनाक येसनाक नाईक १ प्रसादसिंग शिपाई १ लक्ष्मण बदोसा शिपाई १ बाबू सावंत शिपाई १ गोंदनाक कोठेनाक शिपाई रामनाक येसनाक शिपाई १ लक्ष्मण कुकडा शिपाई १ भागनाक हरनाक शिपाई १ राघोजी मोद्रे शिपाई १ भागोजी वयार शिपाई १ अबनाक काननाक शिपाई १ खंडोजी शिपाई १ गोपाळजी कोंडे शिपाई १ गणनाक बाळनाक शिपाई १ भवानजी इटेकर शिपाई१ शीऊबक्स सिंग शिपाई १ सजणाजी पवार शिपाई १ चागोजी जाधव शिपाई १ बालनाक घोडनाक शिपाई १ रूपनाक लखनाक शिपाई १ राणोजी जाधव शिपाई १ बपनाक रामनाक शिपाई १ बाळोजी सिग्वान शिपाई १ विटनाक धामनाक शिपाई १ राजनाक गणनाक शिपाई १ अबदुल करसान शिपाई १ सदिशिंग शिपाई १ बपनाक हरनाक शिपाई १ अर्जुनजी चव्हाण शिपाई १ रौनाक जाननाक शिपाई १ सजनाक येसनाक शिपाई १ गणनाक रमनाक शिपाई १ कोठेखान शिपाई १ देवनाक अननाक शिपाई १ गोपाळनाक बाळनाक शिपाई १ हणमंत मातर शिंग शिपाई १ हरनाक हिरनाक शिपाई १ मनसाराम शिपाई १ अनोजी धारसे शिपाई १ जेटनाक दोनाक शिपाई १ ऐश्वम इरेकर शिपाई १ निधानशिंग शिपाई १ गणनाक लाखनाक शिपाई १ सुरतशिंग शिपाई १ पैकी जखमी || देवशिंग सुभेदार सोनमेतर गोंदमेतर जमातदार १ जानोजी साळुंखे नाईक १ जाननाक हिरनाक परगाववाला १ भोळाशिंग शिपाई १ बक्षुसुशिंग शिपाई १ भीकनाक रतनाक शिपाई १ रतनाक धाननाक शिपाई १ वरसारखार शिपाई १ माहादोजी गोळी शिपाई १ विसरामशिंग शिपाई.
इंग्रेजी सर्कार्यो पुणे येथील सिलेदार स्वार पैकी || पडले || शेख
इभ्रम सिलेदार १ शेक नथु सिलेदार १ नथेखान सिलेदार १ शेख
महंमद सिलेदार १ आपाजी सिलेदार १ खंडोजी सिलेदार १
गोपाळा सिलेदार १ मुकुंदराव सिलेदार १ सटवाजी सिलेदार १ डुलोबा सिलेदार १ नारोबा सिलेदार १ इभ्रमखान सिलेदार १ शेख अबदला सिलेदार १ रामजी नाईक सिलेदार १ पिमशिंग सिलेदार १ हैबती नायक सिलेदार १ महीपती सिलेदार १ विठोबा सिलेदार १ इमामखान सिलेदार १ गणेशशिंग सिलेदार १ हरिशिंग सिलेदार १ उदाजी सिलेदार १ गंगाजी सिलेदार १ नेकनाह सिलेदार १ भवानीशिंग सिलेदार १ बातशिंग सिलेदार १ पराजी सिलेदार १ शेख सातू सिलेदार १ वजीर महंमद सिलेदार १ रयमखान सिलेदार १ जमालदिन सिलेदार १ येंकोजी सिलेदार १ दाऊदखान सिलेदार १ गंगाजी सिलेदार १ हुसेनखान सिलेदार १ गोदाजी सिलेदार १ खंडेराव सिलेदार १ शेखलाल महंमद सिलेदार १ नतेखान सिलेदार १ दमाराम सिलेदार १ इठोजी सिलेदार १ लक्ष्मण येमाजी सिलेदार १ रामजाना सिलेदार १ सदाशिव लक्ष्मण सिलेदार १ आलीखान सिलेदार १ || पैकी जखमी || मिरागणी रिसालदार १ ओमशिंग जमातदार १ व्यंकटरामराजू दफेदार, हणमत्या सिलेदार १ शेख कासीम सिजमाल सिलेदार १ गुलामरमुल सिलेदार १ शेख जमाल सिलेदार १ हुशेन महंमद सिलेदार १ हामाद सिंग सिलेदार १*** सिलेदार १ सयदवुदन सिलेदार १ हिरापा सिलेदार १ इमाम अली सिलेदार १ महिपतु सिलेदार हामदशिंग सिलेदार १ शेख मदार सिलेदार १ हसन महंमद सिलेदार १ बापू भोय सिलेदार १ मीरहसन अली सिलेदार १ राघोजी सिलेदार १ अबदुल कादीर सिलेदार १ फरीक महंमद सिलेदार १ चिमाजी सिलेदार १ **राम सिलेदार १ बालाजी सिलेदार १ मयाजी सिलेदार १ दुलोजी सिलेदार. हलि सन १८२२ इसवि शके १७४३
सदर नावे वाचली असता असे समजते की या सैनिकांमध्ये कुठल्याही एका
विशिष्ट जाती किंवा धर्माचे सैनिक नसून यात संमिश्र जाती धर्माच्या सैनिकांचा
समावेश होता.
स्तंभाच्या दक्षिणेची बाजू
जयस्तंभ
कप्तान स्थान्तन साहेबाच्या स्वाधीन मुंबइ सर्कोच्या पळटणचे लोक ५००, व स्वार २५० व तोफखान्याची मनुष्ये २५ व तोफा २ होत्या. त्याज वर सन इसवी १८१८ ज्यानेवारी तारीख १ शके १७३९ मार्गशीर्ष वद्य ९ गुरुवार ते दिवसी कोरेगावच्या मुकामी पेशव्यांच्या सारे फौजने चालन येऊन घेरा दिला आणि आरब व दुसरे निवडक लोक पेशव्यांचे यानी मोठ्या चढायावर चढाया केल्या अस्ता पेशवांच्या फौजेचा मोड करून इंग्रेजी लोकानी जय मेळविला ही कीर्ती राहावी म्हणून हा जयस्तंभ उभारिला आहे यावर या वीरांचा पराक्रम व सर्कोचीकरी विषई प्राणास उदार जाले हा लोकीक बहुत काळ राहावा यास्तव त्यांच्या पळटणाची व लढाईत पडले व जखमी जाहाले यांची नावे इंग्रेजी सर्कार्ची आज्ञा होऊन या जयस्तंभावर दुसऱ्या अंगास लिहिली आहेत.
सन इसवी १८२२ शके १७४३
स्तंभावरील ह्या लेखातून स्तंभाचा हेतू स्पष्ट समजतो. हा जातीअंताच्या लढाईत विजय मिळाल्यावर बांधलेला विजयस्तंभ, क्रांतीस्तंभ, रणस्तंभ, शौर्यस्तंभ नसून फक्त एक लष्करी स्मारक आहे आणि त्याचा कुठल्याही जाती धर्माशी संबंध नाही.
जयस्तंभ प्रभारी (इन-चार्ज)
स्तंभाची उभारणी पूर्ण झाल्यावर तेथे प्रभारी (इन-चार्ज) नेमण्यासंदर्भात अटी शर्ती इंग्रजांच्या दि. २२ नोव्हेंबर १८२४ पत्रात सविस्तर नमूद केल्या आहेत. चीफ सेक्रेटरीने डेक्कन कमिशनरला लिहिलेल्या या पात्रातील खुलासा पुढीलप्रमाणे-
(मराठी अनुवाद, मूळ पत्रासाठी – वाचा परिशिष्ट ९)
कोरेगावच्या लढाईच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे, गव्हर्नर कौन्सिल यांनी स्मारकाचे जतन करण्याच्या दृष्टीने असे नमूद केले आहे की, स्मारकाची जबाबदारी एका गुणवान सैनिकाकडे सोपवावी ज्याचा सहभाग कोरेगावच्या लढाईत होता.
मला गव्हर्नर कौन्सिल यांची विनंती तुमच्यासमोर मांडायची आहे की, लेफ्टनंट कर्नल स्टाँटन यांना सर्वात योग्य व्यक्तीची निवड करायला सांगावे परंतु अशी व्यक्ती परवारी (महार) जातीची नसावी. तसेच ही वास्तू जपण्याची सदर व्यक्तीने काळजी घ्यावी आणि सोबतच त्याने येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांना स्तंभाबाबत माहिती द्यावी.
ही जबाबदारी पुरुष वंशज असेपर्यंत त्याच कुटुंबावर सोपवली जाईल परंतु असा वंशज न जन्मल्यास, सरकार नवीन व्यक्ती तिथे नेमेल.
स्तंभाशेजारील जमिनीचा तुकडा किंवा वार्षिक रुपये आणि पहिल्या नेमलेल्या व्यक्तीला जमादार हुद्दा देण्यात येईल (इन-चार्ज). सही
या पत्रांमधून ज्या अटी घातल्या होत्या त्या सर्व इंग्रजांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या होत्या.
१. ज्या व्यक्तीने कोरेगाव भीमा लढाईमध्ये शौर्य गाजविले असेल त्यालाच स्तंभाचे इन-चार्ज बनवावे. २. परवारी म्हणजेच महार जातीचा व्यक्ती तिथे इन-चार्ज म्हणून नेमू नये. (याचा अर्थ इंग्रजांनी महार सैनिकांना डावलले. यातून इंग्रजांचा जातीवाद स्पष्ट कळून येतो.)
३. स्तंभाच्या शेजारील जमीन आणि ठराविक अनामत रक्कम वार्षिक पद्धतीने इन-चार्ज यांना देण्यात यावी.
या पत्राचा विचार करून लगेचच पुढील काही दिवसांत कोरेगाव लढाईचे नेतृत्व करणारे कॅप्टन स्टाँटन यांच्या सल्ल्याने कोरेगाव लढाईमधील शूर सैनिक हवालदार खंडोजी माळवदकर यांना स्तंभाचे प्रभारी (इन-चार्ज) म्हणून नेमण्यात आले. दि. १३ डिसेंबर १८२४ रोजी गव्हर्नर जनरल यांनी खंडोजी माळवदकर यांच्या नावाने ऑर्डर दिली, ती ऑर्डर
खालीलप्रमाणे-
कोरेगाव येथे उभारलेल्या स्मारकाची बांधणी पूर्ण झाली आहे. कॅप्टन स्टाँटन यांच्या शिफारशीवरून पहिल्या कंपनीचे हवालदार खंडोजी, जे कोरेगावच्या लढाईमध्ये जखमी झाले होते त्यांना जयस्तंभाचे इन-चार्ज म्हणून नेमण्यात येत आहे आणि ही जबाबदारी त्यांच्यावर, त्यांचे कुटुंबात पुरुष वंशज असेपर्यंत कायम राहील परंतु असा पुरुष वंशज न जन्मल्यास, सरकारने तिथे नवीन इन-चार्ज नेमावा. खंडोजी यांना जमादार ही बढती दिली जात आहे. त्यानुसार त्यांना वेतनवाढ मिळेल आणि याची नोंद पुणे लष्कर विभगात उपलब्ध होईल.
जयस्तंभाशेजारील जमीन किंवा वार्षिक रुपये त्यांच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पुढे देण्यात येणार आहे.
(सही)
ही जनरल ऑर्डर स्वतः माननीय गव्हर्नर कौन्सिल यांच्या आदेशावरून खंडोजी माळवदकर यांना देण्यात आली. खंडोजी माळवदकर यांना जयस्तंभाचे इन-चार्ज नेमल्यावर बुधवार, दि. २२ डिसेंबर १८२४ रोजी ‘बॉम्बे गॅझेट वॉल्युम ३५ क्रमांक १८०३’ ह्या वृत्तपत्रामध्ये पहिल्याच पानावर त्यांची ही बातमी आली.
खंडोजी माळवदकर यांना जयस्तंभाचे इन-चार्ज नेमल्यावर बुधवार, दि. २२ डिसेंबर १८२४ रोजी ‘बॉम्बे ग्याझेट वोल्युम ३५ क्रमांक १८०३’ ह्या वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीची मूळ प्रत खंडोजी यांना जनरल ऑर्डर मिळाल्यानंतर स्वतः बॉम्बे सरकारने त्यांना स्तंभाशेजारी घर देखील बांधून दिले, आजही ते घर त्याच जागेवर अस्तित्वात आहे. तेव्हापासून म्हणजेच दि. १३ डिसेंबर १८२४ पासून खंडोजी व त्यांचा वंशपरंपरागत परिवार तिथे वास्तव्यास असून जयस्तंभाचे संरक्षण, बंदोबस्त आणि देखभाल करीत आहे. तेथे असलेल्या जमिनीमध्ये शेती देखील केली जाते. ही जमीन तेव्हापासून याच कुटुंबाच्या ताबेवहिवाटीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुणे पुराभिलेखागार दफ्तरातील सन १८२९च्या रुमालांमध्ये खंडोजी माळवदकर यांचे नाव आढळून येते. मोडी लिपीतील काही थळझाडे अभ्यासल्यावर खंडोजी माळवदकर यांची जमीन पेरणे गावामध्ये आहे हे निश्चित होते. इंग्रजांच्या सर्व पत्रव्यवहारामध्ये त्यांनी स्तंभाला प्रभारी म्हणून नेमल्या गेलेल्या व्यक्तीचा उल्लेख ‘इन-चार्ज’ म्हणूनच केला आहे. दि.२६ मार्च १८२६ रोजी खंडोजी माळवदकर यांना कायदेशीररीत्या स्तंभाशेजारील जमिनीचा हक्क मिळाला.
दिनांक २६ मार्च १८२६ च्या कोर्ट डिस्पॅचचा सारांश, कोरेगावच्या लढाई मधील दुसऱ्या रेजिमेंटच्या सैनिकांनी जो धाडसी बचाव केला, त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ जे स्मारक बांधले आहे त्याची जबाबदारी (इन-चार्ज), लढाईत शौर्य गाजविलेल्या तद्देशीय हवालदार पदावरील सैनिकाला देण्यात आली आहे. यासाठी त्यांना ‘जमादार’ ही पदवी बहाल करत असून स्तंभाला लागून असलेली वार्षिक रुपये २०० महसुलाची जमीन देखील यांना देण्यात आली आहे आणि हे सर्व त्यांना पुरुष वंशज असे पर्यंत कायमस्वरूपी देण्यात आले आहे परंतु पुरुष वंशज खंडित झाल्यावर सरकारने तिथे नवीन इन-चार्ज नेमावा.
यानंतर दि. १३ जानेवारी १८४१ रोजी इंग्रजांमध्ये काही पत्रव्यवहार झाले. त्यांच्यामध्ये झालेल्या पत्रव्यवहारात अॅक्टींग कलेक्टर हे रेवेन्यू कमिशनरला पत्रात लिहितात की (मराठी अनुवाद), “मला हे सांगण्यास आनंद होत आहे की, जमादार यांनी मला खात्री दिली आहे की या स्मारकावर कोणत्याही प्रकारचा उत्सव आज पर्यंत साजरा केला गेला नाही आणि अशा कोणत्याही कार्याला इथे परवानगी दिली जाणार नाही. पण याचे उल्लंघन झाल्यास जमादार आणि जिल्हाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल याची त्यांना कल्पना आहे ” या पत्रातून स्पष्ट कळून येते कि, इंग्रजांनी या स्तंभाच्या परिसरात कुठल्याही जाती-धर्माच्या अनुषंगाने उत्सव किंवा धार्मिक क्रिया करू नये असे स्पष्ट आदेश दिले होते. दि. ७ डिसेंबर १८४१ रोजी खंडोजी माळवदकर यांना इनाम म्हणून अधिक जमीन देण्यात आली. याची सनद देखील प्राप्त झालेली आहे.
तुम्हास कळवण्यात येते की पाबळ परगण्यांमध्ये भीमेच्या दक्षिण किनाऱ्यावर मौजे कोरेगावच्या बाजूस मौजे पेरणे तरफ सांडस परगणे भीमथडी येथे तारीख १ माहे जानेवारी सन १८१८ इसवी रोजी इंग्रजी सरकारचे एक लहान टोळीने बाजीरावसाहेब पेशवे यांचे संपूर्ण सैन्यापासून बाजीरावसाहेब यांनी समक्ष उभे राहून लढाई चालवली असता त्यासी लढाई मारून आपले संरक्षण केले याची स्मृती रहाण्याकरिता इंग्रजी सरकारने तेथे एक जयस्तंभ रोविला आहे व तुम्ही पहिले इन्व्हालिड कंपनीचे हवालदार असून त्या लढाईत तुम्हास जखम लागली सबब लेफ्टनंट कर्नल स्टाँटन साहेब ** त्या लढाईत इंग्रजी सरकारचे फौजेचे सरदार होते त्याचे शीफारशी वरून नेक नामदार गव्हर्नर साहेब यांनी मेहेरबान होऊन तारीख दिनांक १३ माहे डिसेंबर सन १८२४ इसवी रोजचे जनरल ऑर्डरमध्ये सदरहू जयस्तंभाचा बंदोबस्त राखण्याकरिता तुम्हास नेमीले आहे व तुम्हास जमादारीचा मुद्दा देऊन तुम्हास व पश्चात ज्याच्याकडे सरकार सदरहू बंदोबस्त सोपवून देईल त्याचे गुजाऱ्याकरिता काही इनाम जमीन तोडून देण्यात आली आहे ती नवे प्रत बंदीप्रमाणे बतपशील रुपये
४९ मौजे पिंपरी तर्फ सांडस येथील क्रमांक १२/१३७/१३९/१४० एकूण चार लायक जमीन ५२.२९ एकर आकार कंपनी रुपये
४२ मौजे वाडे व केसनंद व बकरी या तीन गावांमध्ये तकरारी क्रमांक १ केसनंद कागदी आहे तो १६५ लायक एकर ४७.३१ आकार कंपनी रुपये ७८ मोजे केसनंद डोंगरी कुरण क्रमांक १६२/१६३/१६४ एकूण तीन लायक जमीन एकर ५६.६ आकार कंपनी रुपये
४५ मौजे वाडे बोलाइ येथील डोंगरी कुरण क्रमांक १९५/१९६/१९८ एकूण चार लायक जमीन एकर ६३.४१ आकार कंपनी रुपये
एकूण २६० एकर १७ गुंठे जमीन व २१४ रुपये नवे आकार झाले आहे तरी तुम्ही व तुमचे पश्चात ज्याला सरकार सदरहू बंदोबस्त सोपून दिल त्याने सदरहू जमिनीचा उपभोग घेऊन त्या जयस्तंभाचा व त्या भोवती आवार आहे त्याचा व त्यातील वृक्षांचा चांगला बंदोबस्त ठेवावा आणि सदरहु जागेची खराब न होईल अशी तजवीज तुम्ही आपले सामर्थ्यनरूप राखावी व या जयस्तंभाजवळ धर्मा संबंधि काही एक क्रिया करू देऊ नये. सदरहू जमीन तुमच्याकडे वंश परंपरेने चालेल परंतु तुमचा पुरुष वंश बुडाल्यास सदरहु जयस्तंभ संरक्षणाचे काम व जमीन कोणाकडे चालवायची त्याची तजवीज करण्यास सरकार मुकत्यार आहे.
सदरहू जमीन हुकुम झाला त्या दिवसापासून तुम्हास मिळाली नाही सबब तुम्हास जामदार खाण्यातून रोख पैसा पावला आहे व हल्ली सन १२५१ फसली म्हणजे सन १८४१/४२ इसवी सालापासून सदरहु जमीन तुम्हाकडे चालविण्यात येईल. तारीख ७ डिसेंबर सन १८४१”
एकूण २६० एकर १७ गुंठे जमिनीचा उल्लेख या सनदीमध्ये आढळतो. त्यांनी यात स्पष्ट लिहिले आहे की, “सदरहु जागेची खराबी न होईल अशी तजवीज जमादारांनी त्यांच्या सामर्थ्याने राखावी व या जयस्तंभाजवळ धर्मासंबंधित कोणाला काही एक क्रिया करू देऊ नये.”
या प्रकरणाअंती लिहिताना, १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव येथे झालेल्या लढाईचा आणि मौजे पेरणे येथे उभारलेल्या स्तंभाचा कुठल्याही जातीधर्माशी संबंध नाही असे वारंवार नमूद करावे लागेल. या स्तंभाचा वेळोवेळी अपप्रचार केला गेलेला ‘विजयस्तंभ, शौर्यस्तंभ, प्रेरणास्तंभ, रणस्तंभ, विजयरणस्तंभ’ इत्यादी उल्लेख देखील इतिहासाला अनुसरून नाही. परकीयांनी येथील सत्ता हस्तगत करण्यासाठी केलेल्या एका छोट्या अनिर्णायक लढाईतील स्मृतीसाठी हा स्तंभ बांधला गेला. या स्तंभाला भेट देताना त्यामागील सत्य इतिहास ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.